रोजच्या जगण्यात अनेक माणसांसोबत आपण संवाद साधतो. काही काळानंतर ती माणसं विस्मृतीतदेखील जातात. पण, काही माणसं अशी असतात, जी आपल्यामधल्या core अस्तित्वाला स्पर्शन जातात. माझ्यातल्या शुद्ध ‘असण्याला’, ‘मी’पणाच्या कोणत्याही अवरणाशिवाय ती साद घालू शकतात आणि आजच्या व्यावहारिक कोलाहल जगातसुद्धा अशी निर्भेळता सहजपणे जपणारी व्यक्ती म्हणजे जयंतराव! असामान्य असूनही सामान्य राहण्याची कला साधलेला कर्मयोगी! ‘मृत्यू हीच विश्रांती’ हे वाक्य कधीही केवळ शब्द म्हणून न सांगता, ते प्रत्यक्ष जगलेला माणूस!
जयंतराव या व्यक्तीकडे केवळ एका खिडकीतून पाहताच येणार नाही. सर्व प्रकारच्या जबाबदार्या, नाती आणि माणसं सांभाळूनदेखील त्यातल्या कोणत्याही 'perspective’मध्ये ते अडकलेले नव्हते. भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या ‘पद्मपत्रमिवांभसा’ सारखे ते होते. सगळ्यात असूनही कुठेच नसणारे! तत्वज्ञानाचे शाब्दिक अवडंबर माजवणारे अनेक जण अनेक स्तरांवर दिसतात, पण ते तत्वज्ञान प्रत्यक्षात जगणारा जयंतरावांसारखा माणूस दुर्मीळच! आणि म्हणूनच बहुतेक त्यांच्या केवळ ’असण्याने’ अशक्य वाटणार्या गोष्टीदेखील सहज साध्य बनून जात.
डॉ. हेडगेवारांनी स्थापिलेल्या संघाची तत्त्व अतिशय एकनिष्ठेने पाळणारा तपस्वी सध्याच्या काळात पाहायला मिळणं तसं दुर्मीळच. पण, जयंतरावांच्या रूपाने ते देखील अनुभवता आलं. संघाच्या प्रार्थनेमधील ’श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्’ यातील ’सुगं कारयेत् ’ हा समतोल त्यांनी फार सुंदरपणे साधला होता. अनेक अडचणी, समस्या यांना तोंड देताना त्याबद्दल त्यांनी कधीही त्रागा केल्याचं आठवत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याबद्दल कोणताही अभिनिवेश बाळगलेला कधीही अनुभवास आला नाही. तत्वनिष्ठ जगण्याचा एक सहपजपणे होणारा ‘side effect म्हणजे त्यातून निर्माण होणारा ’मला हे चालत नाही’ हा अहंभाव आणि तो त्यांच्यामध्ये एक कणदेखील नव्हता. ‘माझा कुणालाही कधीही भार होऊ नये’ यासाठीच ते सतत प्रयत्नशील असायचे. अगदी स्वतःची बॅगसुद्धा कधी कुणाला त्यांनी उचलून नेऊ दिल्याची आठवण नाही.
सामाजिक काम करत असताना इतरांशी मतभेद होणं, मग त्यातून येणारी नाराजी आणि कटुता या अतिशय सर्वसामान्य गोष्टी. पण, हा माणूस त्याने कधीही विचलित झाल्याचा अनुभव नाही. अत्यंत परस्पर विरोधी वाटणार्या विचार समूहातदेखील चर्चा घडवून आणण्याची विलक्षण क्षमता त्यांच्यामध्ये होती. ते नेहमी म्हणायचे की, “आपण ज्या समूहामध्ये काम करतो त्या समूहाचा एकत्रित आयक्यू जितका, तितकाच आपलादेखील ‘सेट’ करायचा. मग आपोआप त्यातून मतभेद टळतात आणि सर्वसमावेशक पद्धतीने काम पुढे जातं.” ’मी’पेक्षा ‘आपण’ जे काम करतो आहे ते जास्त मोठं आहे याचा विसर आज भल्याभल्यांना पडलेला दिसतो. पण, त्यांच्या अनेक पद्धतीच्या बैठकी, विविध कार्यक्रमांमधील भाषणांमधून किती सहजपणे याचं एक विद्वत्तापूर्ण उदाहरण त्यांनी आपल्यासमोर उभं केलं आहे, याची जाणीव आज त्यांच्या नसण्याने अगदी ठळकपणे होते आहे.
सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. त्यांच्यासोबतच्या संवादातून एकमेकांविषयी मतं तयार होत जातात. ती जितकी कडक तितकी त्यातली सहजता कमी होत जाते, वागण्यातopacity येत जाते. जयंतराव यालाही अपवाद हीopacity का येते याचं एक मस्त reverse engineeringत्यांनी केलं होतं. ते सांगायचे, बरेच गैरसमज हे मन स्वच्छ नसण्यातून होतात. दुसर्या व्यक्तीवर आपले नियंत्रण कधीच नसते, पण जे आपल्या नियंत्रणामध्ये आहे ते आपलं मन स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करायला हवा... आणि हे ते स्वतः जगताना आपण नक्कीच अनुभवलेलं आहे. त्यामुळेच असेल कदाचित.. आपल्या डोक्यात राग, नाराजी, दुःख यापैकी कोणतंही वादळ त्यांच्या केवळ सोबत असण्याने शमून जायचं.
