नवी दिल्ली : कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये रुग्णालयाच्या बाहेर दि.१५ एप्रिल रोजी हत्या करण्यात आली होती. त्यावेळी १० ते १२ पोलीसांसह पत्रकार ही तेथे होते. त्यावेळी पत्रकाराच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी त्या दोघांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. अतिक अहमदच्या तर थेट कानावर बंदूक लावून गोळी झाडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर देशभर या प्रकाराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान तोच प्रसंग दि.२० एप्रिल रोजी प्रयागराजमध्ये पुन्हा उभा राहिला.
मुळात जेव्हा अशाप्रकरणाचा तपास सुरू असतो त्यावेळी तोच प्रसंग पुन्हा त्याच पद्धतीने नाट्यरुपांतरीत करून उभा केला जातो. यामुळे गुन्हा घडला तेव्हा नेमकं काय आणि कसं घडलं याचा अंदाज तपास अधिकाऱ्यांना येतो. प्रत्यक्षदर्शी किंवा आरोपी स्वत: यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा उभा करता येतो.त्यावेळी प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या जबाबानुसार ही प्रक्रिया यावेळी पूर्ण करण्यात आली.
या प्रक्रियेचा अर्थात क्राईम सीन रीक्रिएशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या अतिक आणि अशरफ सारख्याच वेशभूषेत दोन व्यक्तींना पोलीस बंदोबस्तात रुग्णालयाच्या गेटमधून आत आणण्यात आलं. यावेळी समोर मोठ्या संख्येनं माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते ( खोटे असलेले) तसेच ज्याप्रमाणे अतिक आणि अशरफला माध्यामांसमोर ज्या पद्धतीने गोळी घालण्यात आली त्यानुसार नाट्यरूपात ही घटना पोलीसांनी साकारली.