
नवरात्रीच्या उत्सवात आपण शक्तीची, आदिशक्तीची पूजा करतो. ही शक्ती फक्त देवळातील मूर्तिपुरती मर्यादित नसून समाजातही अशा आदिशक्ती आहेत. अशा कणखर, प्रेरणादायी स्त्रियांपैकी एक म्हणजे ललिता पवार. दृष्टिव्यंग असलेली ही मुलगी दृष्टिहीन मुलींना नृत्याचे धडे देत आहे. दृष्टिहीनांच्या परिघात नर्तकी म्हणून ओळखली जाते.नियतीने जन्मतःच तिला दृष्टिदोष दिला. पण, म्हणून ती खचली नाही. शालेय जीवनापासूनच तिच्या मनात नर्तकी थिरकत होती. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमामुळे दृष्टिव्यंगांचा अडथळा तिच्या प्रयत्नांच्या आड येऊ शकला नाही. अवघ्या पंचविशीत ती दृष्टिहीनांच्या परिघात एक प्रसिद्ध नर्तकी आणि कोरिओग्राफर म्हणून ओळखली जाऊ लागली. नृत्याची आवड जोपासणाऱ्या अनेक दृष्टिहीनांसाठी ती मार्गदर्शक, शिक्षिका, आधारवड अन् वाटाडी म्हणून काम करीत आहे. ती म्हणजे ललिता पवार! तिच्या नावाचे एका जुन्या अभिनेत्रीच्या नावाशी साधर्म्य आहेच; पण तिचा जीवनपटही चित्रपटातील एखाद्या कथेला शोभावी अशी आहे.
ललिता पवार ही ‘पर्शियल ब्लाईंड’ मुलगी. ती मूळची तेलंगणची. पण तिचा जन्म हा मुंबईतलाच. घरची परिस्थिती अगदीच बेताची. पोटाची खळगी भरायला आई-वडील दोघेही बांधकामाच्या साईटवर काम करायचे. त्यात वडील, भाऊ, आजी, पणजी सारेच पर्शियल ब्लाईंड. हा आनुवंशिक दोष तिच्या कुटुंबात आहे. मात्र, हा दृष्टिदोष सगळ्यांनी स्वीकारला होता. पण, ललिताकडे हे भेदून पुढे जाण्याची ‘दृष्टी’ होती. स्वीकारून ती जगण्याकडे सकारात्मकतेने बघते आहे. नृत्य ही खरेतर पाहून शिकण्याची कला. मग ललिता नृत्याच्या प्रेमात कशी पडली, हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय. दादर पूर्वेतील ‘श्रीमती कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाईंड’मध्ये शिकत असताना ललिता नृत्य करायची. या चार भिंतीत तिच्यावर नृत्याचे संस्कार घडू लागले. कधी नृत्याचे शिक्षक नाही आहे किंवा उशिरा आले, तर त्या वेळात ललिता तोडके-मोडके नृत्याचे धडे ती सहकार्यांना देत असायची. हे करता करता तिच्यात शिक्षक आकारास येत गेला. पुढे तिने भरतनाट्यममध्ये तीन परीक्षा पास केल्या. आज कथ्थक नृत्यांगना म्हणून ती दृष्टिहीन मुलींच्या जगतात घट्ट पाय रोवून आहे. ‘आम्ही विशेष आहोत. नुसते विशेष नाही तर खास आहोत,’ असे ललिता अभिमानाने सांगते. तिच्या बोलकेपणातून तिचा आत्मविश्वास अधोरेखित होतो.
अगदी सामान्य मुला-मुलींसोबत तिने नृत्य शिकायला सुरुवात केली. त्यांच्यात आपण मागे पडायला नको, आपल्यातील कमीपणा कलेच्या आड यायला नको, हा तिचा निर्धार होता. आकलनशक्ती चांगली असल्याने ती नृत्याच्या स्टेप झटकन शिकत गेली. फारच कमी कालावधीत नावाजलेली नृत्यांगना म्हणून नावारूपाला आली. काही वेळा गुरूंनी हात धरून तिला नृत्य शिकवले, तर काही वेळा केवळ शब्दांच्या सूचनांवर ती बिनचूक नृत्य करायची. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक परिश्रमाच्या जोरावर तिने ही कला अवगत केली.
दृष्टिहीनांनी नृत्य कधी पाहिलेले नसते. त्यामुळे जरी आवड असली, तरी त्यांना नृत्य शिकवणे जिकिरीचे असते. बर्याचदा अशा मुली डीजे किंवा एखादे गाणे लागल्यावर नुसत्या उड्या मारतात, हातपाय हलवतात; पण त्यात रचना नसते. त्यावेळी ललिता त्यांच्या हातात हात घालून त्यांना व्यवस्थित स्टेप शिकवते. कमला मेहता शाळेतील गॅदरिंग असो किंवा खासगी लास, ललिता अनेक दृष्टिहीन मुलींना नृत्यकलेची दृष्टी देत आहे.
आठ तासांची नोकरी आणि जाऊन-येऊन चार तासांचा नियमित प्रवास करून वसतिगृहात थकून आल्यावरही नृत्य करण्यासाठी तयार असते. यासाठी तिच्यात ‘एनर्जी’ कायम असते. कथ्थक, भरतनाट्यमच्या स्टेपने तिच्यातला त्राण जणू निघून जातो. ललिताच्या कलेला ‘उडान’ या सामाजिक संस्थेत काम करताना नवी दिशा मिळाली. या संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात तिला ठाण्यातील कालिदास नाट्यगृहात रंगमंचावर परफॉर्म करण्याची मोठी संधी मिळाली. त्या क्षणाची आठवण सांगताना तिच्या चेहर्यावर आजही आनंद झळकतो. ‘आम्हीही करू शकतो, आणि अगदी अचूक करू शकतो,’ हा संदेश त्या कार्यक्रमातून अनेकांच्या मनात पोहोचल्याचे ती सांगते.
सध्या नवरात्राच्या दिवसांत ललिता दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दांडिया व इतर लोकनृत्यांचे धडे देत आहे. ‘दृष्टी नसली, तरी ते अचूक दांडिया खेळतात,’ असे ती कौतुकाने सांगते. तिच्या मते, ही फक्त स्टेप शिकवण्याची गोष्ट नाही, तर आत्मविश्वास देण्याची प्रक्रिया आहे. ‘तुम्ही स्पेशल आहात, हे लक्षात ठेवा हा,’ सकारात्मक संदेश ती प्रत्येक मुला-मुलींना देते.
भविष्यात स्वतःची अकादमी सुरू करण्याचं तिचे स्वप्न आहे, जेथे दृष्टिहीनांसोबतच इतर विशेष व्यक्तींनाही नृत्यकला जोपासता येईल. देवाने काही कमी दिले असे मला कधी वाटले नाही. उलट, लोकांच्या कौतुकाच्या नजरा आमच्याकडे वळतात, हेच आमचं सामर्थ्य आहे, असं ती आनंदाने सांगते.
नवरात्रीत आपण आदिशक्तीची पूजा करतो. पण, खरी आदिशक्ती तर अशीच संकटांवर मात करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी. ललिता पवार ही त्याच आदिशक्तीची मूर्तिमंत प्रतिमा आहे. तिच्या भविष्यकालीन स्वप्नपूर्तीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तिला विशेष शुभेच्छा!
ज्योत्स्ना कोट-बाबडे