मुंबई : खार आणि गोरेगावच्या सहाव्या लाईनच्या बांधकामाच्या संदर्भात सुरू असलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात २६ ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेने २,५२५ लोकल सेवा रद्द केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका उभारण्याचे काम रखडले होते. एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल गाड्यांचे मार्ग संपूर्ण वेगळे करण्यासाठी बोरिवली आणि मुंबई सेंट्रल दरम्यान सहावी मार्गिका तयार केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचीदेखील गैरसोय होत होती. तरी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी १० दिवस सलग मेगाब्लॉक ठेण्यात येणार आहे.
त्यामुळे दररोज अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या १०० ते १५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सुरु असलेल्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावतील. दरम्यान, ११ दिवसांच्या कालावधीत ४३ लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १८८ गाड्यांचा प्रवास मार्ग कमी करण्यात आला आहे. मुख्यतः राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे जाणाऱ्या व तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या गाड्या यामध्ये समाविष्ट आहेत.