मुंबई : विधानपरिषदेच्या प्रभारी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर चुकीचे आरोप करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांना उपसभाती सभागृहात बोलू देत नाही, अशा आशयाचा ‘व्हिडिओ’ उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता. धंगेकर हे विधान परिषदेचे सदस्य नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणावा, असा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी सभागृहात ठेवला. यावर सभागृहात चर्चा झाल्यावर सुषमा अंधारे यांनी ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव ठेवण्यास अनुमती देण्यात येईल, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिले होते.
याबाबत सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना उद्देशून संस्कृत भाषेत पत्र लिहिले आहे. 'मी माफी मागणार नाही. त्यासाठी मला तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल. लोकशाही वाचवण्यासाठी मी लढायला तयार आहे. हक्कभंगाची कारवाई झाली तरी मी माफी मागणार नाही', असे अंधारे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे सभागृहाचा अवमान करणाऱ्या अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाणार आहे.