विवेक अग्निहोत्रींच्या ‘लेन्स’मधून सिनेमा...

    24-Jun-2023   
Total Views |
Interview Of Film Director Vivek Agnihotri

चित्रपटाचे बदलते ट्रेंड्स, या माध्यमाचा गेल्या काही दशकांत झालेला अफाट विस्तार आणि जागतिक चित्रपटसृष्टीकडे पाहता, भारतीय सिनेमाचे भवितव्य तसेच या बदलत्या प्रवाहांत विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटांची भूमिका, अशा अनेक मुद्द्यांवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्याशी केलेली ही मनमोकळी बातचित...
 
‘द वॅक्सीन वॉर’ हा तुमचा आगामी चित्रपट येत्या एक-दोन महिन्यांत मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल. तेव्हा, नेमका या विषयावर चित्रपट करावा, असे तुम्हाला का वाटले? या चित्रपटाची संकल्पना कशी सूचली आणि त्यासाठी तुम्ही संशोधन कसे केले?
हा आजच्या युगातला चित्रपट आहे. प्रत्येक वेळी मी वाईट बातमी जगासमोर आणू इच्छित नाही. कारण, जगात बर्‍याच चांगल्या गोष्टीही घडत आहेत. भारताचे त्यात मोठे योगदान आहे. आज आपल्या देशातील प्रत्येक लहान मुलाला भारताच्या क्षमतेवर, भारताच्या विश्वासावर, विचारांवर, मूल्यव्यवस्थेवर आणि आपल्या आई-बहिणी, ज्यांना ‘अबला’ म्हंटले गेले; पण त्यांनी मोठे योगदान दिले, या सर्वांबाबत अभिमान वाटेल, म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली. भारतात अनेक अंतर्गत कुरबुरी आहेत; पण जागतिक पातळीचा विचार करता, भारत विश्वावर ठसा उमटवू शकतो, हे हा चित्रपट सांगतो.

’द वॅक्सिन वॉर’नंतर चित्रपटांसाठी अशाच काही आगळ्यावेगळ्या, चौकटीबाहेरच्या विषयांचा तुम्ही आताच विचार केला आहे का?
एका चित्रपटावर मला काम करायला आवडेल; पण कदाचित मी तो बनवू शकणार नाही. स्वातंत्र्यसंग्रामात नौदलाने जे बंड केले होते, ज्याकारणास्तव इंग्रजांनी भारत सोडला, हे एका युद्धासारखेच आहे. परंतु, आज मी कमीतकमी निधी घेऊन तयार होतील, असे चित्रपट बनवतो आहे. भारतीयांच्या भावना, भारतीय सभ्यता आणि संस्कृतीवर आधारित विषय, या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून मी आयुष्यातील कित्येक वर्षे राखून ठेवली आहेत. यश मिळालं, म्हणून अजून चित्रपट तयार केले असे नाही, तर जे काम अपूर्ण राहील आहे, जे विषय हाताळले गेले नाहीत, त्या विषयांना वाचा फोडण्याचं काम मी करणार आहे. आगामी ’दिल्ली फाईल्स’ चित्रपटामधून भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचे गमक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटानंतर एक अजून चित्रपट करेन, ज्याची घोषणा अजून झालेली नाही, तो विषय मी गुलदस्त्यात ठेऊ इच्छितो. त्यानंतर मात्र मी चित्रपट बनवणार नाही.

