मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सर्वात जास्त सर्च होणारे व्यक्ती आहेत. हॅशटॅग ट्रॅकिंग टूल, ट्विट बाइंडरच्या अहवालात ही माहिती पुढे आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय राजकारणी आहेत.
ट्विट बाइंडर हे एक हॅशटॅग ट्रॅकिंग टूल आहे. ट्विट बाइंडरने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत भारतातील X वापरकर्त्यांनी केलेल्या पोस्टच्या संख्येच्या आधारे ही रँकिंग तयार केली आहे. ट्विट बाइंडरच्या अहवालानुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया अकाऊंटची X वर सर्वाधिक चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर ९२.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर योगी आदित्यनाथ यांचे २६.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि राहुल गांधी हे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आहेत.
तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढे फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटर विराट कोहली आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय हे आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय नेते तर आहेत आता ट्विटवर देखील ते लोकप्रिय बनले आहेत.