ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्युतांडव प्रकरणाचे पडसाद बुधवारी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले. भाजपचे आ.निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी, नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार सहायक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) व व्याख्यात्यावर (लेक्चरर) आज कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट केले. दरम्यान, या कारवाईबाबत बोलण्यास रुग्णालयाचे डिन डॉ. राकेश बारोट यांनी असमर्थता दर्शवत गेल्या काही महिन्यात कळवा रुग्णालयात रुग्णांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्याचे दै. मुंबई तरुण भारत ला सांगितले.
कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशी संदर्भात आ. निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले. या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती का, या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार का, अत्यवस्थ ९ ते १० रुग्ण अन्य रुग्णालयात हलविताना योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा सवाल आ. डावखरे यांनी केला.
त्यावर मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घटनेपूर्वी ४८ व घटनेनंतर १२५ कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात अशा १९३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या पटलावर ठेवला जाईल.तसेच, या प्रकरणातील दोषी सहायक प्राध्यापक व व्याख्यात्यावर आजच कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडव प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीकडुन शासनाला सादर केलेल्या अहवालात कुणावरही ठपका ठेवला नव्हता. याचा जाब आमदार संजय केळकर यांनीही आयुक्त अभिजीत बांगर यांना विचारला होता. त्यावर आयुक्तांनी, या प्रकरणी कारवाई होणार असल्याचा निर्वाळा दिला होता.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १२ ऑगस्ट २०२३ रोजी एकाच दिवशी झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमली होती. चौकशीत रुग्णालयातील महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यापासून ते डॉक्टर्स, नर्स, मृतांचे नातेवाईक, अशा सर्वांचे जबाब नोंदवले होते. मात्र, हा अहवाल सादर करण्यास चौकशी समितीला बराच विलंब लागला होता. आता हिवाळी अधिवेशनात हा अहवाल पटलावर ठेवण्यात आला असुन त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या सहायक प्राध्यापक व व्याख्यात्यावर कारवाई होणार आहे.