नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले सर्वाधिक आमदार हे आमच्या बाजूने आहेत, त्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्हावर आमचाचा हक्क आहे; असा युक्तीवाद राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटाकडून सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हक्कावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला हक्क सांगितला असून याप्रकरणी आता केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे.
आयोगामध्ये सोमवारी सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाकडून वरिष्ठ वकील नीरज किशन कौल, मनिंदर सिंग आणि सिद्धार्थ भटनागर यांनी युक्तीवाद केला. यावेळी पक्षाचे निवडून आलेले सर्वाधिक आमदार हे आपल्या बाजुने असल्याचा दावा अजित पवार गटातर्फे करण्यात आला. सर्वाधिक आमदार आपल्याकडे असल्याने पक्ष आणि पक्षचिन्ह आपल्यालाच मिळावे, असा युक्तीवाद अजित पवार गटाने यावेळी केला. त्यासाठी त्यांच्याकडून सादिक अली आणि पी. ए. संगमा खटल्याच्या निकालाचा हवाला देण्यात आला.
यावेळी अजित पवार गटातर्फे शरद पवार यांनी ज्यांची निवड केली, तेच त्यांची पक्षाध्यक्षपदी कशी निवड करू शकतात असा सवाल पक्षाच्या राज्यघटनेचा हवाला देऊन करण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्याकडे सुमारे दिड लाख तर शरद पवार गटाकडे केवळ ४० हजार प्रतिज्ञापत्रे असल्याकडेही अजित पवार गटाने लक्ष वेधले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आता अजित पवार गटाचा युक्तीवाद संपला आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी शरद पवार गटास बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. शरद पवार गटातर्फे बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी अजित पवार गटातर्फे दाखल प्रतिज्ञापत्रांपैकी ९ हजार प्रतिज्ञापत्रे अयोग्य आणि चुकीची असल्याचा दावा केला. दरम्यान, शरद पवार गटास कागदपत्रे दाखल करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.