‘पद्मश्री’ तीर्थस्वरूप डॉ. आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना नुकताच ‘महाराष्ट्रभूषण‘ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...
ज्या वेळी पृथ्वीवर अज्ञानाने हाहाकार माजवला त्या त्या वेळी परमेश्वराला त्या सर्व वाईट प्रवृत्ती, विचार यांना नष्ट करण्यासाठी यावचं लागतं. थोडक्यात काय तर संभवामी युगेयुगे, ‘महाराष्ट्रभूषण’ तीर्थस्वरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांनी श्रीसमर्थ बैठकीची स्थापना केली. ’जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ या संत वचनाप्रमाणे नानासाहेबांनी १९४३ रोजी हा ज्ञानाचा समर्थ झरा सर्वांसाठी प्राप्त करून दिला. मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात या समर्थवचनाने तळागाळातील तसेच सर्व जाती धर्मातील माणसाला जवळ घेतले. डॉ. नानासाहेब यांनी वसा तर घेतला. परंतु, प्रचंड त्रासही सहन करावा लागला. कारण, झोपी गेलेल्या माणसाला उठवता येते व ज्याने झोपेचे सोंग घेतले, त्याला कसे उठवणार, अशा पद्धतीच अज्ञानी माणसाचं रूप असताना माणसाला ज्ञानाकडे आणायचे म्हणजे खूप कठीण काम असते.
नानासाहेबांनी देह ठेवल्यानंतर तोच वारसा पुढे आजही त्याच सामर्थ्यानिशी चालवण्याचे काम करत आहेत त्यांचे सुपुत्र डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी. संत वाङ्मयाचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, पण त्यात उभं राहणं मात्र कठीण असतं आणि त्यात उभं कसं राहावं, याची शिकवण जर कोणी दिली असेल, तर ती तीर्थस्वरूप आप्पासाहेब यांनी. सहज आणि सोप्या भाषेत मौखिक निरुपणाच्या माध्यमातून आज हजारो लाखोंच्या घरात उपासना, भक्ती, मंगल आचरण, शिकवण, असा ज्ञानाचा झरा पोहोचवण्याचे काम करत आहेत. आज मनुष्य पूर्णपणे हतबल झालेला आहे. परिस्थिती समोर त्याचेच परिणाम असे की आत्महत्या, कलह, तंटा, आणि बरेच काही, कोण कोणाला सोडवणार आणि कसा सुटणार, ही कलयुगातील मोठी समस्या आहे आणि याच वास्तवतेचा विचार करून आज दासबोधाच्या या श्रवणातून डॉ. आप्पासाहेब यांनी विषय, वासना, अज्ञान या पुरातून लाखो हजारोंना तारले आहे.
निष्काम भूमिकेतून आज हे काम पिढ्यान्पिढ्या चालू आहे. आप्पासाहेब नेहमी म्हणतात की, प्रभू रामचंद्र यांची जर ओळख करुन द्यायची असेल, तर प्रथम त्यांना ज्यांनी घडवलं ते श्रीसद्गुरू वशिष्ठ यांचीच ओळख द्यावी लागेल. त्याचप्रमाणे मनुष्याला भक्ती करायची असेल, तर कर्ता कोण याची ओळख घेणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, उत्तम गुणाकडे यायचे म्हणजे अवगुण त्यागावे लागतात आणि ते कसे जातात यासाठी हवं ते अवण. पूर्वी मेलेल्या माणसाला उठवलं जायचं, आजही काही वेगळं नाही. आप्पासाहेब हे जो अज्ञानामुळे, नैराश्याने ग्रासलेला आहे, जीवन संपवण्यासाठी जात आहे, अशा मनुष्य जातीला उत्तम शिकवण देऊन उभं करत आहेत.
‘देशाने मला काय दिलं‘ यापेक्षा ‘मी देशाला काय देणं लागतो‘ हा विचार आज आप्पासाहेब यांनी प्रत्येक माणसाच्या मनात रुजवला आहे. त्याचाच प्रत्यय असा की आज परमार्थच नाही, तर सामाजिक कार्यदेखील आज तेवढ्याच ताकदीने आप्पासाहेब आणि त्यांचे सुपुत्र सचिनदादा हे ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’तर्फे राबवित आहेत आणि श्री सदस्य हे देखील तेवढ्याच प्रामाणिकपणे त्यात उभे राहत आहेत. आजवर अनके पुरस्कारांनी आप्पासाहेब यांना गौरविण्यात आले आहे. परंतु, आप्पासाहेब नेहमी सांगतात की, पुरस्कार मिळाला की जबाबदारी वाढते कारण त्याचे रक्षण करता यायला हवे कोणत्याही प्रकारचा डाग लागता कामा नये आणि खूप मान्यवरांनी त्यांच्या शब्दात सांगितले आहे. आप्पासाहेब यांना पुरस्कार दिला म्हणजे पुरस्काराचे महत्त्व वाढले, असे कार्य त्यांचे आहे. शेवटी एकच सांगावसं वाटतं की,ज्या आप्पासाहेब यांनी स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव याची ओळख करून दिली, अशा पावलांना आज कोटी कोटी वंदन!
‘पद्मश्री’ डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजेच चैतन्यमनी व्यक्तिमत्त्व आणि विचाराचे संचित घेऊन पुढे जाणारे तेजपुंज व्यक्तिमत्त्व. मानवी मनाच्या उत्कट भावनांचा जेव्हा अतिरेक होतो. तेव्हा, सद्विचार त्याच्या व्यक्तिमत्त्व प्रकियेत महत्त्वाचे योगदान देतात. श्री सदस्य बैठकीच्या माध्यमातून मानवी मनाच्या हुंकाराला सात्विक स्वरूप देऊन त्यांच्यातील सद्विचार जागविण्याचे काम श्री सदस्य बैठकीच्या माध्यमातून होत आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. या सर्वलढ्याचे केंद्रबिंदू डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारीच राहिले आहेत. ‘स्वछतादूत’ ते ‘पद्मश्री’अशी सर्वोच्च पुरस्काराची मोहोर जी त्यांना लाभली त्या पाठीमागे कर्तृत्त्वाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
-अॅड. रत्नाकर पाटील