‘जग बदलणारे ग्रंथ’ - माहितीप्रद आणि प्रेरणादायी

    29-Apr-2023
Total Views | 285
 
Books that change the world
 
 
दीपा देशमुख व्यासंगी लेखिका आहेत. एखादा विषय निवडून त्या संबंधी शेकडो पुस्तके वाचायची, त्यांचा अर्क काढून वाचकांसमोर ठेवायचा ज्ञानमार्ग त्यांनी निवडला आहे, त्यामुळे त्यांच्या पुस्तकांतून कित्येक क्षेत्रांची ओळख वाचकाला होत राहते. ’जग बदलणारे ग्रंथ’ हे निवडक 50 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ग्रंथांवरील त्यांचे पुस्तक माहितीप्रद आहे. जगात ज्ञानवर्धनाचा इतिहास लिहायचा झाला, तर जे काही महत्त्वाचे ‘ग्रंथ’ असतील त्यातील 50 ‘ग्रंथा’चा संक्षिप्त परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.
 
अरविंद पाटकरांच्या ’मनोविकास’ प्रकाशनाने त्याला फार आकर्षक व्यक्तिमत्त्व दिले आहे. या पुस्तकाची रचनादेखील दोन कॉलम्समध्ये आहे, त्यात सुंदर चित्रे आहेत, त्यामुळे एखादा माहितीकोश वाचल्याचा आनंद यातून मिळतो.
 
देशमुखांनी एकेका ग्रंथाचा रोचक परिचय करून दिला आहे, त्यात तांत्रिक बाबी असल्या तरी त्या कुतूहल जागृत राहील, अशा पद्धतीने मांडल्या आहेत; रुक्ष किंवा निरसपणेदेखील असे विषय मांडता येतात. पण, मग त्यातला ओलावा हरवतो आणि कुतूहल लोप पावते. सगळ्याच वयोगटातील वाचकांना आवडेल असे माहितीपूर्ण लिहिणे, ही दीपा देशमुख यांची ओळख आहे. त्यांची ‘भारतीय जीनियस’ ही सीरिजदेखील अशीच झपाटून टाकणारी आहे, ही पुस्तकं एकदा हातात घेतली की सोडवत नाहीत. ‘जसे आपण अधिक वाचतो तसे आपण किती कमी वाचतो आणि आपले ज्ञान किती तोकडे आहे, याची जाणीव गडद होत जाते’, हेच खरे.
 
ग्रंथाची माहिती देताना कर्त्याच्या चरित्रावर थोडा प्रकाश टाकावा लागतो, ते पार्श्वभूमी बांधण्यासाठी, अनुबंध उलगडण्यासाठी; असे प्रत्येक ‘ग्रंथ’काराच्या बाबतीत झाले आहे, म्हणून हा कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परिचय ठरतो.
 
हे पुस्तक म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे, ‘भगवद्गीता’ 18 नावाने ओळखली जाते, ही माहिती इथे सहज मिळते- गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मावल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भावग्नी, भय नाशिनी, वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थ ज्ञानमंजिरी इ.
 
गौतम बुद्ध ही भारताची जगाला दिलेली देण आहे, त्यांच्या ’त्रिपिटक’ या ग्रंथाचा आढावा घेताना थोडक्यात बुद्ध तत्त्वज्ञान लेखिकेने सांगितले आहे. स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना अशा संग्रहाचा खूप लाभ होतो, अगदी थोडक्यात अधिक वेळ न घालवता प्रत्येकी तीन ते चार पानांमध्ये त्यांना ‘जग बदलणारे (पन्नास) ग्रंथ’ वाचायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना कित्येक चांगले संदर्भ लेखनात देता येतील. प्राध्यापकांना असे ग्रंथ मुलांनी खोलत शिरून अभ्यासावेत, यासंबंधी मार्गदर्शन करता येईल, विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढीस लागेल.
 
‘भगवद्गीता’, ‘त्रिपिटक’, ‘कामसूत्र’, ‘अर्थशास्त्र’, ‘गीतांजली’, ‘सत्याचे प्रयोग’, या सहा भारतीय ग्रंथांचा जागतिक 50 ग्रंथांत समावेश करण्यात आला आहे.
 
अरब-इस्रायल वादाचं काय मूळ आहे, हे थोडक्यात ’बायबल’चा परिचय वाचताना लक्षात येतं.
 