तुमचे चित्रपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. आज ‘द केरला स्टोरी’ व ‘द काश्मीर फाईल्स’सारख्या चित्रपटातील विषयांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. मग अशा आशयाच्या चित्रपटनिर्मितीचे प्रयत्न यापूर्वी का झाले नाही, असं तुम्हाला वाटतं?
कसं होतं, आपला भारतीय समाज मुघलांच्या दहशतीमुळे आणि त्यानंतर वसाहतवादी दृष्टिकोनामुळे अजूनही थोडा दबकून वावरणारा आहे. कालच एका सभेत मी स्वामी विज्ञानंदांशी बोलत होतो. मोठी असामी आहे. ‘आयआयटी खडकपूर’मधून ज्ञान संपादन केले आहे त्यांनी. त्यांचं असं म्हणणं होतं, आपण गर्वाने बोलतो आपण हिंदू आहोत, तरीही आपल्या विरोधकांना आपण नेहमी प्रभावित करण्याच्या प्रयत्नात असतो. खरंच काय गरज आहे? लोक स्वीकारणार नाहीत, असं वाटूनच आजपर्यंतच्या निर्मात्यांनी या विषयांना हात घातला नाही. लोक म्हणतात कसाही असला, तरी हैदर कलाकार आहे; पण या कलेचा खरंच काय फायदा, जी आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा विनाश करू पाहते? आज आपण इतिहासाचे विकृतीकरण होताना पाहतो. आपल्या घरातील पूर्वजांचे असे विकृतीकरण आपण खपवून घेऊ का? मी एक कलाकार म्हणून, वारसा आणि संस्कृतीचा चिकित्सक म्हणून नेहमी सांगतो, आपल्याला आपल्या देवतांवर प्रश्न उपस्थित करायला हवेत. जुन्या देवता, त्यांची रूपके विस्मृतीत घालवून नव्या दैवी मूल्यांची स्थापना करावी, हा खरंतर सृजनात्मक आविष्कार घडवू शकणार्‍या कलाकारांचा धर्मच आहे. ही माझीही एक जबाबदारी आहे; पण कुणी जर आपल्या कलेच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी जगासमोर आणत असेल, तर आपण आपली कथा घेऊन त्या कलाकृतीसमोर दीर्घ रेष ओढायला हवी. लोकांना सत्याची बाजूही दिसायला हवी.

