चित्रपटातील नृत्यामुळे कथ्थकला गृहीत धरलं जातं : सोनिया परचुरे

    29-Apr-2023   
Total Views |
 
Sonia Parchure

 ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस’ नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्त सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याशी, कथ्थक, कथ्थक नृत्यासमोरील आजची आव्हाने, मर्यादा आणि त्यांचा एकंदर भरतनाट्यम् ते कथ्थक प्रवास, अशी केलेली ही मनमोकळी बातचीत...
 
तुमची नृत्याची सुरुवात कशी झाली? तुमच्या गुरूंबद्दल काय सांगाल?
 
मी पहिलीत होते. आमच्या सोसायटीत माघी गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता. त्यावेळी पूनम मुरुडेश्वर यांच्या विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण झाले. मला त्या वयात ते इतकं भावलं की बस्सं, मला आता हे करायचंय आणि मी करणार! माझ्या आत्येभावाला माझी आवड लक्षात आली. तो सतारवादक होता. त्याने कोणतीही गाणी लावली की मी गोल गोल फिरणार किंवा नाचणार, तर त्यानेही वडिलांना सांगितलं, हिला नृत्याचं प्रशिक्षण मिळायला हवं. पूनमताई तेव्हा अगदी एक इमारत सोडून पलीकडे राहत. त्यांच्याकडे मी भरतनाट्यम् शिकायला सुरुवात केली. साधारण सात-आठ वर्षं भरतनाट्यम् शिकले मी तिच्याकडे. ती गोपीजींची शिष्या, त्यामुळे काही धडे ती कथ्थकचेही द्यायची. तिच्या जेव्हा लक्षात आले की, मी भरतनाट्यम्पेक्षा कथ्थक उत्तम करते तेव्हा तिने मला प्रामाणिकपणे सांगितले की, यापुढे तुला शिकवावे असे माझ्याकडे काही उरले नाही. तिनेच मला माझ्या पुढच्या गुरूंकडे पाठवले. त्यापूर्वी मी तिच्याकडे क्लासेससुद्धा घ्यायचे. म्हणूनच मला अजूनही भरतनाट्यम्बद्दल फार प्रेम वाटत. त्यातल्या मुद्रा, काही फॉर्मेशन्स अजूनही मला खुणावतात. माझे विद्यार्थी पण म्हणतात की, भरतनाट्यम्चा विषय निघाल्यावर ताई तू भरभरून बोलतेस. गुरूंबद्दल म्हणशील, तर पूनमताईंचं नाव मी पहिले घेईन. त्यांनीच खरा रस्ता दाखवला. दिशा दिली. त्यानंतर मी मंजिरी देवांकडे जायचे. नाचताना पहिले काय नाचायचं, थाट आधी का करायचा, क्रम कसा असावा, जे परंपरागत चालत आलं आहे, त्याबद्दल माहिती मला त्यांच्याकडे मिळाली. त्यांच्याकडे मी अलंकार झाले. आता खरंतर लोकांना वाटतं इथे संपलं, पण तसं नाही, सुरुवात इथून होते. रोज तुम्ही तेच नाचता, त्यातून तुम्हाला काय मिळतं, ते इथे कळलं. पुढे मी वेगवेगळी ‘घराणी’ शिकत गेले आणि समृद्ध होत गेले. त्यानंतर मी पंडित सुरेश तळवलकरांकडे शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे मी लय आणि तालाचं शिक्षण घेतलं. हे तसं खरंतर कठीण, म्हणजे कान पकडून आणि हातावर टाळी देऊन हे शिकवावं लागतं. मी अजूनही त्यांच्याकडे शिकतेय.
 
आपल्याकडे नृत्यासारख्या अभिजात कलांना तेवढसं महत्त्व दिलं जात नाही. म्हणजे कलेचं कौतुक होतं, पण त्यातच करिअर करावं, याला कित्येक पालकांचा विरोध असतो. तुमच्या बाबतीत हे झालं का? किंवा शाळेत असताना तुम्हाला भविष्यात अजून काही तरी करायची मनात इच्छा होती?
 
माझे वडील समाजसेवक होते. मराठी विज्ञान परिषदेचे काम ते करायचे. गावोगावी जाऊन प्रदर्शने भरवायचे, त्यामुळे आमच्याकडे नेहमीच अनेक लोक यायचे. मी बाबांना विचारायचे की, यांना मी नाचून दाखवू का? इतकी ती ओढ आणि ‘पॅशन’ माझ्यात त्या वयापासूनच नृत्याबद्दल होती. माझ्या वडिलांचा विषय म्हणजे भौतिकशास्त्र. आई लहानपणीच गेली, पण मला घरातून कधीच नृत्य सोडण्याबाबत आडूनही सांगण्यात आलं नाही. माझ्या नृत्याच्या आड कुणीही आलं नाही. बाबांसोबतच भाऊ आणि बहीण दोघांनीही आधार दिला.
 
