सावरकरांच्या पराक्रमाचा ठसा माझ्या मनावर उमटला आहे. म्हणून मला सावरकरांशी संबंधित स्थळांचे दर्शन घ्यायचे आहे. आम्हा लहान मुलांच्या भाषेत सांगायचं, तर सावरकर-सहलीला जायचंय.
स्वा . सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांच्या गोष्टी मी खूप लहान असल्यापासूनच ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. आता मी दहा वर्षांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरील स्वारीची गोष्ट, अफझलखान वधाची गोष्ट, सावरकरांची त्रिखंडात गाजलेल्या उडीची गोष्ट, विदेशी कपड्यांच्या होळीची गोष्ट, अशा अनेक गोष्टी मी ऐकल्या आहेत. मला या गोष्टी ऐकून असं वाटलं की, जर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज आपण नसतो. या दोन्ही महापुरुषांनी आपल्यासाठी इतकं काही करून ठेवलंय की आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत.
मी असं ऐकलं आहे की, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज गेले होते तिथे तिथे बाबासाहेब पुरंदरेही गेले होते. त्याचप्रमाणे सावरकर जिथे जिथे गेले, तिथे तिथे मला जायचं आहे. सावरकरांच्या पराक्रमाचा ठसा माझ्या मनावर उमटला आहे. म्हणून मला सावरकरांशी संबंधित स्थळांचे दर्शन घ्यायचे आहे. आम्हा लहान मुलांच्या भाषेत सांगायचं, तर सावरकर-सहलीला जायचंय. सावरकरांसारख्या महापुरुषाचा जन्म जिथे झाला ते स्थळ भगूरमधलं त्यांचं घर. तिथे अष्टभुजा देवीची मूर्तीची होती. त्या देवीसमोर त्यांनी ‘मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती आणि ती शपथ त्यांनी खरी करून दाखवली. म्हणून मला हे स्थळ पाहायचं आहे.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी सावरकर पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. ’मी सावरकर’ या स्पर्धेनिमित्त मी या ठिकाणाला दोन वेळ भेट दिली आहे आणि आता दरवर्षी जाणार आहे. पुण्यामध्ये त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली, त्यासाठी त्यांना दहा रुपयाचा दंड आकारण्यात आला. तरी त्यांनी देशसेवा आणि क्रांतिकार्य सोडले नाही, तर सावरकर पुण्यात जिथे जिथे गेले तिथे तिथे मला जायचं आहे.सावरकर पुढे ‘बॅरिस्टर‘ होण्यासाठी लंडनला गेले आणि तिथे त्यांनी लेखनाच्या माध्यमातून संबंध इंग्रज सरकारला हलवलं. म्हणजेच शत्रूच्या गुहेत जाऊन शत्रूलाच आव्हान दिलं. तिकडे त्यांनी ’१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर प्रकाशन होण्याच्या आधीच बंदी घालण्यात आली होती. त्यांनी मदनलाल धिंग्रा यांना देशसेवेच्या कार्यात आणलं, तर अशा ठिकाणी कोणाला जायला आवडणार नाही?
आता आपण पुढच्या स्थळाकडे जाऊया. फ्रान्स... फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर ‘मोरया‘ नावाची बोट उभी होती. त्या बोटीत कैद झालेले सावरकर होते. इथेच त्यांनी त्रिखंडात गाजलेली उडी मारली होती. सावरकरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, इंग्रज सैनिकांनी सावरकरांना पुन्हा एकदा पकडलं. आता सहलीची बस निघाली अंदमानला...सावरकरांना दोन जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. त्यासाठी त्यांना अंदमानला पाठवलं. अंदमानमध्ये कैद्यांना वर्षातून एकदा आवडती गोष्ट मागवायची मुभा होती. तेव्हा, कैदी छान छान गोष्टी आणि चांगला खाऊ मागवायचे. सावरकर म्हणाले, “तुम्ही पुस्तके मागवा.“ कैदी म्हणाले, “मग आम्ही काय पुस्तकं खायची का? पुस्तकांचे काय करायचे?“ सावरकर म्हणाले, “जेलमध्ये राहून तुम्ही पुस्तकं वाचली, तर तुमचं ज्ञान वाढेल आणि इथून बाहेर पडताना ज्ञानी म्हणून बाहेर पडाल.“ मग कैद्यांनी सावरकरांचं ऐकलं आणि पुस्तके मागवायला सुरुवात केली आणि बघता बघता, अंदमानमध्ये दोन हजार पुस्तकांचं पुस्तकालय निर्माण झालं. सावरकरांनी भिंतींवर कोरुन कविता लिहिल्या. देशासाठी त्यांनी भयंकर शिक्षा भोगल्या. त्यामुळे या स्थळाचं दर्शन मला घ्यायचं आहे.
आता आपलं पुढचं स्थळ आहे रत्नागिरी... रत्नागिरीत त्यांनी समाजसेवा केली. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता म्हणून रत्नागिरीत सावरकरांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली आणि अखिल हिंदू गणेशोत्सव सुरू केला. ’मज देवाचे दर्शन घेऊ द्या’ ही कविता रचली. ही कविता मला खूप आवडते. म्हणून मला त्या पतितपावन मंदिरात जायचंय आणि अखिल हिंदू गणेशोत्सव जिथे होता, त्या स्थळीसुद्धा जायचंय. त्यानंतर सावरकर मुंबईत स्थायिक झाले. त्यावेळी ते थेट राजकारणात होते. पण, राजकारणाबद्दल मला काही माहिती नाही. मी जसजसा मोठा होईल तसतशी त्यांच्या राजकारणाबद्दलही माहिती करून घेईन. पण, मला सावरकरांचं मुंबईतलं घर पाहायचं आहे. मी चार-पाच वर्षांचा असताना त्यांच्या दादरच्या घरी गेलो होतो. पण, मला आता ते लक्षात नाही, तर सावरकर-सहलीला जाऊन खूप आनंद होईल. पण, सहलीला केवळ जाऊन आनंद नाही घेणार, तर आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो, तुम्हीही जर सावरकर-सहलीला गेलात तर तुम्हालाही खूप शिकायला मिळेल.
(वय १०, इयत्ता सहावी)
(लेखन सहकार्य : जयेश मेस्त्री)