आजचा चित्रपट सर्वार्थाने बदलतोय. एक काळ होता, जेव्हा ‘मुघले आझम’ वगैरे चित्रपट चालायचे, आज ‘बाहुबली’, ‘द केरला स्टोरी’, ‘काश्मीर फाईल्स’ अशा चित्रपटांची चलती आहे. नवा ट्रेंड असा दिसतोय की, काही लोक अगदी स्वखुशीने, स्वखर्चाने इतरांना आवर्जून चित्रपट दाखवतायेत. एक दिग्दर्शक म्हणून याकडे तुम्ही कसे पाहता?
मी असं म्हणेन, असा विवेक अग्निहोत्री यापूर्वी जन्माला आला नव्हता. आज हा विचार मला मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवायला आवडतो. माझ्यासारखे शेकडो, हजारो दिग्दर्शक घडायला हवेत. तसं पाहिलं तर कोणताही ‘ट्रेंड’ बदलण्यासाठी आठ ते दहा वर्षें सहज जातात. परंतु, ‘बुद्धा इन अ ट्राफिक जॅम’ चित्रपटाने हा ‘ट्रेंड’ बदलण्याचे काम रातोरात केले. ‘द ताशकंद फाईल्स’ चित्रपटानंतर जनतेला लक्षात आले की, राजकीय व्यवस्थेवर टीका करणारे चित्रपटही व्हायला हवेत, ते होऊ शकतात. उत्तम प्रतिसादाचं हे एक कारण होऊ शकेल. माझ्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, मला एक एक असे विषय निवडायचे आहेत, जे समाजाची स्थायी वैचारिक चौकट मोडून एक नवा विचार प्रदान करतील.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून जे वाद झाले, तुम्ही समाजमाध्यमांवरून ज्याप्रकारे व्यक्त होता, त्यानंतर ठरावीक गट तुम्हाला प्रखर उजव्या विचारसरणीचे ठरवून मोकळे झाले, त्यांच्याकडे तुम्ही कसे पाहता?
मला सर्वप्रथम हे सांग की, हा चित्रपट कोणत्या विषयाला केंद्रस्थानी धरून होता? तर हा चित्रपट काश्मीरमध्ये ज्या पंडितांवर दहशतवादाच्या कारणाने अत्याचार झाले, त्या घटनांवर आधारित होता. आता या घटना केव्हापासून डाव्या किंवा उजव्या विचारसरणीवर आधारित आहेत? हा तर मानवतेचा प्रश्न आहे. डावी विचारसरणी म्हणजे काय, हे मला माहिती नाही. डाव्या विचारसरणीची माणसे जे बोलतात, तेवढेच मला ठावूक आहे. आम्ही मानवतावादी आणि पुरोगामी आहोत, असे ते म्हणतात. स्वातंत्र्य, स्वराज्य आणि न्याय याचीच मागणी ते करतात. जर त्यांच्या म्हणण्यानुसार हा उजव्या विचारसरणीचा चित्रपट आहे, तर डावे दहशतवादाला अनुमोदन देतात का? मानवतेचा मुद्दा विचारात घेतला तर, ज्यांच्या पूर्वजांची ही जमीन होती, जिथे आज एक संपूर्ण संस्कृती रुजलेली होती, आज ती माणसे तिथे राहत नाहीत. हे मानवी हक्कांचे उल्लंघन नाही का? हिंदूंच्या पवित्र भूमीवर आपण नजर टाकली, तर दक्षिणेतील काही स्थाने आणि काशी सोडल्यास तिसरे नाव काश्मीरचे आहे. पतंजली योग, पाणिनीचे व्याकरण, भरतमुनींचे नाट्यशास्त्र, कलेची विद्येची देवता शारदा, या सर्वांची ही भूमी, देवळे नष्ट केली गेली. नाट्यगृहे नष्ट केली. हे सर्व चित्रपटांतून दाखवले आहे. हे सर्व चुकीचे की बरोबर, हे सांगितले नाही, तो सर्वस्वी प्रेक्षकांचा प्रश्न! चित्रपटात केवळ घडलेल्या घटना दाखवल्या आहेत. म्हणूनच मी या डाव्या- उजव्या विचारसरणीवर भाष्य करत नाही. माझ्या मतानुसार संपूर्ण हिंदुस्थान उजव्या विचारसरणीचा आहे आणि हे सत्य आहे. हा देश परंपरा, प्रथा, संस्कृतीला घेऊन जाणारा आहे. आज देशाबाहेरील भारतीय माणूससुद्धा आपल्या मुलांना रामायण- महाभारताच्या गोष्टी सांगतो. सर्व सण- उत्सव साजरे करतो. हा सर्व समाज भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवणारा, त्याबद्दल आपुलकी असलेलाच आहे. ज्या लोकांना भारतावर विश्वास नाही, या भारतभूमीपासून ज्यांना मुक्ती हवी आहे, हीच आहे का आपली जन्मभूमी, असा ज्यांना प्रश्न पडतो, ते डावे! त्यांच्या केवळ तक्रारीच आहेत. फटाकेच का फोडता, आनंदच साजरा का करता, अशा असंख्य गोष्टींचा त्यांना त्रास होतो.

कोणतेही चित्रपट प्रचारकी असतात किंवा नसतात आणि त्यांचे प्रचारकी असणे चांगले किंवा चित्रपटाने प्रचारकी असू नये, या दोन्ही मुद्द्यांवर वाद रंगतात. तुमचं निर्माते, दिग्दर्शक म्हणून याबाबत काय मत आहे?
मला सांग, आज असा कोणता कलाप्रकार अस्तित्वात आहे, जो एक विचार पुढे आणत नाही? एखादे पुस्तक, कविता, चित्र; पण म्हणून त्याला प्रचारकी म्हणू नये. तो केवळ त्या कलेचा विषय असतो. त्याचे मर्मच ते असतं.

