बोकारो : झारखंडमधील एका मिशनरीच्या शाळेत 'जय श्री राम' चा जयघोष दिला म्हणून दोन दिवसांसाठी संपूर्ण वर्गाला निलंबित केल्याची घटना घडली आहे.विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणाची चौकशी करून शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे. पंरतू या सर्व प्रकरणावर शाळेच्या मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांवर शाळेतील नियमांचे आणि शिक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.
ही घटना बोकारो जिल्ह्यातील गोमिया येथील आहे. लोयोला शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १०वीच्या सर्व विद्यार्थ्यांना जय श्री रामचा जयघोष केल्याप्रकरणी दोन दिवसांसाठी निलंबित केले. ११एप्रिल रोजी या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शाळेत येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर ही बाब उघडकीस आली.
विश्व हिंदू परिषदेचे धनबाद विभागाचे मंत्री विनय कुमार यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले आहे. विनय कुमार सांगतात की, ५ एप्रिलला वर्गात एका मुलाने जय श्री रामचा जयघोष केला. यानंतर शिक्षा म्हणून वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील चार तासिकांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर ही शिक्षा ६ एप्रिलपर्यत वाढवण्यात आली. एका रिपोर्टनुसार शाळेच्या मुख्याध्यापिका अलिशा मंजुनी यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना केवळ एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले असून सर्व मुलांवर ही कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकरणी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या निदर्शनासही आणण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला नोटीस बजावली आहे.
यापूर्वी झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतही असेच प्रकरण समोर आले होते. या घटनेत वर्गाच्या फलकावर 'जय श्री राम' लिहिल्याबद्दल विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ८ जुलै २०२२ रोजी चौथ्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने फळ्यावर जय श्री राम लिहिले होते. दुसऱ्या दिवशी प्राचार्य मोहम्मद अबुल कलाम यांनी त्यांना बेदम मारहाण केली.