नवी दिल्ली: ज्ञानवापीप्रकरणी मस्जिद समितीच्या वतीने वाराणसी दिवाणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात कोणत्याही प्रकारची याचिका दाखल झाल्यास, त्याची माहिती हिंदू पक्षास द्यावीअशी विनंती करणारी कॅव्हेट याचिका श्रृंगारगौरी प्रकरणातील याचिकाकर्त्या रेखा पाठक यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे.;
वाराणसी दिवाणी न्यायालयाने १२ सप्टेंबर रोजी ज्ञानवापी संकुलातील श्रृंगारगौरीची नित्यपूजा करण्याची परवानगी देण्याची विनंती करणारी याचिका सुनावणीयोग्य असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर मुस्लिम पक्षाने वाराणसी न्यायालयाच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्याविषयी हिंदू पक्षातर्फे उच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहे.
त्यात म्हटले आहे की, जर मुस्लिम पक्षातर्फे ज्ञानवापीप्रकरणी वाराणसी दिवाणी न्यायालयाच्या निकालाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यात आल्यास त्यावर हिंदू पक्षाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मुस्लिम पक्षाच्यावतीने याचिका दाखल झाल्यास त्याची प्रत हिंदू पक्षास देण्यात यावी, असेही याचिकेमध्ये नमूद करण्यात आले असल्याची माहिती प्रकरणातील हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दैनिक शी बोलताना दिली आहे.’मुंबई तरुण भारत‘