ठाणे : ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी पोलीस वैभव कदम हे बुधवारी सकाळी छिन्नविछीन्न अवस्थेत निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वेमार्गावर आढळल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिसांनी त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वैभव कदम हे तत्कालीन मंत्री जितेंद्र आव्हाडांचे अंगरक्षक असताना ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना आव्हाड यांच्या बंगल्यात नेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी होते. सध्या ठाणे पोलिसांकडुन त्यांची चौकशी सुरु होती. त्यामुळे, कदम यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली. याचे गूढ वाढले आहे. दरम्यान, भाजपच्या मोहित कंबोज यांनी ट्वीट करून ही आत्महत्या नसुन खून असल्याचा दावा करीत एफआयआर दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली असल्याने आ.आव्हाडांच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेल्या वैभव कदम यांचा आकस्मिक मृत्यु झाल्याची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत बोलताना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी, वैभव कदम बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास निळजे स्थानका दरम्यान रेल्वे मार्गावर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना दिवा येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्यांच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यानंतर त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकिय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असुन पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.दरम्यान, घरगुती कपड्यांवर वैभव कदम हे गंभीर जखमी अवस्थेत निळजे नजीकच्या रेल्वे रुळावर सापडले होते. गेले काही दिवस ठाणे गुन्हे शाखेकडून त्यांची कसुन चौकशी सुरु होती. आरोपी असले तरी कदाचित मुख्य साक्षीदार म्हणुन त्यांची साक्ष करमुसे प्रकरणात महत्वाची होती. परिणामी आ.आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे होती. त्यामुळे वैभव कदम यांची हत्या झाली की ताणतणावामुळे त्यांनी आत्महत्या केली. याचा तपास पोलीस करीत आहेत.
करमुसे प्रकरण काय आहे ?
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कावेसर भागात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी ठाकरे सरकारमधील तत्कालीन मंंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याच्या रागातुन आव्हाड यांचे अंगरक्षक (पोलीस) आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातुन उचलुन आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर नेत बेदम मारले होते. याप्रकरणी वर्तकनगर पोलीसांनी गुन्हा दाखल करून,आव्हाड यांच्या स्वीय सहायकासह सहा कार्यकर्त्याना अटक केली होती. यातील तिघाही पोलिसांची विभागीय चौकशी झाली होती.मात्र, पोलिसांनी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ सुरु होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या बडग्याने तब्बल दीड वर्षानंतर दि.१४ ऑक्टो.२०२१ रोजी सायंकाळी वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना छुटपुट अटक करून तात्काळ त्यांची जामिनावर मुक्तता देखील केली होती. तर,महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानेही पोलीस कॉन्स्टेबल सागर तुषार मोरे, पोलिस नाईक सुरेश आवाजी जनाठे आणि पोलीस हवालदार वैभव शिवाजी कदम यांच्याविरोधात कंटेप्ट ऑफ कोर्टचा ठपका ठेवला होता.
दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीसाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश २४ फेब्रु.२०२३ रोजी दिले होते.
मनसुख हिरेन २.० - मोहित कंबोज यांचा आरोप
मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. हा एपिसोड आत्महत्येचा नसून खुनाचा आहे, असा दावा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये करून कंबोज यांनी एक पोस्टही शेअर केली आहे. वैभव कदम यांनी आपल्या मोबाईलवर ठेवलेल्या शेवटच्या स्टेटसमध्ये लिहिले आहे की, एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली, "पोलिस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे की मी आरोपी नाही."असा दावाही मृत्युपूर्वी स्टेटसमध्ये केल्याचे समोर आले आहे.