पुण्यातील शहराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांचे तडकाफडकी राजीनामे

शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते सैरभैर

    03-May-2023
Total Views | 61
Sharad Pawar's resignation


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे दिले आहेत. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती या सर्वांनी केली आहे. पक्षाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मंगळवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाजवळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. तसा निरोपच शहर कार्यकारिणीकडून सर्वांना देण्यात आला होता. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, महिल्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, मृणालिनी वाणी, नीलेश निकम, काका चव्हाण, अजिंक्य पालकर, विक्रम जाधव, फईम शेख, गुरुमितसिंग गिल आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी यावेळी केली. पवारांचा निर्णय धक्कादायक असून त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते असे पदाधिकारी म्हणाले. शरद पवार यांचे मार्गदर्शन आवश्यक असून पक्षाला योग्य दिशा तेच देऊ शकतात असे जगताप यावेळी म्हणाले. भाकरी फिरवणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. परंतु, ते स्वत:च दूर होतील अशी अपेक्षाच कोणीही केलेली नव्हती.

Sharad Pawar's resignation

 
ही घोषणा होताच पुण्यातील कार्यकर्तेही सैरभर झाले होते. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला निर्णय हा पचनी पडणारा नाही. जो पर्यंत साहेब राजीनामा मागे घेत नाहीत, तो पर्यत आम्हीही पदावर राहणार नाही. त्यामुळे पुण्यातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121