कांतारा चॅप्टर १ : लोकसंस्कृतीदर्शनाचा नेत्रसुखद अनुभव

    04-Oct-2025
Total Views |

2022 साली प्रदर्शित झालेल्या ‌‘कांतारा‌’ या चित्रपटाने देशविदेशात एकच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील लोकसंस्कृतीचे लोकरंग, समर्पक संगीत आणि एकूणच वेगळ्या पठडीतील रंजक कथानकाची त्यावेळी बरीच चर्चा झाली. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही कमाल करून दाखवली. त्यानंतर 2023 साली ऋषभ शेट्टीने ‌‘कांतारा चॅप्टर 1‌’ची घोषणा केली आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता होती. अखेरीस परवा दि. 2 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‌‘कांतारा 1‌’चं बजेट 16 कोटी रुपये होतं, तर बॉक्स ऑफिसवरील कमाई ही 400 कोटींहून अधिक होती. आता ‌‘कांतारा चॅप्टर 1‌’चं बजेट तब्बल 125 कोटी इतकं आहे. त्यामुळे हा चित्रपट भव्यदिव्य आहे, यात काही नवल नाही. तेव्हा हा चित्रपट नक्की कसा आहे, ते जाणून घेऊया...

एकीकडे घनदाट अरण्य, सुबक बांबूच्या झोपड्या, नितळ जलप्रवाह, अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या वनात वास्तव्य असणारे आदिवासी आणि दुसरीकडे जंगलापासून कोसो दूर उंच किल्ल्यावर असलेला राजाचा आलिशान राजमहाल... अशा नयनरम्य दृश्यांसह ‌‘कांतारा चॅप्टर 1‌’ हा चित्रपट पहिल्याच नजरेत मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी होतो.

चित्रपटाची गोष्ट ही साधारण 500-600 वर्षांपूवची, जेव्हा पोर्तुगीज-डच समुद्रमार्गे भारतात व्यापारासाठी दाखल व्हायचे आणि नंतर हळूहळू त्यांनी देशातील विविध भागांत हातपाय पसरले. कांतारा म्हणजे देवाचं वन... एक रहस्यमय जंगल, जिथे तेथील स्थानिकांशिवाय इतरांना प्रवेश नाही. त्यांचे देव पंजुल आणि गुलिगा यांनी त्यांना संरक्षित केलेलं. बांगरा राज्याचा पश्चिमेकडून आलेला क्रूर राजा. बांगरा घशात घातल्यानंतर त्याचे आता ‌‘कांतारा‌’वरही एकहाती वर्चस्व प्रस्थापित करायचे मनसुबे होते. पण, कांतारामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच, तिथेच त्याचा अंत झाला. त्यामुळे रहस्यमय कांताराकडे कांतारावासीयांशिवाय कोणीही फिरकत नाही.

पुढे अनेक वर्षांनंतर, राजाच्या मृत्यूनंतर राजाचा मुलगा विजयेंद्र, आपले राज्य मुलगा कुलशेखरच्या (गुलशन देवैया) हवाली करतो. कुलशेखर त्याच्या राज्याभिषेकानंतर राजा तर बनतो, पण तो सत्तामुकुटामुळे आणखनीच उन्मत्त होतो. कुलशेखर हा प्रारंभीपासूनच लोभी, क्रूर आणि व्यसनाधीन. कांताराच्या भयभीत करणाऱ्या वास्तवाची माहिती असतानाही, एके दिवशी तो शिकारीसाठी या घनदाट अरण्यात प्रवेश करतो. परिणामी, शाही सैन्य आणि स्थानिकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडते. पण, कांताराच्या आदिवासी लढवैय्यांपुढे राजाचा आणि त्याच्या सैन्याचा काही टिकाव लागत नाही आणि कुलशेखर आल्या पावलांनी पळ काढतो. पुढे चित्रपटाचा मूळ नायक आणि योद्धा बर्मे (ऋषभ)च्या नेतृत्वाखाली कांताराचे रहिवासी त्यांच्या प्रदेशाबाहेर पाऊल टाकतात आणि प्रथमच बाहेरील जग पाहतात. बाहेरील जग आपल्यापेक्षा किती वेगळं आणि पुढारलेलं आहे, याची त्यांना अनुभूती होते आणि त्यानंतर जीवनशैली सुधारण्यासाठी जंगलातील उपलब्ध संसाधनांचा वापर करण्यास ते सुरुवात करतात. व्यापार, युद्धशास्त्र या इतकी वर्षं अपरिचित संकल्पनांशी कातांरावासीयांचा परिचय होत जातो. पण, बाहेरच्या राज्यात अहंकारी राजा कुलशेखर आणि त्याची बहीण, राजकुमारी कनकवती (रुक्मिणी वसंत) यांचा राज्यावर ताबा आहे. मात्र कांताराचे लोक, बर्मे, राजा, राजकुमारी आणि दैव या सगळ्यांचा जेव्हा सामना होतो, तेव्हा खऱ्या कथेला प्रारंभ होतो.

