‘हर घर कुछ कहता है’ ही जाहिरात आपण सर्वांनी लहानपणी टीव्हीवर नक्कीच पाहिली असेल. ही जाहिरात होती... एशियन पेंटची. एशियन पेंट केवळ भारताचीच नाही तर आशियातील मोठी रंग कंपनी आहे. देशासह जगातील अनेक घरांना रंगरंगोटीसाठी या पेंट्चा वापर करण्यात येतो. पण या कंपनीसाठी दि. २८ सप्टेंबर रोजी एक दुखद बातमी होती, ती म्हणजे एशियन पेंटचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं.त्यामुळे एशियन पेंटची सक्सेस स्टोरी? अश्विन दाणी यांच एशियन पेंटच्या यशातील महत्त्व, आणि एशियन पेंटचा इतिहास अशा अनेक गोष्टी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
एशियन पेंट्सचा इतिहास महात्मा गांधींच्या असहकार चळवळीशी जोडलेला आहे. एकीकडे देशातील नागरिक या आंदोलनात सहभागी होत होते, तर दुसरीकडे एका गॅरेजमध्ये चार जणांकडून या कंपनीचा पाया रोवला जात होता. हा तो काळ होता जेव्हा ब्रिटीश सरकारने परदेशातून पेंट आयात करण्यावर बंदी घातली होती. अशा परिस्थितीत लोकांकडे काही निवडक पेंट्स खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. या संकटाचे संधींत रुपांतर करत. 1942 मध्ये चंपकलाल चोक्सी, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील या चार मित्रांनी मुंबईत एशियन पेंट्स अॅण्ड ऑइल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली.
त्यावेळी कंपनीने पांढरा, काळा, पिवळा, लाल आणि हिरवा असे फक्त ५ रंग तयार केले होते. एशियन पेंट्सची स्थापना झाली तेव्हा तिचे नाव 'द एशियन ऑइल अँड पेंट कंपनी' असे होते. त्यावेळी दुसरे महायुद्ध आणि १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान पेंट आयातीवर तात्पुरती बंदी घातल्यामुळे बाजारात फक्त परदेशी कंपन्या आणि शालीमार पेंट्स उरला होता. त्यावेळी एशियन पेंट्सने बाजारात प्रवेश केला आणि १९५२ मध्ये कंपनीने २३ कोटींचा व्यवसाय केला. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीला घराघरात पोहोचवण्यासाठी चौघांनीही तळागाळातल्या लोकांपर्यत जात मेहनत केली. त्यांनी स्थानिक लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या कंपनीच्या पेंटच्या छोट्या पिशव्या विकण्यासाठी प्रोत्साहित केले.त्यानंतर एशियन पेंट्स ही उद्योगातील भारतातील पहिली सर्वात मोठी आणि आशियातील तिसरी सर्वात मोठी कंपनी म्हणून स्थापित झाली. एशियन पेंट्स ग्रुप जगभरातील 22 देशांमध्ये कार्यरत आहे. हे मुळात आशिया, मध्य पूर्व, दक्षिण पॅसिफिक आणि आफ्रिका या चार क्षेत्रांमध्ये आठ कॉर्पोरेट ब्रँडद्वारे कार्य करते. ते ब्रँड म्हणजे एशियन पेंट्स, एशियन पेंट्स बर्जर, SCIB पेंट्स, एप्को कोटिंग्स, टूबमैन्स, कॉजवे पेंट्स और कादिस्को हे आहेत.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ८० वर्षांपूर्वी लॉन्च झाल्यानंतर 1945 मध्ये, एशियन पेंट्सने सुमारे 3 लाख रुपयांची उलाढाल केली होती, परंतु पाच वर्षांनंतर या व्यवसायाने रॉकेट प्रमाणे वेग पकडला. आणि त्याचा महसूल आणि नफा देखील वाढू लागला. स्वातंत्र्यानंतर, एशियन पेंट्सने जाहिरातींवर अधिक भर दिला आणि लोकापर्यत पोहचण्यासाठी जाहिरातींचा अवलंब केला.आता अश्विन दाणींच या कंपनीच्या यशातील महत्त्व काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. तेव्हा मला सांगावसे वाटते की, अश्विन दाणी १९६८ साली या कंपनीत दाखल झाले. त्यांचे वडील सूर्यकांत दाणी हे कंपनीच्या चार भागीदारांपैकी एक होते. मुळात अश्विन दाणी यांना लहानपणापासूनच रंगांचे वेड होते. त्यांचे आयुष्यभर रंगावर प्रयोग सुरु होते. रंगावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी याच क्षेत्राचे शिक्षण घेतले. त्यामुळेच त्यांनी the technology of paints, pigments and varnishes या विषयाची विशेष पदवी संपादित केली. तसेच न्यूयॉर्कमधून त्यांने Diploma in Colour Science ही खास पदविका सुद्धा मिळवली. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार,२०२३ मध्ये अश्विन दाणी यांची एकूण संपत्ती 7.1 बिलियन डाँलर इतकी होती.
सुरुवातीला जेव्हा ही कंपनी सुरू करण्यात आली तेव्हा सात पेंट कंपनीमध्ये एशियन पेंट ही एकमेव भारतीय कंपनी होती. बाकी सर्व कंपन्या ब्रिटीश कंपन्या होत्या. त्यावेळी कोणत्याही कंपनीने कंपनीला टेक्नोलाँजी पुरवली नाही. त्यावेळी कंपनीच्या अध्यक्षांनी अश्विन दाणी यांना सांगितले की, आता आत्मनिर्भर होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यानंतर एशियन पेंटने येवढं मोठं साम्राज्य तयार केलं. पण हे साम्राज्य उभं करणं सोपं नव्हतं. कारण १९९० च्या दशकात जेव्हा कंपनीचा विस्तार झाला त्यावेळी वैश्विक अधिकांराच्या मुद्यावरून कंपनीच्या वरिष्ठांमध्ये वादविवाद झाला. त्याचा परिणाम असा झाला की, चोक्सी यांनी आपले १३.७ टक्के शेअर विकून टाकले. आणि १९९७ मध्ये ते कंपनीतून बाहेर पडले.पण तरीदेखील कंपनी खचली नाही. अश्विन दाणी यांच्या नेतृत्त्वात कंपनीने यशाची एक एक शिखरे पार केली. यांचीच प्रचिती म्हणजे, 2004 मध्ये, कंपनीचा फोर्ब्सच्या Best Under A Billion Companies या यादीत समावेश करण्यात आला.
एवढेच नाही तर ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलने ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कारानेही कंपनीचा गौरव केलाय. एशियन पेंट्स ही देशातील काही कंपन्यांपैकी एक आहे जी स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाली आणि आजही कार्यरत आहे. इतकेच नाही तर ती जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या (पेंट) कंपन्यांपैकी ती एक आहे.या कंपनीचा २०२२-२३ या आर्थिक वर्षातील महसूल ३४,४८८ कोटी रुपये होता, ज्यावर कंपनीने ४१०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. आजमितीस एशियन पेंट्सचे बाजार भांडवल ३० लाख ३ हजार ३४१ कोटी रुपये आहे. त्यामुळेच आज एशियन पेंट्स जगातील टॉप १० पेंट्स कंपन्यांमध्ये आहे. तसेच ही कंपनी आशियामध्ये दुसऱ्या आणि जगात आठव्या क्रमांकावर आहे.