संजय राठोडांना दणका! महंत सुनील महाराज यांनी बांधले शिवबंधन!
30-Sep-2022
Total Views | 68
36
मुंबई: वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी समजली जाणाऱ्या पोहरादेवी गडाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत शिवबंधन बांधले. सुनील महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा पक्षप्रवेश संजय राठोडांसाठी मोठा धक्का असणार आहे.
यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचे मोठे प्रस्थ आहे. या समाजाचा चेहरा म्हणून संजय राठोड यांच्याकडे बघितले जात होते. परंतु आता राठोडांनाच टक्कर देण्यासाठी बंजारा समाजाचे महंत यांनी शिवबंधन बांधले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच महंतांनी स्वत: हा खुलासा केला होता.
महंत सुनील महाराज म्हणाले होते की, "बंजारा समाजाचे प्रश्न घेऊन, समाजहिताचे प्रश्न, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाचे प्रश्न घेऊन मुंबईत मंत्री संजय राठोड यांना भेटण्यासाठी गेलो. मात्र तिथे मिळालेली वागणूक ही न सांगण्यासारखी आहे. मला त्या कार्यालयात ४ तास थांबवून ठेवले. त्यानंतर भेट झाल्यानंतर मंत्र्यांनी १० मिनिटेही वेळ दिला नाही. त्यांच्या देहबोली आणि वृत्तीवरून माझी उपस्थिती त्यांना खटकत असल्याचे दिसून आले होते." अशी नाराजी महंत सुनील महाराज यांनी व्यक्त केली.