‌‘कांतारा‌’च्या पहिल्या भागात वराह अवताराचे दर्शन घडले होते, तर या दुसऱ्या भागात व्याघ्रदेवतेचा अद्भुत अवतार पाहायला मिळतो. पहिल्यांदाच कांताराच्या बाहेर पडलेल्या लोकांना बांगरा आणि इतर लोक खरंच स्वीकारतात का, अहंकारी कुलशेखरचा अहंकार बर्मे कसा उतरवतो आणि दैव त्याला कशा प्रकारे साथ देते, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल. कारण, या चित्रपटाचा ‌‘क्लायमॅक्स‌’ अतिशय आगळावेगळा आणि प्रेक्षकांना अक्षरशः चक्रावून टाकणारा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केले असून, तोच या चित्रपटाचा मूळ नायकदेखील आहे. याशिवाय, कथालेखनही त्यानेच केले आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर ऋषभ शेट्टीने या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता होती आणि ऋषभने यासाठी पुरेपूर मेहनत घेतल्याचे चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात प्रतिबिंबित होतं. खरं तर एकाच व्यक्तीने एकाचवेळी दिग्दर्शक, नायक आणि कथालेखनाची भूमिका पार पाडणे हे सर्वस्वी आव्हानात्मकच. अशाने चित्रपटाच्या एक ना धड भाराभार चिंध्या होण्याचीच शक्यता अधिक असते. पण, ऋषभने या तिन्ही भूमिकांना उत्तम न्याय दिला असून, त्याचे कौतुक करावे तितके कमीच.

गुंतागुंतीची कथा असो किंवा बारकावे टिपणारी दृश्यं असो, प्रत्येक घटकावर ऋषभची पकड दिसून येते. कोणत्याही दृश्यात चित्रपट क्षणभरही रेंगाळत नाही. एवढेच नाही तर ‌‘व्हिएफएक्स‌’चं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे ‌‘कांतारा चॅप्टर 1‌’ हा चित्रपट. तसेच हाणामारीचे प्रसंग, लढाया वगैरे मोठ्या पडद्यावर तितक्याच ताकदीने मांडण्यात दिग्दर्शक म्हणूनही ऋषभ शेट्टी यशस्वी ठरला आहे.

कथालेखनाविषयी बोलायचं तर, कथा बरीच गुंतागुंतीची आहे. ‌‘क्लायमॅक्स‌’ही उत्तम आणि तितकाच चक्रावून टाकणारा. पण, हा चित्रपट ‌‘कांतारा‌’चा ‌‘प्रीक्वेल‌’ अर्थात मूळ चित्रपटाच्या कथानकापूवचे कथानक दिग्दर्शकाने सादर केले आहे. म्हणूनच या चित्रपटाची कथा कांतारापेक्षा जास्त बर्मेची वाटते. चित्रपटाच्या पहिल्या भागात वन्य अधिकारी विरुद्ध आदिवासी अशी संघर्षकथा होती, तर या भागात राजा विरुद्ध कांतारा असा संघर्ष पाहायला मिळते. पण, कुणी या चित्रपटाचा पहिला भाग पाहिलेला नसेल, तरी या चित्रपटाचे कथानक नक्कीच समजू शकते.
चित्रपटात अनेक ठिकाणी काही संवाद हे मूळ कन्नड भाषेतच ठेवले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना उपशीर्षकांचा आधार घ्यावा लागतो.

चित्रपटात काही गोष्टी थोड्याशा खटकणाऱ्याही आहेत. जसे की, कांताराचे आदिवासी, बर्मे हे मुळी आदिवासी. त्यांचा बाहेरच्या जगाशी यापूव कधीही संबंध आलेला नाही की त्यांनी जग पाहिलेलं, अनुभवलेलं नाही. पण, राजाशी आणि कातांराबाहेरील लोकांशी ते मात्र उत्तम भाषेत संवाद साधतात. म्हणजे राजाची शुद्ध भाषा कांतारावासीयांनाही समजते आणि कातांरावसीयांची भाषाही समजून घ्यायला राजाला काडीमात्र अडचण होत नाही. असो. चित्रपटातील कथानक पुढे न्यायचे म्हणजे संवाद हा ओघाने आलाच आणि म्हणूनच कदाचित दोघांची समान भाषा हा दिग्दर्शकाने ‌‘सिनेमॅटिक लिबट‌’च्या संकल्पनेतून साकालेला संवादसेतू समजावा.

ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत, गुलशन देवय्या, जयराम अशा मुख्य कलाकारांची या चित्रपटात भूमिका आहे. ऋषभ शेट्टी दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून दोन्हीकडे चमकतोय, असं म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शनात जितकी कमाल त्याने केली आहे, तशीच किंबहुना त्याहीपेक्षा ऋषभच्या अभिनयाला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. रुक्मिणी राजकुमारी म्हणून चित्रपटात भाव खाऊन जाते आणि योद्धा म्हणूनही ती तितकीच ताकदीची भासते. गुलशन देवय्या नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा अप्रतिम भूमिकेत दिसतो. इतर कलाकारांचा अभिनयसुद्धा तितकाच वाखाणण्यासारखा आहे. दिग्दर्शक आणि मुख्य भूमिकेत असल्यामुळे साहजिकच ऋषभ शेट्टी प्रामुख्याने चित्रपटात झळकत असला,तरीही अन्य कलाकारांच्या भूमिकाही तितक्याच कसदार झाल्या आहेत.

या चित्रपटाचा पूर्वार्ध जितका हलका-फुलका आणि डोळ्यांना सुखावणारा आहे, तितकाच उत्तरार्ध आक्रमक, उग्र आहे, असे म्हणता येईल. पण, मध्यांतरानंतर प्रेक्षक आपल्या खुचवरून जराही हलणार नाही, याची पुरेपूर काळजी ऋषभ शेट्टीने दिग्दर्शक म्हणून घेतलेली दिसते. चित्रपटातील प्रत्येक दृश्य ही अंगावर शहारे आणणारी आहेत. सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत हा चित्रपट क्षणभरही कंटाळवाणा वाटत नाही. पहिल्या भागाप्रमाणे चित्रपटाच्या दुसऱ्या भागातील उत्तम संगीताने कथानकाला साजेशी साथ दिली आहे. एकंदरीतच, ‌‘कांतारा चॅप्टर 1‌’ एक नेत्रसुखद अनुभव आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच अनुभव घेण्यासारखा आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 60 कोटी इतकी बक्कळ कमाई केली. त्यामुळे आगामी दिवाळीचा काळ लक्षात घेता, या चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा ओलांडला तरी आश्चर्य नाहीच!

दिग्दर्शक, लेखक : ऋषभ शेट्टी
निर्माते : विजय किरगंदूर, चालुवे गौडा
कलाकार : ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत, गुलशन देवय्या, जयराम
रेटींग : ४.५

- अपर्णा कड