‘ऑपरेशन ब्लू डॉट नेटवर्क’

    09-May-2023   
Total Views |
Ajit Doval

अरब देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि भारत या चार देशांच्या नेतृत्वातून लवकरच रेल्वे नेटवर्कद्वारे आखाती देशांना जोडणारा नवा प्रकल्प जगासमोर येणार आहे. ’ब्लू डॉट नेटवर्क’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या रविवारी अमेरिका, सौदी अरेबिया आणि युएईच्या सुरक्षा सल्लागारांची भेट घेतली. यावेळी आखाती देशांना अरब देशांशी जोडणार्‍या रेल्वे प्रकल्पाबाबत विस्तृत चर्चा झाली. हे रेल्वे नेटवर्क बंदरे आणि शिपिंग लेनद्वारे भारताशी जोडले जाणार असल्याची सध्या माहिती समोर येत आहे.
 
या प्रकल्पाची पायाभरणी ’आय२यू२’ या ‘फोरम’अंतर्गत होत असून, गेल्या १८ महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती. यात इस्रायल, भारत, अमेरिका आणि युएई यांचा समावेश असल्याने या फोरमला ’आय२यू२’ असे नाव देण्यात आले आहे. आखाती देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची रणनीती ठरवण्यासाठी हा मंच २०२१ मध्ये तयार करण्यात आला. आखाती देशांना जोडणार्‍या प्रकल्पात भारताचे रेल्वे नेटवर्कचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या फोरममधील एका इस्रायली अधिकार्‍याने, हे कार्य चीनला डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याचा मोठा खुलासा केला. मध्यपूर्वेतील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेने या प्रकल्पाची कल्पना दिली होती.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या झालेल्या बैठकीदरम्यान या प्रकल्पात भारताचे रेल्वे जाळे टाकण्याचे कौशल्य अमेरिकेला वापरायचे असल्याचे अमेरिकेने सांगितले. त्यामुळे भारताच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पातील कौशल्य लक्षात घेता, भारतही या प्रकल्पाशी जोडला गेला.अमेरिकेच्या प्रशासनाने अलीकडच्या काळातच या प्रकल्पात सौदी अरेबियाचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ’आय२यू२’मधील इतर देशांच्या संमतीनंतर सौदी अरेबियाचाही यात समावेश करण्यात आला. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी गुरुवारी वॉशिंग्टन येथील एका संस्थेत दिलेल्या भाषणादरम्यान, ’‘येत्या काळात सर्वांना ’ब्लू डॉट नेटवर्क’ प्रकल्पाबाबत अधिक चर्चा ऐकायला मिळेल,” असे म्हणत हा प्रकल्प होणार असल्याचे संकेत दिले. मुळात या प्रकल्पाच्या माध्यमातून अमेरिकेला चीनचा वाढता प्रभाव आणि मध्य पूर्वेतील चीनचा महत्त्वाकांक्षी असलेल्या ’बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ या प्रकल्पाच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक आणि त्याचा होणारा परिणाम कमी करायचा आहे.

सौदी अरेबियात भारताचा रेल्वे प्रकल्प सुरू करण्यामागील मुख्य कारण म्हणजे, आखाती देशांमध्ये चीनचा वाढता प्रभाव रोखणे. या प्रकल्पांतर्गत भारत सौदी अरेबियातील बंदरांना शिपिंग लेनने जोडणार आहे. यासोबतच भारतात बनवलेल्या रेल्वेसुद्धा लवकरच या आखाती देशांत धावू शकतील, असे सांगण्यात आले आहे.सौदी अरेबियातील रेल्वे प्रकल्पामुळे भारताला अनेक फायदे मिळू शकतात. जर युएईमध्ये रेल्वे प्रकल्प यशस्वी झाला, तर एका चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे कच्च्या तेलाची आयात आणि निर्यात दोन्ही सुलभ होईल. भारताला तेलाच्या वाहतुकीवर कमी खर्च करावा लागेल. रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना दिल्यास आखाती प्रदेशात कामानिमित्त राहणार्‍या आठ दशलक्ष भारतीयांना नक्कीच मदत होईल. भारताचा पश्चिमेकडील शेजारी देशांशी असलेला संपर्क मर्यादित राहणार नाही. या रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे पाकिस्तानचे मनसुबेही एकाअर्थी उद्ध्वस्त होतील.

’ब्लू डॉट नेटवर्क’ या प्रकल्पात सहभागी होऊन भारताला या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पात सामील होऊन भारत प्रथम मध्यपूर्वेला रेल्वेच्या जाळ्याने जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यानंतर मध्यपूर्वेतील देश सागरी मार्गाने दक्षिण आशियाशी जोडले जातील. हा प्रकल्प रेल्वे क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणारा देश म्हणून भारताचे ब्रॅण्डिंग करण्यात मदत करेल. भारताने देशात मजबूत रेल्वे नेटवर्क प्रस्थापित केले आहे. ’वंदे भारत’चे जाळे याचे उत्तम उदाहरण आहे. श्रीलंकेतही रेल्वेचे जाळे उभारण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे आखाती देशांत भारत असे नेटवर्क नक्कीच प्रस्थापित करेल यात शंका नाही!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक