राम मंदिर लोकार्पणासाठी राज ठाकरेंना निमंत्रण पण उद्धव ठाकरेंना नाही! वाचा, मंत्र्यांनी सांगितलं कारण
26-Dec-2023
Total Views | 300
मुंबई : राज्यात सध्या राम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. यातच केंद्र सरकारला व्हीव्हीआयपी वाटत आहेत त्यांना अपेक्षित आहेत ते जाणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे पण उद्धव ठाकरेंना नाही, असे वक्तव्य मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. महालक्ष्मी सरसच्या उद्धाटनानंतर त्यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
गिरीष महाजन म्हणाले की, "अयोध्येतील राम मंदिरात उद्धव ठाकरेंचं काय योगदान आहे हे संपुर्ण देशाला माहिती आहे. त्यामुळे आपण व्हीव्हीआयपी आहोत असे त्यांना जरी वाटत असले पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते नसतील. त्यामुळे त्यांना बोलवलं नाही. जे खऱ्या अर्थाने व्हीआयपी आहेत त्यांना सरकारने बोलवलं आहे."
आयत्या बिळावर नागोबा
संजय राऊतांविषयी बोलताना ते म्हणाले की, "घरी बसून भुमिका घेणं आणि प्रत्यक्षात जाऊन काम करणं यात खूप फरक आहे. कारसेवाच्या वेळी काय झालं हे सगळ्या देशाला माहिती आहे. कारसेवा कोणी केली, कोणाचं योगदान आहे, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही २० दिवस जेलमध्ये होतो. जंगलातून ५० किलोमीटर पायी प्रवास करुन तिथे पोहोचलो. तेव्हा उद्धवजी आणि संजय राऊत कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंची भुमिका स्पष्ट होती. त्यांचं राम मंदिराला समर्थन होतं यात दुमत नाही. पण हे आयत्या बिळावर नागोबा येऊन बसले आहेत. त्यामुळे संजय राऊतांनी आणि उद्धवजींनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा, असेही ते म्हणाले.
तसेच "केंद्र सरकारला जे व्हीव्हीआयपी वाटत आहेत त्यांना अपेक्षित आहेत ते जाणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना निमंत्रण दिलं आहे. जे सातत्याने केंद्र सरकारवर राम मंदिराबाबत टीका करतात त्यांना आमंत्रण देण्याचं काय कारण आहे? त्यामुळे त्यांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही," असा टोलाही महाजन यांनी लगावला आहे.