मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी समाज माध्यमावर देखील प्रचंड सक्रीय असतात. त्यामुळे समाजात किंवा कलाविश्वात घडणाऱ्या नानाविध घटनांवर ते वेळोवेळी भाष्य करत असतात. अलिकडेच त्यांना प्रवासादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर एक लायब्ररी दिसली. या लायब्ररीतला एक व्हिडीओ त्यांनी शेअर करत त्याविषयी माहिती दिली आहे.
काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट?
“वाचाल तर वाचाल” डिग्रीसाठी अभ्यास करत असताना अनेक लायब्ररींशी माझा संबंध आला, मुंबईतल्या अतिशय सुंदर सुंदर लायब्ररीमध्ये मला अभ्यास करायला मिळाला, त्यात आमच्या लाला लजपतराय कॉलेजच्या लायब्ररीत मी भरपूर तास बसलो आहे, त्यानंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीची फोर्टला असलेली लायब्ररी डेव्हिड ससून लायब्ररी, इथे बसून पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला. ब्रिटिश लायब्ररीला फिल्म्स बघायला मिळायचे म्हणून ब्रिटिश लायब्ररी, अमेरिकन लायब्ररी पण त्याच कारणासाठी जॉईन केली. पण दुर्दैवानं माझं वाचन डिग्री मिळवण्यापुरताच सीमित होतं. या सिनेमाच्या क्षेत्रात आल्यानंतर असंख्य महान लेखकांच्या सानिध्यात यायचा योग आला होता , जसे रत्नाकर मतकरी, कमलाकर नाडकर्णी, सुहास शिरवळकर ....ई.., पण तेव्हाही मला वाचनाचे महत्त्व कळलं नाही. कलाकार ज्यांचं दांडगा वाचन आहे, जसे मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, आता सध्या ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेत ओमकार गोवर्धन, या कलाकारांचा आणि यांच्यासारखे अनेक कलाकारांचा वाचन हे एक त्यांच्या जीवनाचा भाग आहे. आणि मला खरंच हेवा वाटतो या सगळ्याचा, असं
मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते असेही म्हणाले, “कलाकार म्हणून ज्या ज्या वेळेला मी कमी पडतो, त्या त्या वेळेला मला जाणवत राहत की वाचन कमी पडलं, भाषेवर प्रभुत्व नाही, ही सतत जाणीव होत असते की शालेय जीवनापासून लहानपणापासून वाचनाची गोडी असणं किती आवश्यक आहे, खरंच ‘वाचाल तर च वाचाल’. मला असं वाटतं यश मिळवण्यासाठी वाचन हे फार महत्त्वाचा आहे, आपल्या देशामध्ये अमिताभ बच्चन, धनुष, नाना पाटेकर, तर जगामध्ये बिल गेट्स, वरण बफेट, ओप्राविनफ्री ,बराक ओबामा या सगळ्यांना वाचनाची अतिशय आवड आणि यांचं दांडगं वाचन आहे. याचाच अर्थ कुठल्याही क्षेत्रात तुम्हाला यश मिळवायचं असेल,आयुष्य समृद्ध करायचा असेल, वाचनाची गोडी निर्माण करणं आवश्यक आहे, खास करून लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायलाच हवी आणि ती निर्माण करायची जबाबदारी आपलीच आहे. काही गोष्टी मला आयुषमध्ये खूप उशिरा कळल्या, पण ठीक आहे “देर आये दुरुस्त आये".