शहरी नक्षलवादाविषयी तुम्हाला आलेले अनुभव काय सांगाल?
हैदराबादमधील ज्या दहा व्यवसाय शिक्षण देणार्‍या संस्था आहेत, तिथे शिक्षण घेताना वैतागून मी इतर ठिकाणी काय शिकवले जाते, ते पाहत होतो. त्यापैकी ‘आयएसबी’मध्ये मी एक कोर्स करत होतो. त्या कोर्सचं नाव होतं ‘आय एम बुद्धा.’ ज्या नावाने आज आमची कंपनीसुद्धा रजिस्टर्ड आहे, तिथेच मला ही कल्पना सुचली. बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध नाही तर ‘बुद्धी प्राप्त झालेला कोणताही व्यक्ती.’ त्यात मग तुझाही समावेश आहे आणि माझाही आहेच. प्रत्येक व्यक्ती बुद्धी घेऊनच जन्माला येतो; पण आपण कालौघात आपल्यातील बुद्धाला संपवतो. हा विषय घेऊन माहितीपट तयार करायचा होता. माझ्या एक लक्षात आलं की, एकेकाळी आपण डाकूंना ‘हिरो’ बनवत होतो, दहशतवाद्यांना ‘हिरो’ बनवत होतो. मुळात व्यक्ती कसाही असेल जर त्याच्या हातात बंदूक आहे, तर तो व्यक्ती मला मुळीच पटत नाही. संशोधन केलं आणि चित्रपट बनवला. तो चित्रपट प्रदर्शित करण्यावर अनेक बंधने आली. मी चित्रपट घेऊन अक्षरशः महाविद्यालयांमध्ये-विद्यापीठांमध्ये फिरलो. जेएनयुमध्येही चित्रपट दाखवला. त्यानंतर त्या संशोधनावर आधारित पुस्तक प्रकाशित केले. सर्वाधिक विक्री झालेले हे पुस्तक होते.

दक्षिण भारतीय चित्रपटांबाबत तुमचं काय मत आहे? एकंदरच जागतिक चित्रपटाकडे पाहता, भारतीय चित्रपटाचे भवितव्य काय? एक ‘फिल्ममेकर’ म्हणून तुम्हाला कोणता चित्रपट जास्त आवडतो आणि का?
कदाचित दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा बॉलिवूडचा दर्जा कमी झाला किंवा दक्षिणेतील चित्रपटांमधून जे भारतीयत्व दिसून येतं, त्याची ओढ आपल्या मनाला आहे. आज ‘जनरेशन-झी’ला खूश करण्यासाठी टपोरी भाषेतील संवाद लिहिणे किंवा अशा गोष्टी जर आपण करत असू, तर तूच सांग काय भवितव्य आहे आपल्या चित्रपटांचं? तुझ्या पुढच्या प्रश्नाचेही उत्तर मी आताच देतो. रोहित शेट्टी आणि राजू हिराणी यांचे चित्रपटसुद्धा मला आवडतात. वैचारिक मतभेद असले, तरी कलेला कसलीच बंधने नसतात. आज सुरक्षेच्या कारणास्तव मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघू शकत नाही. पण, ‘कांतारा’ मी आवर्जून चित्रपट बघितला होता आणि मला तो तितकाच आवडलासुद्धा! जागतिक दर्जाचा म्हणायचे झाले, तर आल्फ्रेड हिचकॉक आणि स्टिव्हन स्पीलबर्ग यांचे चित्रपट मला आवडतात. अनेक जटील विषय अत्यंत सोप्या भाषेत सांगणारे हे चित्रपट मला आवडतात. मी ही त्यांना कॉपी करायचा प्रयत्न करतो.

‘आदिपुरूष’ चित्रपटाला समाजमाध्यमांवर मिळणार्‍या प्रतिक्रिया पाहता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मी अजून ‘आदिपुरुष’ चित्रपट पाहिलेला नाही. अंधार्‍या खोलीत माझ्याच चित्रपटांचं काम करतो आहे. त्यामुळे अजूनही माझ्या पाहण्यात-हा चित्रपटात आलेला नाही. तरीही मी माझा विचार सांगतो. याप्रकारे मीही एका ‘प्रोजेक्ट’वर काम करतोय. एका चित्रपटावर काम करताना जर ती कथा आपली नसेल, तर त्या कथेतील पात्रांविषयी आपल्याला किती छेडछाड करण्याचा नैतिक अधिकार आहे? जे आस्थेचे विषय असतात, त्या विषयांवर काम करताना काही निर्बंध घालून घ्यायला हवेत. त्यात स्वतःच्या कल्पनाविस्ताराला वाव नसावा.
 
