‘जाईन तिथे संघशाखा उभी करेन’ हे व्रत आचरणात आणणारे गोविंद भास्कर यांनी जनमानसांत संघ रुजवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आणीबाणीच्या काळात संघावर बंदी असताना १८ महिने कारावास भोगल्यानंतरही त्यांनी संघाची साथ सोडली नाही. त्यांच्या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांचीही साथ लाभली. बालपणीच संघ आयुष्यात आला आणि अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते संघमार्गावरच चालत राहिले. या निष्ठावंत संघकार्यकर्त्याविषयी...
हे स्मरण आहे त्या स्वयंसेवकाचे, ज्यांनी विक्रोळीच्या गोदरेज कॉलनीत बाल अवस्थेतच संघशाखेवर हिंदुत्वाचा खडतर मार्ग स्वीकारून शेवटच्या श्वासापर्यंत त्याच वाटेवर, पंढरीच्या वारीतील वारकर्याच्या श्रद्धेने चालायचा निश्चय केला. ते म्हणजे ऐरोलीचे कै. गोविंद भास्कर. गोविंदरावांच्या या प्रवासात अनेक कठीण प्रसंग आले, अनेक अडचणीसुद्धा आल्या. परंतु, गोविंद यांनी ही वाट सोडली नाही. या खडतर प्रवासात अनेक आकर्षणे त्यांना खुणावीत होती. पण, त्याकडे पाठ फिरवून, पूर्ण निष्ठेने संघमार्गावर गोविंद भास्कर चालतच राहिले.
विक्रोळीच्या बाल शाखेवर गोविंद यांनी लहानपणीच प्रवेश केला होता. हळूहळू गोदरेज कॉलनीतील ही शाखा गोविंदच घेऊ लागले. त्यावेळी कै. आप्पा डोंगरे या मातृहृदयी कार्यकर्त्यांकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. अल्पावधीतच गोदरेज कॉलनीतील शाखा एक चांगली शाखा म्हणून गणली जाऊ लागली. संघकामाबरोबर त्यांची नोकरीसुद्धा सुरूच होती. घरच्यांनी जेव्हा त्यांच्या लग्नाचा विचार सुरू केला, तेव्हा काही दिवसांतच त्यांचे लग्न इंदुमती यांच्यासोबत ठरलेसुद्धा.
१९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात संघावर बंदी घातली गेली. गोविंद यांचा साखरपुडा झाला होता आणि लग्नपत्रिकाही छापल्या होत्या. मात्र, आधी ‘लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’ ही तानाजी मालुसरे यांची शिकवण गोविंद यांनी प्रत्यक्ष आचरणात आणली. त्यांनी सत्याग्रहात सहभाग घेतला होता आणि जे व्हायचं होतं ते घडलंच... आणीबाणी उठेपर्यंत तुरुंगवास.
लग्न पुढे ढकलता येत नव्हते, त्यातच त्यांची आईसुद्धा आजारी होत्या. मुलाचे लग्न पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. अशावेळी संघ कार्यकर्ते मधुकर देसाई हे लग्नपत्रिका घेऊन तुरुंगाधिकार्यांना भेटले आणि सात दिवसांचा पेरोल मिळवून गोविंद यांना घरी आणले. अक्षता पडल्याबरोबर मुंडावळ्यांसहित या वर-वधूंना आईचे आशीर्वाद घेण्यासाठी राजावाडी रुग्णालयामध्ये मधुकरराव घेऊन गेले. तिथून आल्यानंतर स्वागत समारंभ सुरू झाला. खरंतर लग्नासाठी तुरुंगातून आलेला नवरा मुलगा लग्नानंतर परत तुरुंगातच जाणार ही वास्तविकता होती. परंतु, हिंदुत्वाच्या वाटेवरील या प्रवासात वारकर्याच्याच निष्ठेने मोलाची साथ त्यांच्या पत्नीकडून त्यांना मिळाली. जाणूनबुजून गोविंदरावांसारखा धगधगता अंगार इंदुमती यांनी आपल्या पदरात घेतला आणि तो एवढ्या कुशलतेने सांभाळला की, तो अंगारही विझता कामा नये आणि पदरही जळता कामा नये.
