उल्हासनगरात १२ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी

    08-Oct-2025
Total Views |

उल्हासनगर : एका बंद असलेल्या गाळ्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून त्या ठिकाणावरून सुमारे ११ लाख ८५ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करून एकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे.

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील स्वामी शांती प्रकाश आश्रम जवळील दुर्गा माता मंदिराच्या मागे असलेल्या एका बंद गाल्यात गुटखा आणि सुगंध पान मसाल्याचा मोठा साठा ठेवलेला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार योगेश वाघ यांना मिळाली. बंद असलेला गाळा क्रमांक दोन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांना समजताच.

उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलिस अंमलदार योगेश वाघ ,गणेश गावडे, रितेश वंजारी, सुरेश जाधव, चंद्रकांत सावंत, शेखर भावेकर, अशोक थोरवे यांनी छापा मारला. पोलिसांनी त्या ठिकाणाहून धीरज नावाच्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ११ लाख ८५ हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला. धीरज याच्याविरुद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.