यानिमित्ताने ‘अ‍ॅनिमेटेड’ चित्रपटांविषयीचं तुमचं मत जाणून घ्यायला मला आवडेल...
मला वैयक्तिकरित्या विचारशील तर ‘अ‍ॅनिमेटेड’ चित्रपटांवर काम करायला मला आवडत नाही. आगामी चित्रपट ‘दिल्ली फाईल्स’ येतोय, त्यातही मी संपूर्ण चित्रीकरण माणसांना घेऊनच करतो आहे. मी आजही जुन्या काळातील चित्रपटनिर्मितीचा विद्यार्थी आहे, ‘ग्रीन स्क्रीन’ लावून कार्य करणे, मला फारसे रूचत नाही.

‘हू किल्ड शास्त्री’ हे तुमचं पुस्तकही सध्या तितकचं चर्चेत आहे. त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला जे म्हणायचंय ते सत्य असल्याचा दावा तुम्ही या पुस्तकातून करता की ती केवळ एक शक्यता म्हणता येईल?
पुस्तकाच्या नावाप्रमाणे हा एक प्रश्नच आहे. हा विषय दोन्ही बाजूने निःपक्षपातीपणे मांडायचा प्रयत्न मी या पुस्तकातून केला आहे. कोणत्याही निष्कर्षावर मी पोहोचलेलो नाही. हा माझा एक आध्यात्मिक प्रवास आहे असेच मी म्हणेन. भारतीय मूळ सिद्धांत त्याग आणि तपस्या यांच्यावर आधारित आहे. कसं आहे, मी भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान बाळगतो, जगातील विचारवंत, मानसशास्त्रज्ञ जेव्हा आपल्या कथांबद्दल कुतूहल दाखवतात, तेव्हा समजावं त्यात नक्कीच उच्चप्रतिचा आशय आहे.

बरं, चित्रपट म्हणजे दृक्श्राव्य माध्यम तुम्हाला अत्यंत उत्तमरित्या हाताळता येतं. मग असं असताना पुस्तक लिहून हा सगळा लेखनप्रपंच करण्यामागे काही खास कारण?
खरंतर मी सुरुवातीपासूनच लेखन करतो. चित्रपट निर्मितीची आवड कशी, असा प्रश्न तू विचारायला हवास. महाविद्यालयात असताना नाटक वगैरे मी स्वतःच लिहून बसवायचो; पण चित्रपटाचं माध्यम मला आवडतं, आपण एकाचवेळी एका मोठ्या जनसमुदायापर्यंत या माध्यमातून पोहोचतो. मागे म्हणालो तसं, एक चौथी मिती, हेही कारण आहेच.

तुमच्या दृष्टीने चित्रपट म्हणजे काय?
आपण सगळे काही ना काही गोष्टी सांगत असतो. या सगळ्या गोष्टीच आहेत. आपण आज गप्पा मारतोय, त्याही कथा आहेत. एखादा माणसाचे जेव्हा निधन होते, तेव्हाही त्याच्या निगडित कथा-किस्से मात्र जीवंत राहतात. भिंतीवरचे फोटो काही कामाचे नसतात. धर्म काय आहे? कथाच आहे. अंतराळ आपण पाहिलेले नाही, पण त्याविषयी आपण ऐकलेल्या कथा आहेत. या कथा व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा, म्हणजे चित्रपट. चित्रपट द्विमितीतून दिसतो, परंतु त्याला एक तिसरी मितीसुद्धा आहे. आपण पाहतो, ऐकतो आणि अनुभवू शकतो. ही अनुभव घेण्याची तिसरी मिती, ती दाखवू शकत नाही, ती दिग्दर्शकाच्या नजरेतून साध्य झाली असते. माझ्या दृष्टिकोनातून चित्रपट आहे तो असा!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.