मनोज जरांगे आणि शिष्टमंडळ भेटीत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
21-Dec-2023
Total Views | 66
जालना : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी भेट घेतली आहे. ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री संदीपान भुमरे हे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंच्या भेटीकरिता गेले होते. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
दरम्यान, कुणबी नोंदी सापडलेल्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी शिष्ट मंडळाला केली. तसेच आई ओबीसी असेल तर मुलालासुद्धा ओबीसी प्रमाणपत्र द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे. परंतू, आई ओबीसी असल्यास मुलाला ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नसल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले आहे.
मंत्री गिरीष महाजन भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी विधानसभेत चार दिवस सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर सविस्तर उत्तर दिलं आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ आरक्षण घोषित करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. आरक्षणाचा मुद्दा अंतिम टप्प्यात आला असून आता २४ तारीख, अल्टिमेटम हे न करता आम्हाला साथ द्यावी अशी मनोज जरांगेंना विनंती करायला आलो असल्याचेही त्यांनी सांगितले."
पत्नीच्या नावाने ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाही
पत्नीच्या नावाने ओबीसी प्रमाणपत्र मिळत नाही, असा न्यायालयाचा नियम आहे. परंतू, मागच्या वेळी जरांगेंसोबत झालेल्या बोलण्यात सगे सोयरे हा शब्द टाकण्यात आला आहे. जरांगेंनी सगे सोयरे म्हणजे व्याही असा शब्दश: अर्थ घेतला आहे. पण तो कुठेही नियमात बसत नाही. सगे सोयरे म्हणजे मुलीकडचे नाही. त्यामुळे त्यांनी सोयरे शब्द पकडल्याने अडचण निर्माण झाली आहे. परंतू, यातूनही आम्ही नक्कीच खेळीमेळीने तोडगा काढू, असेही गिरीष महाजन यांनी सांगितले आहे.