मराठी लेखनसुधारणेसाठी ‘अक्षरा’

    26-Feb-2023   
Total Views |
Akshara Software


आज मराठी राजभाषा गौरव दिन. मराठी भाषेविषयी बोलताना तिच्या शुद्धलेखनाचा विचार करणेही आवश्यक आहे. मग आज सर्रास प्रश्न विचारला जातो की, मराठी मुद्रितशोधनाचे कोणते सॉफ्टवेअर नाही का? अनुत्तरित असलेल्या या प्रश्नाला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण, ’अक्षरा’ हे मराठीमुद्रितशोधनाचे सॉफ्टवेअर लवकरच लोकार्पित होत आहे. जाणून घेऊया त्याविषयी...

कोणतेही संशोधन हे एका गरजेतून होत असते. गरज ही शोधाची जननी आहे, ही उक्ती सर्वज्ञात आहेच. मराठी मुद्रितशोधन हा खरंतर किचकट वा वेळखाऊ विषय आहे. त्यातही मजकूर किती मुद्रितशोधित होईल आणि चुका राहतील, हा परत वादाचा मुद्दा.

आज मराठी भाषा ही जागतिक स्तरावर बोलली जाणारी तेराव्या क्रमांकाची भाषा आहे. तशीच ती भारतातील अधिकृत भाषांमधील एक आहे. महाराष्ट्राची राजभाषा असून व्यवहारभाषादेखील आहे. शासकीय, प्रशासकीय निर्णय हे महाराष्ट्रामध्ये मराठीत घेतले जातात, तर लेखी दस्तावेज हाही मराठीमध्ये नोंदीत केला जातो. जवळजवळ दहा-अकरा कोटी लोक मराठी बोलतात आणि महाराष्ट्र, गोवा या राज्यांमध्ये प्रामुख्याने तर काही अंशी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये मराठीचा वापर केला जातो. अशी ही प्राचीन इतिहास असणारी मराठी...
 
मराठी मुद्रितशोधनाची गरज का आहे, हे बघण्यासाठी आपण सहज काही वृत्तपत्रे वा सोशल मीडियावरील पोस्ट चाळू शकतो. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने ‘महागणार’मधील ‘म’चं वगळला होता. अगदी ‘परीक्षा’ हा शब्ददेखील नामांकित विद्यापीठे ‘परिक्षा’ असा लिहितात. ‘परिक्षा’ म्हणजे चिखल होय. एका ‘इ’काराने अर्थाचा अनर्थ होतो. समाजमाध्यमांवरील पोस्ट म्हणजे अशुद्धलेखनाचा कहरच असतो. शाब्दिक भेदांमुळे ‘ट्रोल’ करण्याचेही प्रमाण अधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वेळेची बचत, काळाची गरज, भाषेची निकड अशा कारणांसाठी मराठी मुद्रितशोधनाच्या सॉफ्टवेअरची अत्यावश्यकता भासू लागली. त्यातून ‘लेखणी सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड’ने ‘अक्षरा’ या मुद्रितशोधन करणार्‍या सॉफ्टवेअरची निर्मिती केली.आता प्रश्न येईल की, आधी कोणाला ही गरज वाटली नाही का? तर असं नाही. २०००च्या दरम्यान मराठीतील प्रसिद्ध शुद्धलेखनकार अरुण फडके आणि ‘कालनिर्णय’ यांनी यासाठी प्रयत्न केले होते.

२०१८ साली ‘सीडॅक’ या प्रसिद्ध कंपनीने मराठी सॉफ्टवेअरच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला होता. परंतु, कोणतेही कार्य तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होऊ शकले नाही. कारण, या सॉफ्टवेअरसाठी मराठी भाषातज्ज्ञ आणि मराठी भाषिक अभियंता यांचा मेळ बसणे आवश्यक आहे. हे कठीण काम कोल्हापूर येथील निवास पाटील, प्रभाकर पाटील आणि विश्वास कदम या युवकांनी पूर्ण केले.‘ अल्वेज बी करेक्ट’ या त्यांच्या बोधवाक्याप्रमाणे ते या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मराठी शाब्दिक व्याकरणावर भर दिलेला आहे. त्यांचे बोधचिन्हही उलटा ‘म’ असून भिंग आहे. उलटा ‘म’ मराठतील चुकीचे अक्षर दर्शवतो तर भिंग ते शोधणे हे कार्य दर्शवतो. यातून या सॉफ्टवेअरचे प्रयोजन दिसून येते.
 
