नवी दिल्ली: "भारतातील लोक विविध गॅझेट्सच्या वापरावर (स्क्रीन टाईम) सरासरी सहा तास घालवतात. ही चिंतेची बाब आहे. देवाने आपल्याला स्वतंत्र अस्तित्व आणि अफाट क्षमता असलेले व्यक्तिमत्व दिले असताना गॅझेटचे गुलाम का व्हावे?", असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या सहाव्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी बोलताना केला.
आपल्या देशात गॅझेट वापरकर्त्यांचा स्क्रीन टाईम हा सरासरी सहा तासांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बाब निश्चितपणे कोणत्याही व्यक्तीने निरर्थकपणे आणि उत्पादनक्षमतेशिवाय किती वेळ आणि ऊर्जा वाया घालवावी, असा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि लोकांच्या सर्जनशीलतेस त्यामुळे धोका आहे. कोणत्याही व्यक्तीने तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या तावडीतून स्वतःची सुटका केल्यावरचा आनंद हा फार मोठा असतो. देवाने आपल्याला स्वतंत्रपणे इच्छा व्यक्त करू शकणारे आणि स्वतंत्र असलेले व्यक्तिमत्व दिले आहे. अशावेळी आपण आपल्या गॅजेट्सचे गुलाम होणार नाही याबद्दल नेहमीच जागरुक राहिले पाहिजे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पंतप्रधानांनी यावेळी भारताची सांस्कृतिक विविधता आणि समृद्ध वारसा अधोरेखित केला. भारत हा शेकडो भाषा आणि हजारो बोलींचे माहेरघर आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन भाषा शिकणे हे नवीन वाद्य शिकण्यासारखे आहे. “प्रादेशिक भाषा शिकण्याचा प्रयत्न करून, आपण केवळ अभिव्यक्तीसाठी भाषा शिकत नाही तर त्या प्रदेशाशी संबंधित इतिहास आणि वारशाचे दरवाजे देखील उघडत आहात” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी रोजच्या दिनचर्येत कसलेही ओझे न वाढवता नवीन भाषा शिकण्यावर भर दिला. ज्याप्रमाणे दोन हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या देशाच्या स्मारकाचा नागरिकांना अभिमान वाटतो तसेच साधर्म्य राखत पृथ्वीवरील सर्वात जुनी भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमिळ भाषेचाही देशाने अभिमान बाळगला पाहिजे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
हा तर ‘आउट ऑफ सिलॅबस’ प्रश्न
दक्षिण सिक्कीममधील एका शाळेत शिकणाऱ्या अष्टमी सेन या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले की, जेव्हा विरोधक आणि प्रसारमाध्यमे तुमच्यावर टीका करतात तेव्हा तुम्ही त्याचा सामना कसा करता?. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, "जेव्हा तुम्हाला (विद्यार्थ्यांना) कोणताही प्रश्न नीट कळत नाही, तेव्हा तुम्ही म्हणता की तो ‘आउट ऑफ सिलॅबस’ प्रश्न आहे. त्यामुळे तू आता विचारलेला प्रश्नही ‘आउट ऑफ सिलॅबस’ असल्याची मिश्कील टिप्पणी पंतप्रधानांनी केली”.
हुशारीचा वापर कॉपी करण्यासाठी नको
काही विद्यार्थी परिक्षेत कॉपी करण्याचे नवनवीन मार्ग शोधण्यात अगदी तरबेज असतात. असे विद्यार्थी छोट्या अक्षरांच्या चिठ्ठ्या तयार अगदी कुशलतेने तयार करतात. मात्र, असे करण्याऐवजी अशा विद्यार्थ्यांनी या कलागुणांचा उपयोग शिकण्यासाठी करावा. आता जीवन आणि जग खूप बदलले आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. यापुढे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात परीक्षा द्यावी लागते. म्हणूनच फसवणूक करणारा एक किंवा दोन परीक्षा उत्तीर्ण होईल, परंतु जीवनात कधीही उत्तीर्ण होऊ शकणार नसल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.