त्याकाळात नृत्य शिक्षण म्हणजे थोडं खर्चिक होतं. प्रयोग असायचे, वेशभूषा वेगळी असते, प्रत्येक नृत्यासाठी वेगळा वेष असायचा. पण, तरीही त्यांनी कधी मला अडवलं नाही. सोसायटीतल्या लोकांना थोडं वाटायचं, ही अभ्यास वगैरे न करता फक्त नृत्यच करते, पण कसं असतं, जेव्हा घरातून पूर्ण पाठिंबा असतो तेव्हा, बाहेरचे कोणी तुम्हाला बोलायची हिंमत करत नाहीत आणि मीही तसं कुणाला महत्त्व दिलं नाही.
 
आज कथ्थक नृत्यशैलीसमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत, असं तुम्हाला वाटतं?
 
आज या नृत्यशैलीला गृहीत धरलं जातेय. आज चित्रपटातील गीतांवर नृत्य संरचना कथ्थकसदृश केल्या जातात. ते कथ्थक नसतं. परंतु, त्यामुळे समाजात वेगळा संदेश जातो. भराभरा चकरा मारल्या, फटाफटा पाय मारले म्हणजे काठाव वाटतं. ते तसं नाही. अशा फार गरीब कल्पना दिसू लागल्या की मला स्वतःला थांबवता येत नाही. माझे डोळे बोलतात, चेहरा बोलतो, लोकांना मी आवडत नाही, मला असं वाटत की, मला बोचकारतंय कुणीतरी. एकदा त्यांनी मला एका डान्स रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून बोलावलं, पण खरं बोललेलं फारसं चालत नाही ना. कथ्थक ही माझी भाषा आहे. एखादी भाषा चुकीची बोलल्यावर आपल्याला कसा त्रास होतो, तसं मला चुकीचं कथ्थक कुणी केलं की त्रास होतो. इतकं माझं प्रेम आहे कथ्थकवर!
 
कथ्थक नर्तकांकडे कोणते गुण-कौशल्य असायला हवे? व एकंदर कथ्थक नृत्य प्रकाराविषयी थोडं सांगाल? पुढे जाऊन या क्षेत्रात करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
 
शरणागती पत्करता यायला हवी. म्हणजे, गुरू पाहताना पालकांनी तो निरखून-पारखून पाहावा. पण, एकदा का आपलं ठरलं की पूर्णपणे त्या गुरुवर सोपवून द्यावं. पालकांनी मग त्यांचे क्लास बुडवू नये, त्याला तेवढंच महत्त्व द्यावं, जेवढं आपण अभ्यासाला देतो. आज बरेच मार्ग आहेत, यातूनही अर्थार्जन करण्याचे. तुम्ही क्लासेस घेऊ शकता, कोरिओग्राफी करू शकता, हल्ली विविध समारंभांच्या वेळी कथ्थकचे प्रयोग होतात. त्यावेळी तुम्हाला कोरिओग्राफर लागतोच.
 
कथ्थक नृत्याविष्कारांचे संरचना संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याविषयी काय सांगाल?
 
विविध विषय आणि गीते यांच्यावर आधारित कथ्थक नृत्य संरचना संमेलन दि. 12 मे ते 14 मे असे तीन दिवस रवींद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे आयोजित केले आहे. चित्रपट, क्रीडा, पुराणकथा आणि निसर्ग अशा वैविध्यपूर्ण विषयांवरील गीते आणि काठावर आधारित नृत्य संरचना असतील. हे अत्यंत आव्हानामक विषय आहेत. शब्दामधला अर्थ, संगीतातले मर्म, अवकाशातले अव्यक्त आणि संरचनेतले तत्व नृत्यातून कसे मांडता येते, कसे टिपता येते, यांचे प्रात्यक्षिक अनुभवायचे असेल,तर आपण प्रत्येकाने पाहयलाच हवी अशी ही नृत्यमालिका..!! एक स्वाध्याय म्हणून हे सादरीकरण पाहाणे नृत्यकारांसाठी आवश्यक आहेच, तसंच आस्वादकांची भूक तृप्त करण्याची क्षमता असणारे हे संमेलन आवर्जून उपस्थिती लावावे असे.
 
नाट्य संमेलन, कवी संमेलन, संगीत संमेलन, साहित्य संमेलन, चतुरंग रंगसंमेलन आपण नेहमीच एकत आलोय. बरेच दिवस मनात एक इच्छा उत्पन्न होेतेय की, आपण एक नृत्य संरचना  संमेलन का करू नये? मग असं जर संमेलन करायचे असल्यास एकाच ठिकाणी मांडव घालून आपल्याच वेगवेगळ्या कलाकृती आपण लोकांसमोर मांडाव्यात असं प्रामाणिकपणे वाटलं. बहुधा असे कार्यक्रम एखाद्या संस्थेमार्फत काही कारणासाठी अथवा योजनेअंतर्गत होतात. परंतु, नाटकासारखा विशेषत्वाने नृत्याचा कार्यक्रम पाहूया, असा विचार करून येणार्‍या प्रेक्षकांसाठी आपण एखादं संमेलन करायला हवं. अनेक प्रेक्षकांच्यात नृत्याचा कार्यक्रम पाहण्याविषयी उदासीनता दिसते. तो विचार बदलायला हवा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.