तारुण्यात प्रवेश करण्याच्या वेळी मुलालाच नव्हे, तर मुलीलाही कामक्रीडेचं रीतसर शिक्षण मिळालं पाहिजे, तरच निकोप समाज घडू शकतो, अन्यथा एक मोठी विकृती समाजात तयार होऊन, ती समाजातली शांतता बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते, असे विचार वात्स्यायनाने ’कामसूत्रा’त मांडले आहेत. यावरून भारतीय संस्कृती किती उदारतेतून लैंगिक संबंधांकडे पाहात होती, याची कल्पना येते.
 
कौटिल्याच्या ’अर्थशास्त्रा’चा देखील असाच संक्षिप्त परिचय या ग्रंथातून होतो, कर गोळा करताना सरकारची भूमिका ही मधप्राशन करणार्‍या मधमाशीसारखी असावी. मधमाशी फुलातला आवश्यक तेवढाच मध घेते, त्यामुळे मधमाशी आणि फूल, दोघंही आनंदाने तर राहतातच आणि त्यांच्या अस्तित्वाला बाधा येत नाही, अशी त्या त्या ग्रंथातील अवतरणे लेखिकेने पुस्तक परिचयाच्या वेळी वेगळी काढून दिली आहेत. केवळ ती जरी वाचली तरी हे ग्रंथ किती प्रगल्भ आहेत, याची कल्पना येते आणि त्यासमवेत ते वाचून त्यातील सारतत्त्व आपल्याकरता गोळा करणार्‍या या लेखिकेचे कष्टदेखील प्रत्ययास येतात. याच पुस्तकात डिक्शनरीचा उद्गाता डॉ. सॅम्युअल जॉन्सन भेटतो, त्याचे शब्द लेखिकेच्या बाबतीत देखील चपखल बसतात, लिहिताना लेखकाचा सर्वाधिक वेळ वाचनात जातो. एक पुस्तक लिहिण्यासाठी अर्ध ग्रंथालय पालथं घालावं लागतं.
 
’रिपब्लिक’ लिहिणारा प्लेटो, 35 नंतर तत्त्वज्ञ मुलांनी राज्य कसं चालवावं याचा ‘पोस्ट ग्रॅज्युएट’ कोर्स केला पाहिजे, म्हणतो; त्यानंतर राज्यकर्ते होण्यासाठी 15 वर्षांची ‘अँप्रेन्टिसशिप’, म्हणजे 50 वय ओलांडलं की तो तत्त्वज्ञ हा राजा झाला (‘फिलॉसॉफर किंग’) पाहिजे म्हणतो. म्हणजे जणू काय माणसं दीर्घायुषी असतील, हे त्याचे गृहीतक होते, असे वाटते. छ. शिवाजी महाराज वयाच्या 50व्या वर्षी रुपेरी ’स्वराज्य’ निर्माण करून इहलोक सोडून गेले, अशी उदाहरणे पाहिली की राजा म्हणून यशस्वी होण्यासाठी पारंपरिक दीर्घकालीन शिक्षण ही काही पूर्वअट नसावी, हे सिद्ध होते, अशी कित्येक संशोधन स्थळं या पुस्तकात शोधल्यास सापडतात.
 
या ग्रंथांमध्ये विपुल पारिभाषिक संज्ञा आहेत, त्यांचे मराठीकरण करणे गुंतागुंतीचे झाले असते, म्हणून त्या तशाच ठेवून इंग्रजी नावेच घेतली आहेत, फक्त ती देवनागरीत लिहिली आहेत, हा तसा ‘डीटीपी’ करणार्‍यासाठी फार किचकट प्रकार, लेखिकेने आणि प्रकाशकाने यावर खूप मेहनत घेतली आहे.
 
लिओ टॉल्स्टॉय, महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग ज्यु., जगाला प्रभावित करणार्‍या या लोकांनी ज्याच्या पुस्तकामुळे प्रभावित व्हावं असं हेन्री डेव्हिड थोरो याच्या ’सिव्हिल डिसओबिडीयन्स’ या पुस्तकात आहे काय, हे कुतूहल थोड्या अंशी का होईना शमवण्यासाठी दीपा देशमुख यांच्या ’ग्रंथा’कडे वळावं लागतं. कारण, ते खर्‍या अर्थाने शमवण्यासाठी या सगळ्या लेखकांची मूळ पुस्तकं वाचावी लागतात; पण ते प्रत्येकाला शक्य नसतं म्हणून, ‘हा प्रकार नेमका आहे तरी काय?’ याचा अदमास घेता यावा, अशा चर्चेत आपण ’त्या गावचे नाही बुवा’, असं म्हणून काढता पाय घेण्याची वेळ येऊ नये, अशासाठी या ज्ञानकेंद्री पुस्तकांची आवश्यकता असते. एक सजग वाचक म्हणून मला तरी अशी काही पुस्तकं या ‘ग्रंथा’त गवसली आहेत.
 