काही नातेवाईकांना काळजीपोटी हे लग्न मोडून दुसरे स्थळ पाहावे आणि लग्न उरकावे, असे वाटत होते. मात्र, इंदुमती यांनी आपला निर्णय ठामपणे सांगितला होता, ज्याच्या नावाने सुपारी फुटली, ज्याच्या नावाचा टिळा साखरपुड्याच्या निमित्ताने लागला, त्याच्यासाठी सारी हयातभर थांबायची तयारी आहे. कुणीही दुसर्या स्थळाचा विचारसुद्धा करू नये. कालांतराने आणीबाणी उठली आणि १८ महिने तुरुंगवास भोगून गोविंदराव घरी परतले.
खर्या अर्थाने ते संसाराला लागले; पण संघकामात कुचराई केली नाही. उलट दोघे मिळून संपर्क करू लागले. विक्रोळीहून जेव्हा ते मुलुंडला राहायला आले, तिथेही त्यांनी शाखा सुरू केली. रमाबाई वाडी, विठ्ठल नगर ही सर्व हाताच्या पोटावर जगत असलेली वस्ती. गोविंद यांनी घरोघरी जाऊन केलेल्या संपर्काने सारी वस्ती संघमय झाली. तिथे होणारे संघाचे उत्सव हे त्या वस्तीचे उत्सव झाले.
संघात योगचाप म्हणजेच लेझीम हा विषय होता. गोविंदरावांनी त्याला हलगीची साथ देऊन प्रात्यक्षिके बसविली. मधल्या काळात त्याचा परिणाम असा झाला की, विठ्ठल नगरचे लेझीम पथक अनेक खासगी तसेच सार्वजनिक कार्यक्रमात जावू लागले. त्यातून येणार्या पैशातून सर्वांचे गणवेश पूर्ण होऊ लागले. संघाच्या शिबिरादरम्यान आपल्या शाखेतील उपस्थिती सर्वांत जास्त असावी, यासाठी गोविंद यांनी एक योजना आखली. दिवाळीत भगव्या रंगाचे कंदील बनवायचे आणि घरोघरी ते विकायचे. असे करत त्यांनी संपूर्ण मुलुंड (प.) भगवे करून टाकले होते.
पुढे १९८६ साली भास्कर परिवार नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये राहायला आला. ‘जाईन तिथे शाखा उभी करेन’ हे व्रत जणू गोविंदराव यांनी घेतलेच होते. ऐरोलीतही त्यांनी भक्कम शाखा उभी केली. मध्यंतरी नोकरी गेली असली, तरी संघकामात त्यांनी कधी खंड पडू दिला नाही. माळी समाजाला एकत्र येण्यासाठी आपले हक्काचे स्थान असावे, असे वाटणार्या काही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांनी भव्य ‘सावतामाळी भवन’ ऐरोलीत उभे केले. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार्या गोविंद यांच्या स्वभावामुळे माळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उभे राहिले. सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक आदर्श समाजासमोर ठेवला.
गोविंदरावांचा थोरला मुलगा निलेश भास्कर हे सन २००१ पासून प्रचारक आहेत. वेगवेगळ्या जबाबदार्या यशस्वीपणे सांभाळत आज ते कोकण प्रांत सहसंपर्क प्रमुख अशी जबाबदारी सांभाळत आहेत. धाकटा मुलगा वितीन भास्कर आपली अभिनयाची आवड सांभाळत घर सांभाळतो आहे. गोविंदरावांच्या पत्नी इंदुमती या बचत गट, संस्कार वर्ग, माळी समाज, भाजप अशा प्रकारच्या कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असतात. संघाचे घर कसे असावे, याचा आदर्श गोविंदरावांनी घालून दिला; तो आदर्श इंदुमती या मोठ्या कर्तव्य भावनेने जपत आहेत.
नियमितपणे वैष्णोदेवीला जाणारे गोविंद भास्कर यावेळी प्रथमच पत्नीलाही बरोबर घेऊन गेले होते. त्याशिवाय त्यांची मित्रमंडळीदेखील बरीच होती. नियमित प्राणायम योगासन करणारे, निरोगी प्रकृती असलेले गोविंद, हृदयक्रिया बंद पडून प्रवासातच हसत-खेळत गाणी म्हणत, उपचाराची कोणतीही संधी न देता, दि. ८ डिसेंबर २०१० रोजी आपल्यातून निघून गेले. संघशाखेवर ‘काश्मीर किसका हैं...?’ हा खेळ खेळणार्या गोविंद यांनी ‘काश्मीर मेरा हैं,’ असे म्हणत काश्मीरमध्येच प्राणत्याग केला. संघासाठी वाहून घेतलेल्या या स्वयंसेवकाचे कार्य सदैव स्मरणात राहील.