नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १० खासदारांनी बुधवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण २१ खासदारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी १२ खासदार निवडणुकीत विजयी झाले तर ९ पराभूत झाले आहेत. त्यानंतर १२ विजयी खासदारांपैकी १० खासदारांनी बुधवारी लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला. केवळ राजस्थानमधून निवडणूक जिंकलेल्या बालकनाथ यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.
संसद सदस्यत्व सोडणाऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातून नरेंद्रसिंह तोमर (केंद्रीय मंत्री), प्रल्हादसिंह पटेल (केंद्रीय मंत्री), राकेश सिंह, उदय प्रताप आणि रीती पाठक यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे छत्तीगढमधून अरुण साहू आणि गोमती साई तर राजस्थानमधून राज्यवर्धनसिंह राठोड, दिया कुमारी आणि किरोडीलाल मीणा यांचा समावेश आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली या खासदारांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची भेट घेतली. या भेटीनंतर संसद सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.