दचकलात ना... अवघं जग सचिनचा पन्नासावा वाढदिवस साजरा करत असताना मी असे रुसवेफुगवे का मांडतोय... पण, हीच ती वेळ आहे, सचिनला मनातील अगदी खरं खरं सांगायची... कारण, आम्ही सचिन जगलोय... सचिन अनुभवलाय...सचिनसाठी रडलोय... सचिनसाठी आनंदाने उसळलोय... पण, होय सचिनवर नितांत प्रेम करणार्या आमच्या पिढीचा या सहा कारणांसाठी सचिनवर राग नक्कीच आहे.
सचिनच्या पन्नासाव्या वाढदिवशी... म्हणजे क्रिकेटच्या भाषेत ‘हाफ सेंच्युरी’ ठोकली असताना सगळे जग त्याला भरभरून शुभेच्छा देतय... तरीही आम्ही रागावलोत... सचिनबद्दल असे काही बोलायचं म्हणजे अगदी धाडसच हवं... टीका आणि तीही थेट क्रिकेटच्या दैवतावर म्हणजे नास्तिकपणाचा कडेलोटच...एक वेळ नास्तिक राहून एकवेळ देवावर टीका करणे सोपे आहे. पण, क्रिकेटच्या पंढरीत राहून सचिनवर राग... तोबा तोबाच... पण, जे खरं आहे ते बोलायचे धाडस तर हवच ना... मी खूप पाल्हाळ लावलय अस वाटतय का? तर ही आहेत माझी सचिनवरची रागाची सहा कारणे...
रागाचे पहिले कारण :
मी आज जो काही आहे यापेक्षा थोडा अधिक नक्की शिकू शकलो असतो... थोडे पैसे अधिक गाठीशी जमवले असते. पण, काय करणार आमच्या परीक्षा आणि सचिनच्या ‘इनिंग’ याचे इतके साटलोट असायचे की, दोन्ही हातात हात घालून यायच्या... मग सचिन खेळत असताना कोण अभ्यास करण्याचा वेडेपणा करेल... या वेडेपणात अभ्यास कधी हातून निसटून गेला कळलच नाही. रिझल्टच्या पुस्तकावर मिळणार्या लाल शेर्यापेक्षाही आम्हाला आतुरता असायची सचिनच्या शतकाची आणि त्याच्या विक्रमांची. रिझल्टमधील आमच्या लाल शेर्यांना सचिन जबाबदार तुच आहेस...आमच्या पिढीला तू नादावलस...
रागाचे दुसरे कारण : सचिनने आम्हाला अंधश्रद्धाळू बनवले...
म्हणून आम्हाला त्याचा राग येतोय... देशभरात सगळ्यात आधी अंधश्रद्धेविरोधी कायदा महाराष्ट्राने बनविला. पण, याच महाराष्ट्रात आमची अवघी एक पिढी सचिनने अंधश्रद्धाळू बनविली. सचिन आऊट होऊ नये म्हणून आम्ही अंधश्रद्धेपायी एकाच जागेवर तासनतास बसून मॅच पाहिली आहे. अमूक एकाने बसून मॅच पाहिली की सचिन आऊट होतो म्हणून त्या मित्राला हक्काने तासन्तास उभे केलय. सचिन खेळायला आला की उठायचं नाही. बसलेली जागा सोडायची नाही. इतकच कशाला एक ठरावीक टीशर्ट घातल्यास सचिन ‘सेंच्युरी’ मारतो म्हणून कित्येक मॅच एकच टीशर्ट न धुता घालून मॅच बघितली आहे... ‘वन डे’ आणि टेस्ट मिळून १०० सेंच्युरी मारणार्या सचिनने आपल्या प्रत्येक सेंच्युरीनंतर आमच्यातील अंधश्रद्धेला खतपाणी घातले.
रागाचे तिसरे कारण : सचिनने आम्हास खोट बोलायला शिकवले...
शाळेत रोज प्रार्थना करतेवेळी सत्य बोलायाची घेतलेली शपथ सचिनच्या मॅचच्या दिवशी आम्ही हक्काने मोडली. सचिनचा खेळ पाहता यावा म्हणून कितीवेळा खोट बोललो याची तर गणतीच नाही...सचिनसाठी कॉलेज बुडवणे ही तर त्यावेळेची शान मानली जायची. सचिनच्या मॅचसाठी कॉलेजच्या दांडीला आणि नंतर वर्गात शिक्षकांना अचानक सुट्टीचे कारण देताना जवळच्या किती नातेवाईकांना जीवंतपणी स्वर्गाची सफर घडवून आणली, याचा काहीच हिशेब नाही. आज ती कारणं आठवली तरी त्या वेडेपणाच आपसुकच हसू येत... सचिनवरील प्रेमापोटी किती खोट बोललो याचा हिशेबच नाही. ऐन तारुण्यातील ‘अफेअर’ लपविण्यासाठी जितकं खोट बोललो नाही तितके सचिनच्या मॅचसाठी खोट बोललो. इतकेच कशाला जिच्याबरोबर जगण्यामरण्याचे वादे केले, त्या बायकोशीही वेळेप्रसंगी खोट बोललो. कारण, एकच सचिनची ‘इनिंग’ पाहता यावी... आमच्या अख्या पिढीला खोटारडे बनवण्यात सचिनचा वाटा असा मोठा होता. तो खेळत गेला आणि आम्ही खोटे बोलत गेलो...
