"फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान देशाच्या नशिबात नव्हता!"
11-Sep-2022
Total Views | 153
132
धाराशिव: उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली असल्याचा आरोप युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. वरुण सरदेसाई हे उस्मानाबादमध्ये युवासेनेच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. "शिवसेनेनं दोन सेक्युलर पक्षांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक चांगले निर्णय घेतले," असंही ते म्हणाले.
"ते कट्टर हिंदुत्ववादी असताना सोबत दोन सेक्युलर पक्षांना घेऊन चांगले काम करत होते. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर २०२४ ला ते पंतप्रधानपदाचे दावेदार बनू शकतील, या भीतीनेच भाजपने शिवसेना फोडण्याचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार घालवण्याचे काम केलं." असं सरदेसाई म्हणाले.
यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली', वरुण सरदेसाईंचा दावा. Hmmmm खरंय, उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले... फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता. असे ट्विट करत भातखळकर यांनी पलटवार केला आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये, सत्ता गमावली काही दिवसांनी महापालिकाही जाणार. टक्केवारी बंद होणार. म्हणून जनाबसेनेच्या पक्षप्रमुखांनी कबरींचे सुशोभीकरण करण्याचा व्यवसाय सुरु केलाय असं कळते." असे म्हणतं भातखळकर यांनी वरुण सरदेसाई यांना निशाणा केला आहे.