दावोसचे करार कसे होतात आम्हाला चांगलं ठाऊक : संजय राऊत

    17-Jan-2023
Total Views |


दावोसला जाण्याआधी गुजरातला जा : संजय राऊत

मुंबई : दावोसमधून राज्यासाठी मोठी गुंतवणूक आणणार असल्याने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतही आहेत. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर करार होणार असून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरुन विरोधकांचा चांगलाच तिळपापड झाल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "तुमच्या नाकासमोर राज्यातील प्रकल्प पळवले. गुजरातने हे प्रकल्प पळवले. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं. गुंतवणूक गेली आणि रोजगारही गेले आहेत. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा."
"दावोसमधून काय येतं ते माहीत नाही. तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आणा. वेदांत, एअरबससारखे प्रकल्प गेले. दोन लाख कोटीच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन या. दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहीत आहे. तिकडे जगभरातून राज्यकर्ते येतात. आपले करारमदार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले. आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दावोसला जाऊन किती कोटीचे करार केले ते सिद्ध करू शकले नाही." असं ते यावेळी म्हणाले.
न्याय व्यवस्थेतबाबत बोलताना राऊत म्हणाले, "कपिल सिब्बल यांनी सांगितलं सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेऊ इच्छिते. इतर सर्व यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. आता न्याय व्यवस्थेवर हातोडा घालायचा बाकी आहे. ती प्रक्रिया सुरू झालीय असं मला वाटतंय."

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.