जमलेल्या माझ्या तमाम बांधवांने आणि भगिनींनो …हे एकच वाक्य आणि हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव. बस्स, हे उच्चारलं की, काहीही सांगायची गरज नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यांसमोरून त्यांचा जीवनपट एखाद्या सुपरहिट चित्रपटाप्रमाणे सरकून जातो. बाळासाहेबांचा मराठी बाणा, हिंदू धर्म आणि महाराष्ट्राविषयीचं अलोट प्रेम ही त्यांच्या जीवनाची संजीवनी. ही संजीवनी घेऊनच त्यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. त्यामुळेच उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त हा खास किस्से आपण जाणून घेतले. तरी सर्वप्रथम बाळासाहेबांच्या स्मृतीस विन्रमं अभिवादन.
आपण राजकारणापलीकडच्या बाळासाहेबांच्या किस्स्याबद्दल जाणून घेणार आहोत. बाळासाहेबांचं कलासृष्टीतील अनेकांवर विशेष प्रेम होतं. अभिनेते दिलीप कुमार आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहेच. पण ह्याचं दिलीप कुमारांना जेव्हा पाकिस्तानने सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाज पुरस्कार दिला. त्यावेळी बाळासाहेबांनी तो परत करण्यास त्यांना सांगितले होते. त्याचबरोबर १९८३ मध्ये जेव्हा कुली सिनेमाच्या सेटवर बिग बी जखमी झाले होते तेव्हा बाळासाहेब त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यावरून त्यांचं कलेप्रती आणि कलाकारांप्रती असणारं प्रेम दिसून येते. त्याचबरोबर बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांचे नाव आले तेव्हा अमिताभ यांची बाजू समजून घेऊन बाळासाहेबांनी त्यांना सांगितले की, तुझी बाजू सत्याची असेल तर डगमगू नकोस, धैर्याने सामोरे जा, जे खरे आहे ते जगाला ठणकाऊन सांग. मी तुझ्या पाठिशी पुर्ण ताकदीने उभा आहे, अशा बाळासाहेबांच्या शाब्दिक आधारामुळे अमिताभ बच्चन यांनी ताकदीने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. आणि कोर्ट कचेऱ्याना तोंड देत, सत्याची भुमिका जिंकली. आणि पुढे हेच अमिताभ बच्चन शतकातील महानायक झाले.
त्यानंतर बाळासाहेबांचे क्रिकेटप्रेम अनेकांना ठाऊक आहेच. त्यांच्या क्रिकेट प्रेमामुळे तरुणपणापासून अखेरपर्यत त्यांनी बापू नाडकर्णी , माधव मंत्री, पॉली उम्रीगरसारख्या क्रिकेटपटूंशी मैत्री जपली. इतकंच काय तर पाकिस्तानशी अगदी हाडवैर असताना ही जावेद मियांदादच्या फलदांजीवर बाळासाहेब निहायत खुश होते. त्यामुळे त्यांनी जावेद यांना 'मातोश्री'वर बोलवले. पण या क्रिकेटप्रेमात त्यांचे राजकारण कधीच डोकावलेसुद्धा नाही. वानखेडेच्या उभारणीवेळी ही त्यांनी महापालिकेची ताकद पुरेपुर वापरली. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी ही बाळासाहेबांनी खुप प्रयत्न केले.त्यामुळे क्रिकेटसारखेच उत्तुंग खेळाडू जीवन बाळासाहेब जगले.
त्यानंतर लतादीदींना आपल्या बहिणीप्रमाणे मानणाऱ्या बाळासाहेबांनी राजकारणात येण्याचा सल्ला ही दिला होता. पण त्यावर लतादीदी म्हणाल्या की, “बाळासाहेब, राजकारण हा आमचा प्रांत नाही. पण तुम्ही राजकारणाच्या माध्यामातून खूप चांगलं काम करत आहात. तुमच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा.” आणि त्यादिवशी लतादीदींच उत्तर ऐकून बाळासाहेबांनी लतादीदींना राजकारणात प्रवेश करणार का असा प्रश्न कधीच केला नाही.कारण त्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ उमगला होता.त्यानंतर जेव्हा आपण बाळासाहेबांच्या साहित्यप्रेमाबद्दल बोलतो. तेव्हा साहित्यिक ग.वा. बेहरेंचा किस्सा आठवतो. त्यावेळी बाळासाहेब आणि बेहरे यांच्यातील वैचारिक वाद फार गाजले. दोघांनी एकमेकांवर अगदी टोकाची टीका केली. पण जेव्हा बेहरेंना त्यांनी मातोश्रीवर भेटायला बोलवले. आणि त्यांना बाळासाहेबांच्या एका जिल्हाप्रमुखाने जुन्या जीपमधून आणलेलं पाहिलं. तेव्हा बाळासाहेबांनी भेटीनंतर तिसऱ्यांच दिवशी अॅम्बेसेडर कार बेहरेंना भेट म्हणून दिली. ती गाडी बेहरेंनी आपल्या दिलदार मनाच्या मित्राचा मान ठेवतं अखेरपर्यत वापरली. त्याचबरोबर बाळासाहेबांचे पु.ल. देशापांडेसोबत असणारे मतभेद आणि प्रेम आपल्याला माहिती आहेच.
तसेच व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक आणि फ्रि प्रेसमधून घराघरात पोहचलेले बाळासाहेब नेमंक व्यंगचित्रकार कसे झाले. ह्याचा एक किस्सा आहे. मुळात बाळासाहेंबाची व्यंगचित्र पाहून त्यांना बरेच जण विचारायचे की, तुम्ही कोणत्या स्कूलमधून व्यंगचित्रांची कला शिकलात. त्यावेळी ते म्हणायचे की, मी कुठल्या ही स्कूलमध्ये गेलो असतो तर व्यंगचित्रकार झालोच नसतो. कारण माझा हात बिघडला असता. यांच संपुर्ण श्रेय ते कोल्हापूरच्या बाबूराव पेंटर यांना देत. कारण एकदा बाबूराव पेंटर हे बाळासाहेबांच्या दादरच्या घरी आले. तेव्हा भींतीवर लावलेलं एक पेंटींग त्यांनी पाहिलं. आणि प्रबोधनकारांना विचारलं की, हे पेंटींग कोणी काढलयं. त्यावेळी प्रबोधनकार म्हणाले, बाळानं काढलयं. त्यानंतर प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना बाहेर बोलवून घेतलं आणि पेंटर यांनी बाळासाहेबांना विचारलं काय करतोस? त्यावेळी बाळासाहेब म्हणाले, मी उद्यापासून जे.जे.स्कूल ऑफ आर्टला जाणार आहे. त्यावेळी बाबूराव प्रबोधनकारांना म्हणाले की, अरे या पोरांचा हात चांगला आहे. त्याला स्कूल ऑफ आर्टला पाठवून तो फुकट घालू नको. त्यानंतर बाळासाहेब स्कूल ऑफ आर्टला गेले नाही. आणि त्याबद्दल बाळासाहेब लिहतात की, मी जे.जे स्कूल ऑफ आर्टला गेलो नाही, साठ रुपये फुकट गेले पण माझा हात वाचला. त्यामुळे एकंदरित बाळासाहेबांच्या साहित्य, कला, क्रिकेट प्रेमाबद्दल आणि राजकारणापलीकडच्या बाळासाहेबांबद्दल आज आपण जाणून घेतंल.