मुंबई : ''मुंबईकरांच्या सभोवतालचा परिसर झाडाझुडपांनी बहरलेला असावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सतत नवनवीन उपक्रम राबवित असते. विविध संस्था, सामाजिक संघटनादेखील राबत असतात. मात्र हे प्रयत्न एकतर्फी राहायला नको म्हणून ‘ग्रीनिंग मुंबई’ या माहिती पुस्तिकेद्वारे सर्वसामान्य मुंबईकरदेखील यात खारीचा वाटा उचलू शकतात. आपली मुंबई अधिकाधिक हिरवी रहावी, यासाठी मुंबईकरांनीदेखील सहभाग घ्यावा, पुढाकार घ्यावा,'' असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी केले.
मुंबईतील घरांची बाल्कनी, इमारतींचे छत, गृहनिर्माण संस्थांचे आवार, लहान लहान बगीचे आदी ठिकाणी कमीत कमी जागेत विविध प्रकारची रोपटी, झाडे, फुल-फळ झाडे कशी लावावीत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'डब्ल्यूआरआय इंडिया' या संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘ग्रीनिंग मुंबई’ या मार्गदर्शक पुस्तिकेचे महानगरपालिका मुख्यालयात सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळीउद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, उप अधीक्षक (वृक्ष प्राधिकरण) ज्ञानदेव मुंडे, 'डब्ल्यूआरआय इंडिया'च्या कार्यक्रम प्रमुख लुबैना रंगवाला, ‘ओइकोस फॉर इकोलॉजिकल सर्व्हिसेस आणि ट्रान्सफॉर्मिंग’च्या कीर्ति वाणी, टाटा समाज विज्ञान संस्थेच्या अविनाश कौर आदी मान्यवरांसह पर्यावरणविषयक अभ्यासक उपस्थित होते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त भिडे म्हणाल्या की, ''मुंबई महानगरात वृक्षवल्ली अधिकाधिक बहरावी आणि त्या निमित्ताने पर्यावरण संतुलन टिकून राहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अनेक उपक्रम हाती घेत असते. मुंबईत मुळातच जागेची कमतरता असल्याने येथे उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'ग्रीनिंग मुंबई' ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. या माहिती पुस्तिकेत पर्यावरणविषयक शास्त्रीय माहिती आहे. तिचा मुंबईकरांना वृक्षारोपण करताना नक्कीच फायदा होईल.
आज या पुस्तिकेचे नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशन करण्यात आले आहे. त्यातील माहिती वाचून व अभ्यासून पर्यावरणविषयक जागरुक असलेल्या मुंबईकरांनादेखील यात आपली मते नोंदविता येणार आहेत. नागरिकांची मते प्राप्त झाल्यानंतर, योग्य आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येतील, अशा सुचनांचा किंवा पर्यायांचा देखील पुस्तिकेत समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईकरांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत आपले मत नोंदवावे,'' असे आवाहनही श्रीमती भिडे यांनी या निमित्ताने केले.
उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी प्रास्ताविकातून उद्यान विभाग राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच ‘ग्रीनिंग मुंबई’ ही पुस्तिका तयार करण्यामागची बृहन्मुंबई महानगरपालिकेची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
असे नोंदवा आपले मत-
या माहिती पुस्तिकेची http://surl.li/ojnfk ही ऑनलाईन लिंक असून, त्याद्वारे माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करता येऊ शकते. त्यातील पान क्र. चारवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मुंबईकर या पुस्तिकेबाबत आपली मते नोंदवू शकतात. अंतिम सुचनांचा समावेश करुन दि. ८ मार्च २०२४ रोजी या पुस्तिकेची सर्व समावेशक आवृत्ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.