मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे थलाईवा रजनीकांत लवकरच एकत्र चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात तब्बल ३२ वर्षांनी हे दोन मेगास्टार एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटाचे निर्माते लायका प्रोडक्शनने अमिताभ बच्चनदेखील चित्रपटाशी जोडल्याची बातमी दिली. टीजे ज्ञानवेल यांचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून यात रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.
अमिताभ आणि रजनीकांत यांनी यापुर्वी ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात रजनीकांतसह अमिताभ बच्चव राणा डग्गूबाती, फहाद फाजील महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून पुन्हा एकदा संगीतकार अनिरुद्धचे संगीत चित्रपटाला लाभणार आहे.