रागाचे चौथे कारण ः सचिन मूळ मित्रांशी मैत्री तोडली...
सचिनला आही दैवत मानले... त्याच्यासाठी जीव ओवळण्यासाठी आम्ही सदैव तयार... तो थोडासा कुठे अपयशी झाला की, सचिनचे टीकाकार गल्लीबोळातून बाहेर निघायचे. मग आम्ही सचिनसेनेचे जणू सरसेनापती असल्याच्या थाटात या टीकाकारांचा समचार घ्यायचो...प्रसंगी मैत्रीला तिलांजली द्यायचो. त्यावेळी व्हॉटसअॅप आणि फेसबुक नसल्यामुळे सचिनविरोधात बोलणार्यांची कुर्माची कुंडली कॉलेजच्या भिंतीपासून ते टॉयलेच्या भिंतीपर्यंत रंगवली जायची. सचिनच्या मानमरताबासाठी अशाप्रकारे क्रिकेटच्या कट्ट्यावर आम्ही कित्येकांच्या मैत्रीला मुठमाती दिलीय. सचिनसाठी आम्ही अनेकदा शत्रुत्व पत्करले... पण, क्रिकेटच्या मैदानाबाहेर एवढा किल्ला आम्ही लढवूनही हे महाशय गप्पच. टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिलं पाहिजे हे त्याचे वाक्य म्हणजे गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे एका कानाखाली खाल्ली तर दुसरा कान पुढे करण्यासारखे झाले. सचिनने बॅटने या टीकेचे उत्तर देईपर्यंत आम्ही टीका करणार्याच्या मैत्रीला मूठमाती दिलेली असायची.
रागाचे पाचवे कारण : सचिनमुळे बँक बॅलन्स रोडावला...
दरवेळी सचिनच्या विक्रमी शतकाच्या आनंदासाठी केलेली पार्टी आणि त्याच्या अपयशी झाल्याचे दुःख दूर सारण्यासाठी केलेली ‘ओली’ पार्टी याचा तर हिशेबच नाही. ‘चला बसूया’ हा आमच्या पिढीचा कोडवर्ड... सचिन खेळला तर सेलिब्रेट करण्यासाठी आणि ‘आऊट’ झाला, तर दुःख दूर करण्यासाठी ‘चला बसूया’चा नारा आमच्या पिढीने बुलंद केला. या सगळ्यात खिसा रिकामा होतोय याच कधी भानच उरल नाही... असो...
सचिनवरील आता सगळ्यात शेवटचं रागाच सहावे कारण -
खरं तर हे कुणालाच सांगणार नव्हतो... पण, सचिन मला तुझा सगळ्यात जास्त राग अशासाठी आलाय की तू तुझ्या ५० वर्षांतील गेली ३४ वर्षे क्रिकेट कसं जगतात, हे आम्हाला शिकवलस. मैदानावरचा तुझा निष्कंलंक वावर, तुझे ते निरागस हसणे. जीजानके खेळणे. शतकानंतर आभाळाकडे पाहून ऋण व्यक्त करणे... सगळ सगळ आम्ही ‘एंजॉय’ केले. तुझ्या असण्याने आम्हाला जीवनात इतर दुःख असतात याचा जणू विसरच पडला होता... प्रत्येक दुःखावर तुझ्या खेळाची हळूवार फुंकर होती. खराखुरा देव आम्ही कधी पाहिला नाही. तो असतो की नाही यावरही विश्वास नाही. पण, तुला पाहिल्यावर देवाचे देवपण जाणवले. तुझ्यावर अपार श्रद्धा असणार्या आमच्यासारख्या भक्तांसाठी तू क्रिकेटच्या मैदानात असूनही खेळपट्टीवर नसतोस हे सत्य पचवणंच कठीण जातय...
तू आता ‘मुंबई इंडियन्स’चा ‘मेंटॉर’आहेस म्हणे. पण आमच्या आयुष्याचा आम्ही तुला कधीच ‘मेंटॉर’ केलय. परवा वानखेडेवर ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘पंजाब किंग्ज इलेव्हन’मधील मॅचवेळी तुझ्या पन्नासाव्या वाढदिवसचा केक तू कापलास. नेहमीप्रमाणे मीही वानखेडेच्या प्रेसबॉक्सवर होतो. तुझ्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवताना डोळ्यात अश्रू होते. तुझ्यावरील अपार प्रेमाचे. मैदानावरील तुझ्या कित्येक ‘हाफ सेंच्युरी’ला आम्ही असेच उभे राहून टाळ्या वाजवल्यात. पण, तू पन्नाशीचा झालास हे मानायला मन तयार नाही. तुझ्या वाढत्या वयाचा राग आलाय. आम्ही मनात तोच पाकिस्तानच्या मैदनावर इमरान खानच्या तोफखान्याला जिगरीने सामोरा जाणारा १६ वर्षांचा तरुण जपलाय. सचिन तुला आमच्या पिढीसाठी तरुणच राहावे लागेल... सदैव...