काबुल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवला तेव्हापासून तालिबानी तेथील महिलांवर वेगवेगळे निर्बंध लावत आहेत. तालिबानने दोन प्रांतात गर्भनिरोधक औषधांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. औषध विक्रेत्यांना इशाराही दिला असून, हे पाश्चात्यांचे षड्यंत्र असल्याचे म्हटले जात आहे.
तालिबान घरोघरी जाऊन सुईणींना धमकावत आहेत आणि फार्मसीना गर्भनिरोधक औषधे आणि उपकरणांची विक्री थांबवण्याचे आदेश देत आहेत. महिलांद्वारे गर्भनिरोधकांचा वापर हा मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा कट आहे. काबूलमध्ये, एका दुकानाच्या मालकाने दावा केला की तालिबान बंदूक घेऊन त्याच्या दुकानात गेले होते आणि त्याला गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री थांबवण्याची धमकी दिली होती. शहरातील प्रत्येक फार्मसीची नियमितपणे तपासणी केली जाते आणि स्टोअर मालकांनी उत्पादने विकणे बंद केले आहे. प्रत्येक 14 पैकी एक अफगाण महिलेचा गर्भधारणा-संबंधित कारणांमुळे मृत्यु होत असल्याच्या सूचना आल्या आहेत.