पुणे: पुण्यात ५जी नेटवर्क लवकरच उपलब्ध होणार आहे, त्यासाठी पुणे महापालिकेने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गतीने परवागनी द्यावी असे आदेश मुंबईत झालेल्या बैठकीत शासनाने घेतलेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. देशातील १३ शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ५जी सेवा सुरू होणार असून, यामध्ये पुणे शहराचा समावेश आहे.
केंद्र सरकारने नुकतीच ५जी सेवेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला, त्यातून तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये देशातील सर्व आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतला असल्याने आता ५जी सेवा आॅक्टोबर महिन्यात सुरू होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहराचाच पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्यासाठी महापालिकेने कंपन्यांना टॉवर्स, डक्ट्स आणि ट्रान्समीटर बसविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, त्यासाठीच्या परवानग्या लवकर द्याव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.
राज्यात प्रत्येक शहरात सेवा वाहिन्या टाकण्यासाठी भिन्न स्वरूपाचे शुल्क आहे. पुण्यात प्रति मीटर १२ हजार रुपये शुल्क आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत खोदाई शुल्क व अन्य शुल्क एकच असणार आहे. हे शुल्क राज्य शासनच निश्चित करणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.
दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी ५जी सेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये पुण्यासह मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, या शहरांचा समावेश आहे.