नाशिक : मनसे नेते राज ठाकरेंना पुन्हा एकदा राजकीय धक्का बसला आहे. नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला असल्याची बातमी समोर येत आहे. तसे पत्र दिलीप दातीर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पाठवले होते. पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. तशी चर्चा नाशकात सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान दिलीप दातीर यांनी राजीनामा का दिला याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. दिलीप दातीर हे राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यानंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्याने मनसेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकचे विद्यमान शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी राज ठाकरे यांना पत्र पाठवत मला पदमुक्त करावे, असे आवाहन केले आहे. राज ठाकरे या पत्रावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नगरसेवक पदाचा राजीनामा देत दिलीप दातीर यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही बहाल केली.
दातीर यांचा त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही काळ ते राजकारणात शांत होते. काही महिन्यातच त्यांना मनसे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देत ग्रामीण भागातील संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली. नाशिक मध्ये पक्षांतर्गत वाढलेली गटबाजी संपवण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या नाशिक दौर्यात पक्ष संघटनेत काही बदल करत शहराध्यक्ष असलेले अंकुश पवार यांच्याकडे जिल्ह्याची तर जिल्हाध्यक्ष पदावर असलेले दिलीप दातीर यांच्याकडे आगामी नाशिक महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून तसेच दातीर यांचा महानगरपालिकेतील अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.
राज ठाकरे यांच्या या दौर्यानंतर तसेच संघटनेतील बदलानंतरही पक्षातील गटबाजी शमली नव्हती. दरम्यानच्या काळात पक्षाचे दोन विभाग अध्यक्ष तसेच शहर समन्वयक असलेले सचिन भोसले यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देत नवीन राजकीय वाट निवडली होती. मागील काही काळात मनसेत झालेल्या पडझडीनंतरही पक्षात गटबाजी तसेच अनेक प्रयत्नानंतरही पक्षाला मिळत नसलेली गती यामुळे पक्ष संघटनेत मोठी अस्वस्थता आहे. आता दिलीप दातीर यांनी राजीनामा दिल्याने मनसेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.