मुंबई : अंतराळ, इलेक्ट्रिक आणि सोशल मीडियाच्या जगात आपले कौशल्य सिद्ध करणारा एलॉन मस्क आता लहान मुलांसाठी मेगाप्लॅन तयार करत आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार, टेक्सासमध्ये एक नवीन शैक्षणिक संस्था स्थापन करणार आहे. ज्यामध्ये नर्सरीपासून हायस्कूलपर्यंत शिक्षणाची सुविधा असेल. तसेच भविष्यात याची वाढ होऊन कॉलेजची स्थापना देखील केली जाऊ शकते, असंही यात म्हटलं आहे.
इलॉन मस्कने या शाळेसाठी एका नवीन उभारलेल्या चॅरिटीमध्ये तब्बल 100 मिलियन डॉलर्स दान केले आहेत. या नव्या संस्थेचे उद्दिष्ट विज्ञान, आयटी, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांवर भर देऊन त्यासाठी एक अभिनव अभ्यासक्रम तयार करणे आहे. यामुळेच ही संस्था 'STEM' (Science, Tech, Engineering, Maths) या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
मस्कच्या या शाळेत सुरुवातीला 50 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांकडून कोणतीही ट्यूशन-फी घेतली जाणार नाही. असे अहवालात म्हटले आहे. तसेच, ट्यूशन-फी लागू केल्यास गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल असंही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.