 
सॉफ्टवेअरच्या प्रारंभीच संत तुकाराम महाराजांचा एक अभंग झळकताना दिसतो -
 
आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें ।
शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव ।
शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥


शब्द किती महत्त्वाचे आहेत, हे संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले आहे. हे शब्दमाहात्म्य ‘ अक्षरा’ सॉफ्टवेअर जपण्याचा प्रयत्न करणार आहे.आपण इंग्रजीमध्ये विविध स्पेलचेकर बघतो. इंग्रजी ही तांत्रिक भाषा असल्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या त्यातील स्पेलिंग तपासणे सोप्पे आहे. मराठी भाषेचे तसे नाही. मराठी भाषा वळवावी, तशी वळते. त्यामुळे त्यातील अर्थ जाणून मुद्रितशोधन करणे आवश्यक आहे. ‘अक्षरा’ सॉफ्टवेअर याविषयी जागृत आहे. ‘अक्षरा’ कशा प्रकारे काम करेल, तर -हे सॉफ्टवेअर गुगल युनिकोडसाठी कार्य करणार आहे. कोणत्याही खासगी लिपींसाठी नाही. गुगल युनिकोडमधील कोणताही मजकूर मुद्रितशोधित होणार असल्याने ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’ अशी समाजमाध्यमे तसेच जिथे जिथे गुगल युनिकोडमध्ये लेखन होईल, तेथील मजकूर मुद्रितशोधित केला जाईल. या सॉफ्टवेअरमध्ये काही लाख मराठी शब्द फीड केलेले आहेत.प्रचलित अन्य भाषिक शब्द आणि दैनंदिन व्यवहारातील इंग्रजी शब्द या सॉफ्टवेअरमध्ये डेटास्वरुपात आहेत. त्यामुळे अधिकाधिक मराठी शब्द मुद्रितशोधित करण्याकडे या सॉफ्टवेअरचा कल आहे. तसेच एखादा शब्द या सॉफ्टवेअरमध्ये आढळला नाही, तर ‘अ‍ॅड टू डिक्शनरी’ करून आपण हा शब्द ‘अ‍ॅड’ करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करू शकतो. अ‍ॅडमिन आणि भाषातज्ज्ञ यांच्याकडून मान्यता मिळाल्यावर हा शब्द या सॉफ्टवेअरच्या डेटामध्ये ‘अ‍ॅड’ होईल.

तसेच या सॉफ्टवेअरमध्ये पर्यायी शब्दव्यवस्था देण्यात आलेली आहे. उदा. एखाद्याने ‘कॉलेज’ असा शब्द टाईप केला आणि ‘राईट क्लिक’ करून बघितले, तर ‘कॉलेज’चे स्पेलिंग दिसेल आणि कॉलेजला मराठीतील महाविद्यालय हा पर्यायी शब्द दिसेल. वापरकर्ता त्याला हवा असलेला शब्द निवडू शकतो. तसेच या सॉफ्टवेअरमध्ये शब्दांचे अर्थही ‘फीड’ केलेले आहेत. आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ कळत नसेल, तर त्या शब्दावर ‘राईट क्लिक’ करून शब्दाचा अर्थ आपण जाणू शकतो. त्यासाठी शब्दकोशचा डेटा त्यांनी ‘फ़ीड’ केलेला आहे. सर्व देश,जिल्हे, शहरे, गावे, ठिकाणे यांची नावेही ‘अ‍ॅड’ केलेली आहेत. त्यामुळे एखाद्या गावाविषयी शंका असल्यास त्या नावावर ‘राईट क्लिक’ करून तुम्ही बघू शकता. उदा. तिरुवनंतपूरम असेल. या शब्दावर राईट क्लिक केल्यास ‘हे शहर केरळ मध्ये आहे.’ असे तो तुम्हाला दर्शवेल. म्हणजेच सामान्य स्पेलचेकर एवढंच काम न करता त्याचा भाषिक अभ्यास हे सॉफ्टवेअर करेल.
 