लहान मुलांवर 60 वर्षे संशोधन करणार्‍या पियाजेंचे प्रयोग किती नावीन्यपूर्ण आहेत, हे त्यांच्या ’द मॉरल जजमेंट’ या पुस्तकाच्या परिचयातून उलगडते. अजूनही आपण लहान मुलांसोबत यातले सोपे प्रयोग करून त्याचे निष्कर्ष पडताळून पाहू शकतो. वैज्ञानिक किती डोळस दृष्टिकोनातून संशोधन करतात, याचा प्रत्यय एकेका मनोवैज्ञानिकाच्या पुस्तकाचा परिचय वाचताना येत राहतो.
 
या 50 ग्रंथात केवळ तीन स्त्री लेखिकांचा समावेश आहे. ’द सेकंड सेक्स’, लिहिणार्‍या सिमॉन द बोव्हा, ’सायलेंट स्प्रिंग’, लिहिणार्‍या रॅचेल कार्सन आणि ’द फेमिनाईन मिस्टिक’, लिहिणार्‍या बेट्टी फ्राईडन. कदाचित जागतिक सामाजिक परिस्थितीचा ते आरसा ठरावे.
 
बर्ट्रांड रसेल आपल्या 98 वर्षांच्या दीर्घायुष्यात 68च्या वर पुस्तकं आणि 2000 च्या वर लेख लिहून गेला, हे वाचून आपण अचंबित होतो. संघर्ष केवळ संशोधनापुरता नव्हता, तर जागतिक महायुद्धांचीही अहमहमिका होती, सत्ताधार्‍यांचा रोष होता, एवढे सगळे असूनही संशोधनावर लक्ष केंदित करणे असामान्य धैर्याचे काम होते; हे काही शास्त्रज्ञांची जीवनी वाचताना जाणवते, विशेषतः अल्बर्ट आईनस्टाईन!
 
‘इमोशनल इंटेलिजन्स’ लिहिणारा डॅनियल गोलमन म्हणतो, “तुमच्या भावनिक क्षमतांवर तुमचं नियंत्रण नसेल, तुम्हाला आत्मभान नसेल, तुम्हाला तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करता येत नसेल, तुमच्या मनात करुणा नसेल; तर तुम्ही किती हुशार असाल, तरी त्याचा काहीएक उपयोग नाही.”
 
जोसेफ स्टिग्लिट्झच्या ’ग्लोबलायझेशन अ‍ॅण्ड इट्स डिसकंटेन्टस्’ या पुस्तकाने जागतिकीकरणाचा आणि ’आयएमएफ’चा साळसूद बुरखा फाडला, त्यानं मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध केला, ’श्रीमंत आणि गरीब यांचे हितसंबंध कधीच एक नसतात’, असे रोखठोक प्रतिपादन केले.
 
’सेपियन्स’ हे युवाल नोवा हरारी यांचे गाजलेले पुस्तक. हा जगप्रसिद्ध लेखक स्मार्ट फोन वापरत नाही, रोज दोन तास ध्यानधारणा करतो, समलिंगी आहे इ. आगाऊ माहिती देखील या पुस्तकाचा आढावा घेताना ओघाने मिळत जाते. उपभोक्तावाद वाढवण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीचा सरकारांकडून र्‍हास करण्यात आला, असा आरोपदेखील त्यांनी या पुस्तकात केला आहे. सामान्यपणे आपण असे मुद्दे नजरेआड करतो, पण अशी पुस्तकं मुद्दाम आपल्या डोळ्यात अंजन घालत असतात.
 
’कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ हा अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी यांचा ग्रंथ, त्यातील काही विधानं आपलं लक्ष वेधून घेतात. अमेरिकेतली प्रचंड संपत्ती अमेरिकेतल्या दहा ते 20 टक्के लोकांकडे नव्हे, एक टक्के लोकांकडेसुद्धा नव्हे, 0.1 टक्के लोकांकडेही साठवलेली नव्हती, तर ती फक्त काही मूठभर लोकांच्या हातात साठवलेली होती या आणि तत्सम विदेवर आधारित त्यांनी प्रक्षोभक निष्कर्ष काढले. जसे, मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्कानं संपत्ती मिळवतील, तेच भाग्यवान ठरतील किंवा श्रीमंत जास्त श्रीमंत होत जातील विषमता वाढत जाईल इ.
 
‘ग्रंथ’ हे माहितीप्रद लिखाण आहेच, पण त्याबरोबरच प्रेरणादायी देखील आहे. कित्येक ग्रंथकर्त्यांना मानवी आयुष्यातील न चुकलेला संघर्ष होताच, पण म्हणून त्यांनी ’मला वेळ मिळत नाही’, असे लंगडे समर्थन न करता चिकाटीने संशोधन, लिखाण सुरू ठेवले, आणि त्याचे फलित म्हणून आज एवढी वर्षे होऊनही त्यांच्या कृती आपण वाचत असतो. या लोकांची चरित्रं प्रेरणादायी असली तरी, त्यातून मिळणारी ’प्रेरणा’ क्षणभंगुर असते, ती आपल्या व्यावहारिक व्यापात थोडा वेळ उत्कंठा जागृत करून लोप पावते. त्यामुळे या ग्रंथकर्त्यांच्या किंवा संशोधकांच्या ठायी असलेली अभ्यासाविषयीची एकाग्रता, शिस्त, सातत्य हे गुण आपण उचलले पाहिजेत. कारण, खरे अंगिकारलेले कार्य त्यामुळे सिद्धीस जात असते.
 
किमान प्रत्येक सजग पालकाने अशी पुस्तकं आपल्या मुलांना वाचायला दिली पाहिजेत. ज्या मुलांना मराठी चांगले वाचता येत नाही पण कळते त्यांना सोप्या भाषेत एकेक लेख रंजकतेने वाचून दाखवावा म्हणजे त्यांच्या विचारकक्षा नक्की रुंदावतील. याच पुस्तकात अल्बर्ट आईनस्टाईनचे सुंदर वाक्य आहे, तुमची मुलं हुशार व्हावीत असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यांना गोष्टी सांगा; तुम्हाला खरंच तुमची मुलं जास्त हुशार व्हावीत असं वाटत असेल, तर त्यांना जास्त गोष्टी सांगा आणि जर तुम्हाला तुमची मुलं जास्त हुशार आणि बुद्धिमान व्हावीत असं वाटत असेल, तर त्यांना आणखी जास्त गोष्टी सांगा.
 
जेव्हा शालेय शिक्षण एका विशिष्ट पठडीतून आपल्याला घडवत असते, असे आपण म्हणतो, तेव्हा आपल्या कुडीवर अधिक चांगले संस्कार करण्यासाठी अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे अत्यावश्यक असते, वेगवेगळ्या विषयांचा परिचय होत जातो, तेच आपल्याला खर्‍या अर्थाने डोळस देखील बनवते.
 
दीपा देशमुख या वाचकाला चौकस आणि बहुश्रुत बनविणार्‍या लेखिका आहेत. ’जनरलिस्ट’ आणि ’स्पेशलिस्ट’ यातला फरक सांगताना असे म्हटले जाते की, ‘वन हू नोज लेस अ‍ॅण्ड लेस ऑफ मोर अ‍ॅण्ड मोर इज अ जनरलिस्ट’ आणि ‘वन हू नोज मोर अ‍ॅण्ड मोर ऑफ लेस अ‍ॅण्ड लेस इज अ स्पेशलिस्ट.’ या अर्थाने, वाचकाने कोणत्या विषयात ’स्पेशलिस्ट’ व्हायचे, हे ठरवण्याआधी बहुश्रुत असणे आवश्यक असते, म्हणून आपल्याला विविध विषयांची ओळख घडवून आणणार्‍या ’जनरलिस्ट’ पुस्तकांची आवश्यकता असते, त्यात ’ग्रंथ’ एक मैलदगड ठरावं.
 
 
पुस्तकाचे नाव : जग बदलणारे ग्रंथ
लेखक : दीपा देशमुख
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या : 432
 
 
- जीवन तळेगावकर
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121