मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले आहेत. यावेळी भाजपच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मुंबई महापालिकेसाठी आपले लक्ष्य १५० आहे असे सांगितले. यावर संतप्त होऊन शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पहिला दीडशेचा नारा मी दिला होता असा दावा केला आहे. एका टेलिव्हिजन माध्यमातर्फे आयोजित गणेशोत्सवाच्या आरतीत शिवसेनेच्या उपनेत्या म्हणून आपण हा नारा दिला होता असा दावा त्यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टी माझी कॉपी करत आहे असाही दावा किशोरी ताईंनी केला आहे. भाजपचे दिल्लीतील नेते काय बोलतात? आणि जमिनीवरचे वास्तव यांच्यात फरक आहे असेही त्या पुढे म्हणाल्या. मुंबईकरांना तुमच्या धोका - खोका मध्ये रस नाही, त्यांना रोजचे प्रश्न महत्वाचे आहेत. हे प्रश्न घेऊन ते शिवसेना शाखेतच येत असतात, त्यामुळे त्यांना तेच जवळचे वाटतात असा दावाही किशोरी ताईंनी केला आहे. २४ तास शिवसेना शाखा लोकांच्या सेवेत असतात. त्यामुळे तेच त्यांच्या जवळचे आहेत.
या सगळ्यात भाजपचे छोट्या प्रादेशिक पक्षांना संपवून एकच पक्ष संपूर्ण देशभर राज्य करेल हा डाव सगळ्या राज्यांनी ओळखला आहे आणि त्याच बरोबरीने कोणी कशासाठी त्यांच्याशी युती तोडली? हा साक्षात्कार त्यांना आता होतो आहे, तो तेव्हा का नाही झाला असा सवालही किशोरीताई पेडणेकर यांनी केला आहे.