नवी दिल्ली : साक्षी हत्याकांडातील मारेकरी साहिल यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी या हत्याकांडाविषयी मंगळवारी पत्रकापरिषदेत माहिती दिली. बाह्य उत्तर दिल्लीचे पोलिस उपायुक्त रवी कुमार सिंह म्हणाले की, आरोपी साहिल यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्येसंदर्भात सर्व महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत असून त्यांची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. सर्व बाबी विचारात घेऊन लवकरच आरोपपत्र दाखल करू; हत्येमागचा हेतू काय होता, अशा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे, असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी अद्याप हत्या करण्यात आलेले शस्त्र सापडले नसल्याचेही उपायुक्त रवी कुमार सिंह यांनी सांगितले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षीला साहिलसोबतचे संबंध पुढे ठेवायचे नव्हते. पोलिसांचे पथक त्याचे सोशल मीडिया अकाउंटची बारकाईने तपासणी करत आहे. यामध्ये पोलिस प्रेम त्रिकोणाचाही तपास करत आहेत. साक्षी हिने प्रवीणसोबत केलेली मैत्री साहिल यास पसंत नव्हती, असेही सूत्रांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे याविषयीदेखील पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात मारेकरी साहिलसह अन्य व्यक्तींचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. मयत साक्षी हिचा मित्र प्रवीण आणि झबरू, साक्षी हिच्या नितू आणि आरती नामक मैत्रिणी, साहिलचा मित्र आकाश यांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
गळ्यात रुद्राक्ष आणि हातात भगवा धागा
या प्रकरणामध्ये साहिल याने आपली ओळख लपविली असल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. गळ्यात रुद्राक्ष आणि हातात भगवा धागा बांधून साहिल साक्षीच्या मागे लागला होता. मात्र, साक्षीला सत्यता समजल्यानंतर त्याने हत्या केल्याचे साक्षी हिच्या एका मैत्रिणीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.