बिपरजॉय चक्रीवादळामुळे गीरच्या जंगलातून १०० सिंहांचे स्थलांतर
13-Jun-2023
Total Views | 349
मुंबई : सध्या देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात 'बिपरजॉय' चक्रीवादळाने थैमान घातले असून त्याचा फटका आता गुजरातमधील गिर अभयारण्यापर्यंत पोहचल्याचे दिसते आहे. गीरच्या जंगलातून जवळपास १०० सिंहांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून या चक्रीवादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये दिसायला लागला आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रातून उंच लाटा उसळत असून यामुळे होणारा धोका लक्षात घेता गुजरात राज्य सरकारने सतर्कता दाखवली आहे. दरम्यान, आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गिर जंगलावर या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याजवळ १०० सिंहांचा कायमस्वरूपी वास्तव्य असून या सिंहांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
'बिपरजॉय' चक्रीवादळ १५ जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा अंदाज आहे. या दरम्यान १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या वेळी आलेल्या वादळामुळे गीर जंगलात बरीच झाडे उन्मळून पडली होती, त्यामुळे यावेळी प्रशासन आधीच सतर्क आहे. दरम्यान, १६ जूनपासून गीर सफारी ४ महिने पावसाळ्यात बंद असते. त्यामुळे गिर सफारी १६ ऑक्टोबरला सुरू होईल.