जरांगेंना उपोषण मागे घेण्यासाठी गिरीश महाजनांचा फोन; नेमकी चर्चा काय?
25-Oct-2023
Total Views | 76
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून (२५ ऑक्टो.) आमरण उपोषण सुरू झालं आहे. उपोषणापूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंना फोन करून संवाद साधला. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय आता उपोषणातुन माघार घेणार नाही. आरत्रण मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणार. आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. अशी स्पष्ट भुमिका जरांगेंनी मांडली.
गिरीश महाजन यांनी जरांगे पाटीलांना उपोषण करू नका अशी विनंती करताना म्हणाले, "तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. आमचा शब्द आहे. आम्हीच मागच्यावेळी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. फक्त थोडा वेळ द्या. आम्ही आरक्षण देणारच आहोत. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका. आमचं काम सुरू आहे. आम्ही काम करणारच आहोत. आरक्षण देणारच आहोत. मागच्यावेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. त्यानंतर काय झालं ते माहीत आहे. पण मी राजकारण करणार नाही. तुमच्या आंदोलनाच्या अनुषंगाने चांगला मार्ग निघेल. थोडा वेळ मिळत असेल आणि चांगला मार्ग मिळत असेल तर तुम्ही थोडी संधी दिली पाहिजे."
याला उत्तर देताना जरांगे पाटिल म्हणाले, "जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. तुम्ही दोन दिवसात गुन्हे मागे घेतो म्हटला होता. अजूनही घेतले नाही. गुन्हे मागे घेतले नाही, आरक्षण काय देणार? आमच्या वेदना लक्षात येऊनही सरकारने आरक्षण दिलं नाही. कायद्यात टिकणारं आरक्षण देतो असं तुम्ही म्हणाला होता. तुम्ही एक महिना मागितला. आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले. अजूनही आरक्षण दिलं नाही. ते वर्षानुवर्ष काम करतील. आम्ही का फाश्या घ्याव्यात का? दोन दिवसात तुम्ही गुन्हे मागे घेणार म्हटले होते. तेही तुमच्याकडून झालं नाही." असं उत्तर जरांगेंनी दिलं.