मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्याच्या मुख स्वच्छ अभियानाचा स्माईल अॅम्बेसेडर म्हणून करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सचिनने संवाद साधला. या कार्यक्रमावेळी बोलताना सचिन म्हणाला, मी कधीही तंबाखूजन्य जाहिराती केल्या नाहीत. या जाहिराती करा म्हणून मला करोडोंच्या ऑफरदेखील दिल्या गेल्या असे सचिनने म्हटले आहे.
दरम्यान, तंबाखूच्या कंपन्यांनी आपल्यासमोर करोडो रुपयांच्या ऑफर्स ठेवल्या, काहींनी तुम्ही हवा तो आकडा टाका, असेही सांगितले. पण मी कधीही तंबाखू आणि त्यासंदर्भातील पदार्थांची जाहिरात केली नाही. त्याचबरोबर सचिन पुढे म्हणाला, माझे बाबा मला पाहून आता आनंदी होत असतील, असे सचिन तेंडूलकरने म्हटले आहे. सचिनची दि. ३० मे रोजी महाराष्ट्र राज्य स्वच्छ मुख अभियानाच्या स्माईल अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.