परंपरेप्रमाणे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. लाखो वारकरी मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यामध्ये सामील होत असतात. पारंपरिक भजन-कीर्तन आणि विठूनामाच्या जयघोषामध्ये हे वारकरी पंढरीच्या विठूरायाच्या ओढीने धावत असतात. धर्माला मरगळ आलेल्या काळात संतांनी वारीची परंपरा सुरू करीत धर्माची पताका तेजाळत ठेवली. आजची सामाजिक परिस्थिती पाहता, आता वारी हे जनजागृतीचे साधन व्हावे. मागील काही वर्षांत वारीमध्ये अनेक नवनवीन कालानुरुप प्रयोग होत आहेत. वारकरी संप्रदायाच्या मूळ ढाच्याला कुठेही अडथळा न आणता स्वच्छता, नीटनेटकेपणा, पर्यावरणपूरकता अशा अनेक विषयांवर काम होत आहे. आता पुन्हा एकदा धर्माभिमान आणि आपल्या संस्कृतीची नाळ जोडणारी नवी जागरुकता आणण्याची वारी घडावी. आजवर आपल्या महान संतांनी ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिलेला आहे. केवळ आपल्या ग्रंथांमधूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीमधूनदेखील संतांनी आपला देव-देश आणि धर्म जीवंत ठेवला आहे. वारकरी संप्रदाय आजही हिंदू धर्म टिकवून ठेवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावतो आहे. साधूसंतांनी आपल्या कष्टाने रुजवलेल्या-वाढवलेल्या या पंथाकडे संपूर्ण हिंदू समाज मोठ्या आशेने पाहतो आहे. हिंदू समाजाला आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा समाज ताकतीने उभा राहावा, यामध्ये वारकरी संप्रदायाची महत्त्वाची भूमिका आहे. मागील काही वर्षांत वारीमधील तरुणांचा सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे, ही बाबा निश्चितच सकारात्मक आहे. तरुणांची ही सज्जनशक्ती एकवटली, तर तिचा विनियोग समाजाच्या कल्याणासाठी करणे अशक्य नाही. संतांचा भक्तिमार्ग आणि शिवरायांचा कर्ममार्ग एक झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व क्रांती जगाने अनुभवलेली आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे ३५०वे वर्ष आहे. संपूर्ण हिंदू समाज त्याला ‘हिंदू साम्राज्यदिन’ असे संबोधतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला कर्मयोग जागविण्यासाठी ही वारी सहाय्यभूत ठरो, हीच विठूरायाची चरणी मनोकामना...
‘मविआ’चे ऐक्य तकलादू!
भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा आणि विधानसभा प्रमुखांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने पक्षातील काही नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याने त्यांचा उत्साहदेखील साहजिकच द्विगुणित झाला आहे. येत्या काळात भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सकारात्मक कामगिरी करीत पुन्हा सत्तेवर येईल, असा आत्मविश्वास भाजपला आहे. भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आहे. त्यांनी नऊ वर्षांत केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिक स्वत:च मांडत असून त्याबाबत समाधानदेखील व्यक्त करीत आहेत. त्यातच महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये निवडणूक लढविण्यासाठी चेहरा नाही. आतापर्यंत अर्धा डझन नेत्यांच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचीअंतर्गत स्पर्धाच त्यांच्या मुळावर उठलेली दिसत नाही. ऐक्य नसलेली आघाडी केवळ प्रमुख तीन नेत्यांमुळे कशीबशी तग धरून उभी आहे. परंतु, आघाडीच्या इमल्याचे छप्पर फक्त सुंदर आहे. उर्वरित इमारत जरा जर्जर झालेली आहे. ती कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. नेते आपल्या ऐक्याच्या गप्पा हाणीत असले तरी, कार्यकर्ते मात्र अद्याप आघाडीमध्ये काम करण्यास उत्साही नसल्याचेच चित्र आहे. दुसरीकडे भाजपने मात्र आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. पक्ष कमकुवत असलेल्या ठिकाणी येनकेनप्रकारेन शक्ती वाढविण्याची तयारी सुरू झालेली दिसते. २०२४च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वादळापूर्वीची शांतता आहे. निवडणुका लागताच दोन्ही पक्षांतील अनेक मातब्बर भाजपच्या गोटात डेरेदाखल होतील, अशी चर्चा आहे. त्यातच शिवसेना पक्ष भाजपच्या सोबत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटाही मोठा आहे. शेतकर्यांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न ते प्राधान्याने मार्गी लावत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष सैरभैर झाले असून त्यांचा आत्मविश्वासही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, हेच खरे!