 
‘अक्षरा’ची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे -

प्रभावी वैशिष्ट्यांसह हे डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे. तुम्ही टाईप केलेले चुकीचे शब्द ‘हायलाईट’ केले जातील. मूलभूत र्‍हस्व-दीर्घ चुका आपोआप दुरुस्त केल्या जातील. चुकीच्या शब्दासाठी बरोबर पर्यायी शब्द ‘अक्षरा’मध्ये सुचवलेले आहेत. ‘गुगल टूल्स’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ इन्स्क्रिप्ट तुम्ही वापरू शकाल. तसेच लेखन करताना पुढील शब्द तुम्हाला ’सजेस्ट’ केला जाईल. हवा असल्यास तो तुम्ही स्वीकारू शकता. पूर्वलिखित मजकूरही ‘अक्षरा’मध्ये तपासला जाईल. मूळ शब्दांचे अर्थ इथे उपलब्ध आहेत. योग्य, अयोग्य आणि अन्य तक्रारींसाठी ‘रिपोर्ट’ हा पर्याय उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर इंटरनेट कनेक्शन मिळाल्यावर रोजच्या रोज अद्ययावत होत राहील. एखादा शब्द किती प्रमाणात वापरला जातो, याचीही आकडेवारी इथे उपलब्ध आहे.
 
‘अक्षरा’ सॉफ्टवेअरच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, एवढे पारदर्शक त्यांचे संकेतस्थळ आहे. विविध भाषातज्ज्ञ ‘ अक्षरा’सोबत जोडलेले आहेत. ‘ट्रायल’ पॅकेजमधून अत्यल्प किमतीत आपणही ‘अक्षरा’ची परीक्षा घेऊ शकतो. तसेच विविध मान्यवरांनी या सॉफ्टवेअरचा वापर करून आपले मत नोंदवलेले आहे. परवाच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात या सॉफ्टवेअरच्या माहिती प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला.आता उत्सुकता असेल ती याच्यासाठी आवश्यक असणार्‍या सिस्टीम जाणण्याची. तर अगदी सामान्यातील सामान्य माणसाचा विचार या सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये केलेला आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज् असलेला संगणक, लॅपटॉप अन्य काही साधन हे सॉफ्टवेअर वापरू शकते. ’मायक्रोसॉफ्ट वर्ड’चे २०१३ नंतरचे कोणतेही व्हर्जन यासाठी उपयुक्त आहे. याची मेमरी एक जीबी ते जरा अधिक असू शकते.

हे सॉफ्टवेअर लोकार्पित झाल्यावर तुम्ही www.myakshara.in संकेतस्थळाला भेट देऊन ‘डाऊनलोड अक्षरा’वरती क्लिक करा. ते सॉफ्टवेअर तुमच्या संगणकामध्ये इन्स्टॉल होईल.मग ‘अक्षरा’ ओपन करा. तुमचे डीटेल्स भरा आणि मराठी लेखनाचा शुद्धतेसह आनंद घ्या. अगदी दहा रुपये एक महिना ते दोन हजार रुपये ६४ महिने अशी त्यांची अत्यल्प मानधनामध्ये सुविधा उपलब्ध आहेत.खरंतर हे सॉफ्टवेअर मराठी राजभाषा गौरव दिनाला लोकार्पित होणार होते. परंतु, शासकीय प्रक्रियांमध्ये अडकल्यामुळे लोकार्पित होण्याची तारीख एक-दोन आठवडे पुढे जाण्याची शक्यता आहे. या सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये अनेक भाषातज्ज्ञांनी स्वखुशीने योगदान दिलेच. काहींनी मराठीतील महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून आर्थिक साहाय्यदेखील केले. परंतु, शासनाने अजून साहाय्य केल्यास हे ‘सॉफ्टवेअर’ मोफत वापरता येऊ शकते. शासकीय मान्यतांनंतर हे चित्र स्पष्ट होईल.परंतु, तोपर्यंत मराठी भाषेला खरोखर अभिमानास्पद असा ‘ अक्षरा’ हा मुद्रितशोधन सॉफ्टवेअर निर्मितीचा प्रकल्प गौरवास्पदच आहे.या सॉफ्टवेअरच्या अधिक माहितीसाठी www.myakshara.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा ९२८४९७७२११ या कार्यालयीन संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.मुळात ‘अक्षर’ म्हणजेच ज्याचा कधी क्षर होत नाही, असे. नाश न पावणारे. भाषा आणि तिचे शुद्धलेखनही कायम ‘अक्षर’ असते. त्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या ‘अक्षरा’चा आपण अधिकाधिक वापर करून मराठी लेखन ‘ अक्षरा’मय शुद्ध करूया...


 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.