बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात? किरीट सोमय्यांचा सवाल

    17-Jan-2023
Total Views |



बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात? किरीट सोमय्यांचा सवाल

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. 49 कोटी 85 लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यात का आले? याच उत्तर द्या. रजत कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अस्तित्वात नसताना हे पैसे आले. बंद पडलेल्या कंपन्यांमधून खात्यात पैसे कसे येतात हे कोल्हापूरकरांना कळू द्या. हे पैसे कसे आले हे कळलं तर कोल्हापूरकर आयुष्यभर नव्हे सात जन्म नमस्कार करतील. असं ते यावेळी म्हणाले.
 
 
पुढे ते म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वचन दिलं आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ प्रकरणाची चौकशी होणारच आहे. ग्रामविकास मंत्री असताना जावयासाठी ग्रामपंचायतींना झिझिया कर लावला गेला. मुश्रीफ कोणाला मूर्ख बनवत आहेत? कंत्राट रद्द केलं म्हणतात. पण आधी दिलं तर होत ना? मी प्रकरण बाहेर काढल्यानंतर कंत्राट रद्द केलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे. हसन मुश्रीफ यांनी जो भ्रष्टाचार केला त्याच्या पै आणि पैचा हिशोब किरीट सोमय्या जनतेला देणार आहे. माउंट कपिटल, आणि रजत कंझ्युमर या बंद कंपन्यातून पैसे कसे आले. भावना गवळी, प्रताप सरनाईक यांनी तुमच्या आशीर्वादाने घोटाळा केला असेल. तुम्ही आता त्यांनी केलेल्या घोटाळ्यांची माहिती द्या, मी वाट पाहतोय." असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
 
 
यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केलं. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्त्कालीन सरकारच्या नेत्यांसाठी कोरोना हे कमाईचे साधन होतं. संजय राऊत, सुजित पाटकर यांनी घोटाळा केला. ज्यांना अनुभव नाही अशांना शंभर कोटीचे कॉन्ट्रॅक्ट कसे दिले?असा सवाल आम्ही उपस्थित केलाय. अशी माहिती सोमय्यांनी दिली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.