ठिणगी पडता पडता...

    13-Nov-2023
Total Views | 78
Hamas Terrorist Active in Israel Palestine Conflict

एकोणाविसाव्या शतकातील दुसर्‍या दशकात म्हणजेच १९१० नंतरचा काळ साम्राज्यशाहीचा होता. इंग्लंड, जर्मनीसह युरोपातील अनेक वसाहतवाद्यांनी आशियाई, आफ्रिकन देशांमध्ये घुसखोरी करुन आपला साम्राज्यविस्तार केला. त्यातूनच देशादेशांत स्पर्धा आणि तणावही निर्माण झाला. परिणामी, अनेक देश एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. अशातच दि. २८ जून १९१४ रोजी युरोपातील सारायेव्होमध्ये जहाल युगोस्लाव्ह राष्ट्रवादी गॅव्हिलो प्रीन्सिप यांनी ऑस्ट्रिया-हंगेरीच्या सिंहासनाचा वारसदार असलेल्या ऑस्ट्रियाचे युवराज आर्च ड्यूक फ्रान्झ फर्डिनांड यांची हत्या केली आणि त्यातूनच पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली.

त्यानंतर प्रमुख देश युद्धात उतरले. जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले, हे युद्ध झपाट्याने संपूर्ण युरोपभर पसरले. तब्बल चार वर्षे चाललेल्या, या युद्धाला एक ठिणगी पुरेशी ठरली. पहिले महायुद्ध १९१८ मध्ये थांबले. युद्धात जिंकलेल्या दोस्त राष्ट्रांनी शत्रूराष्ट्रावर मानहानिकारक तह लादला. त्यातच दुसर्‍या महायुद्धाची बिजे पेरली गेली. दुसरे महायुद्ध १९४५ मध्ये संपले असले तरी तिसर्‍या महायुद्धाची बिजे त्याच वेळी रोवली गेली. त्यानंतर अधूनमधून देशादेशांत तणाव वाढून लहान- मोठी अनेक युद्धे झाली. म्हणूनच असे म्हटले जाते की, तिसरे महायुद्ध कधीच सुरू झाले असून, त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. गेल्याच आठवड्यात अशीच एक ठिणगी पडता पडता वाचली, अन्यथा तिसर्‍या महायुद्धाचा भडका अटळ होता.

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यावर वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी संरक्षण आस्थापनांमध्ये घुसून जीवघेणा हल्ला झाला. जर हा हल्ला यशस्वी झाला असता, तर त्याची झळ अवघ्या जगाला बसली असती. एकीकडे गाझा पट्टीत इस्रायल आणि ‘हमास’मध्ये महिनाभरापासून युद्ध चालू आहे. अशातच वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतीवर झालेला हल्ला सुनियोजित कट असल्याचे युरोपीय राष्ट्रांचे म्हणणे. ‘सन्स ऑफ अबू जंदल’ या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यातून ‘हमास’ आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचे कारस्थान होते. मात्र, त्या हल्ल्यात सुदैवाने अब्बास बचावले. त्यामुळे जहाल गटाचा डाव उधळला गेला. महमूद अब्बास हे पॅलेस्टिनी नेते असले, तरी ते मवाळ हुकूमशहा असून त्यांना हटविण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे. २००५ साली ऐतिहासिक निवडणूक जिंकून अब्बास सत्तेत आले होते.

१८ वर्षांच्या काळात अब्बास यांनी सत्तेवर आपलीच पकड मजबूत करत स्पर्धकांना नेस्तनाबूत केले. १९९३ मध्ये ‘पीएलओ’ म्हणजेच ‘पॅलेस्टिनियन लिबरेशन ऑर्गनायझेशन’ने इस्रायलसोबत शांती करार केला होता. त्या ‘पीएलओ’चे अब्बास प्रमुख आहेत. पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात १९९३ मध्ये झालेल्या शांती करारातील वादग्रस्त मुद्द्यामुळे गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होण्याऐवजी उभय देशांत संघर्ष चिघळतच गेला. पॅलेस्टिनी ऑथोरिटी गाझा पट्टीत सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी इस्रायलसोबत समन्वय ठेवेल आणि वेस्ट बँक, गाझा आणि इस्रायलवर हल्ले होणार नाहीत, याची काळजी घेईल, असे त्या करारात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पॅलेस्टिनींना काही प्रमाणात स्वतःचा कारभार चालवता येत असला, तरी आपलं प्रशासन इस्रायलच्या मर्जीनुसार चालतं, त्यामुळे पॅलेस्टाईन तरुणांमध्ये नैराश्य आले. म्हणूनच त्यातील जहाल गटाला अब्बास नकोसे झाले आहेत. नवा विचार, नवी योजना येत नसल्यामुळे या तरुणांना नेतृत्वबदल हवा आहे.

त्याचाच एक परिणाम म्हणजे ‘हमास’ने इस्रायलवर केलेला हल्ला. पण, इस्रायलला धडा शिकविण्याचा डाव आता कट्टरपंथीयांच्या अंगाशी येत असून, या संघर्षात पॅलेस्टाईनची सरशी व्हावी, यासाठी हे युद्ध कसे भडकेल, यासाठी ’हमास’चे दहशतवादी सक्रिय आहेत. आजघडीला एका आघाडीवर इस्रायल-’हमास’ युद्ध सुरू असताना, दुसर्‍या आघाडीवर अमेरिकेविरोधात सीरिया आणि इराक उभे राहिले आहेत. एकंदरीत वणवा पेटण्याआधी पालापाचोळा तयार होत असतो आणि ठिणगी पडताच तो पेट घेतो. तसाच संघर्षाचा पालापाचोळा जागतिक पटलावर तयार होत असून, ठिणगी पडताच तिसर्‍या महायुद्धाचा वणवा पेटेल, अशी शक्यता निर्माण झालेली दिसते.

मदन बडगुजर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121