नवी दिल्ली : राज्यात पुन्हा भारत राष्ट्र समितीची (बीआरएस) सत्ता आल्यास मुस्लिमांसाठी स्वतंत्र आयटी पार्क सुरू करण्यात येईल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केली आहे. याद्वारे केसीआर यांनी मुस्लिम लांगुलचालनाची भूमिका स्पष्ट केली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. येथे सत्ताधारी बीआरएस, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांनी मोठ्या प्रमाणात मुस्लिम लांगुलचालनास प्रारंभ केला आहे.
तेलंगणातील महेश्वरम येथे एका रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री केसीआर म्हणाले, आम्ही मुस्लिम तरुणांचा विचार करत आहोत. त्यांच्यासाठी हैदराबादजवळ एक खास आयटी पार्क बांधण्यात येणार आहे. हे आयटी पार्क पहारी शरीफजवळ बांधले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तेलंगणा सरकार मुस्लिमांवर करत असलेल्या खर्चाचे स्पष्टीकरण देताना केसीआर म्हणाले, बीआरएस सरकारने गेल्या 10 वर्षांत अल्पसंख्याकांच्या विकासावर 12,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच वेळी, काँग्रेसने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अल्पसंख्याकांच्या विकासासाठी केवळ 2,000 कोटी रुपये खर्च केले असल्याचेही केसीआर यांनी आपल्या निवडणूक प्रचारात सांगितले आहे.
यापूर्वी सप्टेंबर महिन्यात केसीआर यांनी धोबी व न्हावीकाम करणाऱ्या मुस्लिमांना दरमहा 250 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत, अशी सूट फक्त एससी समुदायाच्या लोकांना उपलब्ध होती, परंतु हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विनंतीवरून, राज्य सरकारने मुस्लिमांसाठीही ही सूट जारी केली होती.