खानिवडे : वसईत गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्णता प्रचंड जाणवत असून वसई एक प्रकारे तापली आहे .या वर्षातील गर्मीचा पारा हा मागील बुधवारपासून सर्वोच्च ठरला असून कमाल ४०च्या पार पारा चढला होता . यामुळे उष्णतेचे चटके नागरिकांना बसू लागले आहेत. गुरुवारी पालघर मध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यामुळे आपले आरोग्य सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर उन्हाचा पारा असे हवामानात बदल निर्माण होत आहेत.
दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना उष्णतेचा मारा सहन करावा लागत आहे. डोळे, चेहरा यासह त्वचेला त्रास होत आहे. पालघर जिल्हा आरोग्य प्रशासन, वसई तालुका आणि वसई-विरार महापालिका यंत्रणेकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे, तसेच दुपारी शक्यतो बाहेरचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले जात आहे. जर उष्माघाताचा त्रास जाणवत असेल तर त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात निदान करावे, असे आवाहन पालघर जिल्हा ग्रामीण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
उन्हाचे शरीरावर परिणाम- तहान जास्त लागत असल्याने पाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे भूक मंदावत आहे. शरीराला आवश्यक असणारी प्रथिने कमी व पाणी अधिक असल्याने याचा शरीरावर परिणाम होऊ लागला आहे. चक्कर येणे, हात-पाय थरथरणे असे प्रकार वाढू लागले आहेत.
महामार्गाच्या बाजूला मंडपे थाटून थंड पदार्थ विक्रेत्यांची दुकाने- मुंबई- अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करताना चालकांसह प्रवाशांना अधिक त्रास होत आहे. अनेक ठिकाणी थंड पेय, जांभूळ, उसाचा रस, लिंबू सरबत, नारळपाणी, कोकम सरबत, ताडगोळे यांची विक्री दुकाने थाटण्यात आली आऊन थंड पेयांना आणि पाणी बाटल्यांना मागणी वाढली आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, म्हणून अशा विक्रेत्यांकडे नागरिकांची पावले वळत आहेत.