मुंबई : बदलत्या हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला अशा आजारांचा सामना सामान्यांपासून अगदी कलाकारांना देखील करावा लागत आहे. अनेक रोगांच्या साथी सध्या पसरल्या असून आता अभिनेत्री भुमी पेडणकर देखील एका आजारामुळे थेट रुग्णालयात एडमिट झाली आहे.भूमी पेडणेकर हिला डेंग्यूची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती भूमीने स्वतः चाहत्यांना देत डासांपासून सावध राहण्याचं आवाहन देखील केले आहे.
भूमी पेडणेकरने स्वतःचे सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. “एका डेंग्यूच्या डासाने मला ८ दिवस प्रचंड वेदना दिल्या. पण आज जेव्हा मी उठले तेव्हा मला बरं वाटलं अन् मग मी एक सेल्फी काढला.” पुढे ती असे देखील म्हणाली की, “मित्रांनो सावध राहा, कारण गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. सध्या डासांपासून सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे. तुमच्या प्रतिकारशक्तीची काळजी घ्या. माझ्या ओळखीतल्या अनेक जणांना डेंग्यू झाला आहे. हा एक अदृश्य व्हायरस आहे, ज्यामुळे प्रकृती बिघडते. माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. तसेच नर्स, सफाई कर्मचारी यांचे देखील खूप खूप आभार.”