आपल्याकडे जे आहे ते आपल्यासोबत असणार्या प्रत्येकाला मुक्तहस्ते ते द्यायचे. आणि त्या देण्यामध्येदेखील कुठेही ’कर्ता’ भाव जाणवला नाही. कार्यकर्त्याच्या घरातील एखाद्या लहानग्यापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांशी ते समान उत्कटतेने संवाद साधू शकायचे. जाता जाता एखादी वैदिक गणितातली ट्रिक शिकवायची, गीतेमधला एखादा श्लोक पाठ करून घ्यायचा किंवा मग तत्वज्ञानातील एखाद्या गहन विषयावर काही कॉम्नेटरी... या सर्व गोष्टी योग्य त्या वयोगटानुसार ते समान भावाने करायचे. ज्याला जितकं झेपेल तेवढंच मोजून मापून देण्याची त्यांची स्टाईल एकदम ‘युनिक’ होती. त्यामध्ये कधीही एखादी गोष्ट ’मी शिकवतो आहे’ हा दंभ किंवा हे आत्ता क्षणी काहीतरी महान, तुमचं आयुष्य बदलून टाकणारं काहीतरी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे असा ’महंत ’भाव कधीही कुणालाही जाणवला नसेल आणि बहुतेक म्हणूनच त्यांचं नसणं हे आज सर्वांना आपल्याच घरातील कुणीतरी हरवल्यासारखं वाटणारं आहे.संघाचं काम करत असतानाच अचानकपणे विज्ञानासारख्या मर्यादित विषयाची त्यांना दिलेली जबाबदारी देखील त्यांनी तितक्याच समर्थपणे सांभाळलेली दिसून येते.
विज्ञान क्षेत्रातली मंडळी म्हणजे आधीच ’हुश्शार’.. प्रत्येकाच्या तर्हा पण वेगळ्या.. त्याबद्दल ते म्हणायचे सुद्धा की, “हे अत्यंत बुद्धिमान लोकं म्हणजे जरा विक्षिप्तच असतात.” पण, त्यांना याचीदेखील पूर्णपणे जाणीव होती की, या लोकांचा हा विक्षिप्तपणाच त्यांना नवीन नवीन कल्पना देणारा असतो आणि त्यामुळेच अशा सर्व लोकांचा तर्हेवाईकपणा सांभाळून त्यांना एकत्रितपणे काम करायला लावण्याची तारेवरची कसरत ते सतत करत असायचे. विज्ञान क्षेत्रातील लोकांसाठी त्यांचं संशोधन हेच विश्व... त्यांच्या या विश्वाला धक्का न लावता, त्यांना त्या पलीकडे पाहण्यासाठी उद्युक्त करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती आणि जयंतराव ते खूप सहजपणे करायचे. ही सहजता त्यांच्या ’विद्यार्थी’ असण्यातून आलेली असावी.
त्यांचा स्वतःचा काहीतरी एक शोध सतत चाललेला असायचा असा अनुभव आहे. या सर्व वैज्ञानिकांशी होणार्या संवादांमधून काहीतरी एक connecting the dots’ करण्याचा त्यांचा स्वतःचा प्रवासदेखील चाललेला असावा असं वाटतं आणि तो अर्थात त्यांनी हातळलेल्या विषयांमधून तो दिसून येतो. स्वामी विवेकानंद आणि विज्ञान, जगदीशचंद्र बसू यांचे विज्ञानविषयक विचार, भगिनी निवेदितांचा जगदीशचंद्रांच्या कार्यावर असणारा प्रभाव, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वैज्ञानिकांचा सहभाग, भारतीय तत्वज्ञान, विशेषतः पंचमहाभूत सिद्धांत आणि विज्ञान, भारतीय शास्त्रीय संगीत आणि विज्ञान, sustainability भारताची प्रशासकीय व्यवस्था, वैज्ञानिक धोरणे, भारतीय लोकशाही अशा अनेक विषयांवरचे त्यांचे विचार हे त्यांच्यामधल्या विद्यार्थीपणाचे पुरावे..! जयंतराव हे एक सच्चे वैज्ञानिक होते.
आता ’वैज्ञानिक’ म्हणजे विज्ञान संस्थेत ९ ते ५ काम करणारा कर्मचारी या सध्याच्या व्याख्येत ते बसत नाहीत, त्यामुळे बहुतेक ही अतिशयोक्ती वाटू शकेल. पण, प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे पाहण्याची त्यांची वृत्ती म्हणजे वैज्ञानिक वृत्तीच नाही का? विज्ञान संस्थेत राहून हजारो संशोधन पत्रिका लिहिणारे, विज्ञानाचं हे मूलभूत तत्त्व आपल्या जगण्यात अंगीकारणारे किती ’वैज्ञानिक’ आज असतील? पण, किमान ज्यांना ज्यांना ’जयंतराव’ हा परिसस्पर्श झाला, ते तरी याला नक्कीच अपवाद ठरावा, यासाठी प्रयत्नशील राहतील, अशी आशा आहे आणि तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
प्रचारकांचं जीवन म्हणजे एका कर्मयोगी संन्याशाचं जीवन. हिमालयात राहून तप करणार्या संन्याशापेक्षा थोडंसं बहुधा कठीणच! संन्यस्ततेला सर्व प्रकारे आव्हान देणार्या व्यवस्थेत राहून देखील आपण स्वीकारलेल्या मार्गावर कोणतीही साधनशुचिता ढळू न देता मार्गक्रमण करीत राहणं, यासाठी किती तीव्र आत्मबलाची गरज असेल ना! बहुतेक हीच जयंतरावांनी आपल्या सर्वांना दिलेली गुरुकिल्ली असावी. आपल्या अस्तित्वाने अशा अनेक आत्मदीपांना प्रज्वलित करणारी ‘जयंतराव’ नावाची प्रेरणा भारतमातेसाठी समर्पित होण्यासाठी युगानुयुगे मार्गदर्शन करत राहील...
-शर्वरी कुलकर्णी